कवी हा सत्याचा उपासक- डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे
पिंपरी:
“कवी हा सत्याचा उपासक असतो. तो आपल्या प्रतिभेने सत्य आणि सौंदर्य एकत्रितपणे मांडू शकतो!” असे विचार संत वाड्.मयाचे अभ्यासक आणि कीर्तनकार डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे यांनी बीना इंग्लिश मीडियम स्कूल, पांढारकरनगर, आकुर्डी येथे व्यक्त केले.
नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आणि अनुप मोरे सोशल ॲण्ड स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दिवाळीसांज’ या स्वरचित भक्तिगीतांच्या अनोख्या मैफलीत अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. भावार्थ देखणे बोलत होते. इतिहास अभ्यासक संदीप तापकीर, माजी उपमहापौर शैलजा मोरे, माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे, बीना एज्युकेशनल सोसायटीचे सचिव आझमखान, ह. भ. प. भानुदास तापकीर, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव, कार्याध्यक्ष प्रा. तुकाराम पाटील आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती; तसेच साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते ‘दुर्गांच्या देशातून…’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी ह. भ. प. भानुदास तापकीर म्हणाले की, “यशाचे गौरीशिखर गाठण्यासाठी परिश्रमाची पराकाष्ठा करावी लागते!” अरुण बोऱ्हाडे यांनी आपल्या मनोगतातून, “गडकिल्ल्यांच्या प्रत्यक्ष अनुभूतीतून सातत्याने बारा वर्षांपासून ‘दुर्गांच्या देशातून…’ हा दिवाळी अंक साकार होतो आहे!” अशी माहिती दिली.
डॉ. भावार्थ देखणे पुढे म्हणाले की, “वारसाहक्काने आध्यात्मिक अन् साहित्यिक मिराशी मिळाली, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. कोकणचा कॅलिफोर्निया अन् महाराष्ट्राचे मिशिगन होताना लोकसंस्कृतीतून महाराष्ट्राची खरी ओळख जगाला होत राहील. त्यामुळे कवींनी ज्ञानवर्धक आणि अविनाशी साहित्याची निर्मिती करावी!” शैलजा मोरे यांनी, “आताच्या काळात वडिलांच्या कार्याचा वारसा चालवणे हे खऱ्या अर्थाने संस्कृतीचे संचित आहे!” असे मत मांडले. सवत्स धेनूची पूजा आणि सर्व उपस्थितांच्या हस्ते प्रत्येकी एक पणती प्रज्वलित करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. राज अहेरराव यांनी प्रास्ताविकातून, “डॉ. रामचंद्र देखणे आणि रामकृष्ण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तीस वर्षांपूर्वी नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाची स्थापना झाली. पिंपरी – चिंचवड ही श्रमिकांची नगरी असल्याने कामगार साहित्यिकांच्या पुस्तकांसाठी महापालिकेने अर्थसाहाय्य करावे किंवा प्रत्येक प्रकाशित पुस्तकाच्या १०० प्रती खरेदी कराव्यात, यासाठी मंडळ सातत्याने पाठपुरावा करीत आहे!” अशी माहिती दिली.
‘दिवाळीसांज’ या स्वरचित भक्तिगीतांच्या अनोख्या मैफलीत वंदना इन्नानी, सूर्यकांत भोसले, शशिकला देवकर, रघुनाथ पाटील, शोभा जोशी, आनंद मुळूक, राजश्री वाघमारे, संतोष सरदेशमुख माधुरी विधाटे, योगिता कोठेकर, सविता इंगळे, कांचन नेवे या कवींनी वैविध्यपूर्ण भक्तिगीतांचे सादरीकरण केले; तर अरुणा वाकनीस, सुनीता येन्नुवार, विनीता श्रीखंडे आणि अंजू सोनवणे यांनी समूहस्वरात रमेश वाकनीस यांची भक्तिरचना सादर केली. याप्रसंगी नंदकुमार मुरडे, प्रा. पी. बी. शिंदे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
अश्विनी कुलकर्णी, आर. एस. कुमार, अनिकेत गुहे, उज्ज्वला केळकर, अशोक कोठारी, शरद काणेकर यांनी संयोजनात सहकार्य केले. राजेंद्र घावटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले; तर माधुरी ओक यांनी भक्तिगीतांच्या मैफलीचे निवेदन केले. अरविंद वाडकर यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
- दादाभाऊ गणपत गायकवाड यांचे निधन
- पंचाहत्तरीनिमित्त निवेदक सुधीर गाडगीळ यांचा विशेष सत्कार व सांस्कृतिक संचित कार्यक्रम
- असवले इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये बालजत्रेची धूम
- कला-क्रीडा महोत्सवात अति दुर्गम भागातील खांडी शाळेने पटकविला मानाचा तुरा : पाचवी इयत्तेचा नक्ष भोकटे ठरला मावळ तालुकापातळीवरील बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता
- सांगिसे विद्यालयात सॅनिटरी डिस्पेन्सर व डिस्पोजल मशीनचे उदघाटन