परमेश्वर सर्वार्थाने व सर्वांगाने अनंत स्वरूप असून,अखिल मानवजातीसाठी एकच आहे.परमेश्वर म्हणजे नुसती शक्ती नाही.शक्तिचे अनेक  प्रकार आहेत ते म्हणजे अनुशक्ती , वीजेची शक्ती , वाफेची शक्ती वगैरे , ह्या सर्व शक्ती जड स्वरूपात आहेत.त्यांच्यापेक्षा परमेश्वरी शक्ती आगळी आणि वेगळी आहे.
त्या अव्यक्त , निर्गुण, निराकार परमेश्वरी शक्तीची व्याख्या खालील प्रमाणे करता येईल .”दिव्य जाणीव , दिव्य प्रतिभाज्ञान व दिव्य आनंद यांनी युक्त अशी सर्वव्यापी , शाश्वत , सर्वसमर्थ , अनंत स्वरूप दिव्य शक्ती म्हणजे निर्गुण निराकार परमेश्वर”
याच परमेश्वरी शक्तीची व्याख्या जीवनविद्या इंग्रजीमध्ये खालील प्रमाणे करते —
“All-pervading, Almighty, Eternal, Infinite Divine Power Endowed with Divine Consciousness. Divine Intuition and bliss is God”.
ही परमेश्वरी शक्ती आनंद स्वरूप असल्यामुळे ती नित्य स्फुरद्रुप असते .सतत स्फुरत राहणे हा या परमेश्वरी शक्तीचा स्वभाव आहे.त्याचप्रमाणे अनंत रूपे , अनंत वेषे प्रगट होण्याची स्फुरणा , प्रेरणा रूपाने या परमेश्वरी शक्तीच्या अंगीभूत आहे .
अशी परमेश्वरीशक्ती विश्वरूपाने प्रगट होते व विश्वात अनंत रूपे, अनंत वेषे साकार होते व सर्वभूतमात्रात ईश्वर रूपाने वास करून रहाते.
या संदर्भात भगवत् गीता सांगते, ….
  ईश्वरः सर्व भूतानां । हृद्देशेर्जुन तिष्ठति ।।
हाच ईश्वर सर्व मनुष्य प्राण्यांत “मी”रूपाने स्फुरत असतो.
म्हणूनच ज्ञानेश्वरीमध्ये संतश्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात,
अर्जुनपण न घेतां। मी ऐसे पंडुसुता।।
उठतसे तत्वतः। ते तयाचे रूप।।
थोडक्यात, ……
जीव, जगत आणि जगदीश या रूपात परमेश्वरी शक्तीच प्रगट होत असते.
— सद्गुरू श्री वामनराव पै.

error: Content is protected !!