मावळात टाळ..विणा.. मृदुंगाचा.. गजर.. आणि ज्ञानोबा.. माऊली.. माऊली.. तुकारामाचा जयघोष
वडगाव मावळ:
टाळ..विणा.. मृदुंगाचा.. गजर.. आणि ज्ञानोबा.. माऊली.. माऊली.. तुकाराम.. हे संतनाम यात मावळ तालुका दुमदुमत निघाला आहे.निमित्त संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळयाचे.या सोहळ्यासाठी श्रीक्षेत्र आळंदी कडे पायी जाणाऱ्या अनेक दिंड्या मावळकरांचा पाहुणचार घेत श्रीदेहू वरून आळंदीकडे प्रस्थान करीत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त अलंकापुरी गजबजली आहे इंद्रायणी तीरावर विठ्ठल नामाचा गजर सुरू आहे.आळंदीकडे मुंबई, ठाणे, रायगड, कर्जत, खोपोली, बदलापूर या भागातून येणा-या दिंड्या खंडाळ्याचा घाट चढून घाटमाथ्यावर येत आहे.मावळ तालुक्यात प्रवेश केलेल्या या दिंड्यांचे अगत्याचे स्वागत केले जाते.
आनंदाने या सा-या वैष्णवांचा पाहुणचार केला जातो.
मावळ तालुक्यातून आंदर मावळ,नाणेमावळ, पवन मावळातून वारकरी माऊली तुकारामांचा गजर करीत अलंकापुरी कडे मार्गस्थ होत आहे.
खेड्यापाड्यातून अथवा शहरांतून जाणा-या दिंड्यांचे ठिकठिकाणी स्वागत होत आहे.चहा पाणी, जेवण व राहण्याची सोय केली जात आहे.आरोग्य तपासणी होत आहे.दिंडीचालकांनी नेमून दिलेल्या विसाव्या स्थळी दिंड्यांचा मुक्काम पडतोय.संताचे अभंग, ओव्या, गवळणी गात वारकरी जात आहे.मुक्कामाच्या ठिकाणांवर प्रवचन,किर्तन आणि हरिजागर होत आहे.वारकरी परंपरेने घालून दिलेल्या रिवाज प्रमाणे दिंडी सोहळ्यातील कार्यक्रम होत आहे.ऊन असो की कडाक्याची थंडी याला आमचे वारकरी घाबरत नाही की भीकही घालत नाही.
विठ्ठल नामांचा गजर आणि संताच्या ओव्या गायच्या हाच त्यांचा छंद आहे.भगव्या पताका,वारकरी पोशाख परिधान केलेले वैष्णव,डोक्यावर तुळशी वृंदावन आणि कलश घेतलेल्या माता माऊल्या या दिंडीत सहभागी झाल्या आहे.कधी फुगडयांचा फेर धरताहेत, तर कधी ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करीत नाचतात.
खंडाळा , लोणावळा, कार्ला, कामशेत, कान्हे, वडगाव मावळ, तळेगाव स्टेशन, माळवाडी , इंदोरी,देहू या हमरस्त्याने दिंड्या जात आहे.मागील वर्षी साते गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात मोठी दुर्घटना झाली होती.या ही वर्षी कामशेत जवळ एका वारक-याचा अपघात झाला.या दिंड्याच्या कालावधीत वाहनचालकांनी वाहने चालविताना खबरदारी घ्यावी तर वारकरी बांधवानी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
आंदर मावळ, नाणे मावळ व पवन मावळातील दिंड्या सह्याद्रीच्या कडेपठार, अंद्रायणी , इंद्रायणी, कुंडलिका आणि पवनेच्या तीराला साद घालीत अलंकापुरी मार्गस्थ झाल्या आहे.या आठ दहा दिवसात मावळ तालुक्यातील शहरी व ग्रामीण भाग विठ्ठल नामात दुमदुमून गेला आहे.

error: Content is protected !!