पिंपरी:
सदतीस वर्षांनंतर भेटले शाळा सवंगडी
पिंपरी छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय, कासारवाडी या शाळेतील सन १९८६ – ८७ या तुकडी (बॅच) मधील शाळा सवंगडी तब्बल सदतीस वर्षांनी शाळेत भेटले; आणि विद्यार्थिदशेतील आनंदात न्हाऊन निघाले. माजी विद्यार्थी संघटना (१९८६ – ८७), कासारवाडी या समूहाने घेतलेल्या पुढाकाराने माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षक यांचे ‘माजी विद्यार्थी स्नेह संमेलन’ त्या काळातील शिक्षक बाळासाहेब सातव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतेच संपन्न झाले.
माजी शिक्षक दिलीप तापकीर यांची प्रमुख पाहुणे म्हणून तसेच त्रिंबक भाकरे, रवींद्र लांडगे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.याप्रसंगी दिलीप तापकीर यांनी मार्गदर्शन करताना, “शाळेतील मित्र हे ‘सलाईन’प्रमाणे संजीवनी देण्याचे काम करतात. त्यांच्या सहवासात मनातील नकारात्मक भावना दूर होऊन माणसाचे आयुष्य वाढते म्हणून त्यांना आवर्जून भेटले पाहिजे!” असे विचार व्यक्त केले.
माजी विद्यार्थी दिनेश जोशी यांनी आपल्या मनोगतातून, “खिशाचे वजन वाढवण्यापेक्षा निखळ आनंदासाठी मैत्रीचे वजन वाढविणे आवश्यक आहे!” अशी भावना व्यक्त केली. बाळासाहेब सातव यांनी अध्यक्षीय मनोगतातून माजी विद्यार्थी संघटना या समूहाने सदतीस वर्षांपूर्वीच्या शालेय जीवनाचा पुन्हा प्रत्यय दिला, असे मत मांडले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कालप्रवाहात साथ सोडून गेलेल्या सावता बुनगे, हेमलता कोळी, दीपक राऊत, राजेंद्र प्रसाद, मोहन काची या दिवंगत शाळा सोबत्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली; तसेच स्वर्गीय संतोष बनकर आणि राजेश कांबळे यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ₹२५०००/- चा मदतनिधी सुपुर्द करण्यात आला.
विविध क्षेत्रांतील नोकरी, व्यवसायात रमलेल्या प्रकाश कानडे, अशोक कोंढावळे, प्रशांत बांगर, महेश शेवाळे, अशोक रासकर, जीवन पिसे, रवींद्र चेडे, चिमण लांडगे, सोमनाथ शिंदे, अविनाश जासूद, राजेंद्र शिवशरण, प्रकाश गायकवाड, संजय बेलिटकर, नीलकंठ निमगावकर, दत्तात्रय गडगे, नरहरी लांडगे, रवींद्र आळंदकर, गणेश पठारे, प्रशांत अलिबागकर, सूर्यकांत पवार, प्रवीण लोखंडे, सुधीर सालके, रामदास गारगोटे, राजेंद्र आजबे, प्रवीण लांडे, महेश नगरे, रवींद्र गरुड, प्रशांत पोलकम, अशोक गव्हाणे, सुनील शेटे, अनिल पडघमकर, सुरेश जगताप, जयदत्त चवरे, संदीप कर्णावट, रजपूत या माजी विद्यार्थ्यांनी स्वतःचा परिचय करून दिला. त्यानंतर विनायक कदम आणि अनिल जंगम यांनी कराओकेवर सादर केलेल्या हिंदी – मराठी गाण्यांचा सर्वांनी आस्वाद घेतला.
कार्यक्रमाच्या संयोजनात संदीप राजेशिर्के, दीपक परदेशी, अनिल बांगर, वसंत टिळेकर, सुनील बोरकर, सोमनाथ शिंदे, घमाजी लांडगे यांनी परिश्रम घेतले. माजी विद्यार्थी शशिकांत शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार कांबळे यांनी प्रास्ताविक केले आणि आभार मानले. श्रीगणेशाच्या आरतीने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.