“विद्यार्थ्यांचे ज्ञान समाजाभिमुख असावे!” – प्रा. गणेश शिंदे
पिंपरी:
“गुणांची सूज म्हणजे गुणवत्ता नव्हे; तर विद्यार्थ्यांचे ज्ञान समाजाभिमुख असावे!” असे विचार सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. गणेश शिंदे यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्, चिंचवडगाव येथे व्यक्त केले.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आयोजित शिक्षकदिन सोहळ्यात पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् मधील शिक्षकवृंद आणि विद्यार्थी यांना संबोधित करताना प्रा. गणेश शिंदे बोलत होते. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, शिक्षण विभागप्रमुख प्रा. दिगंबर ढोकले, सुहास पोफळे, नितीन बारणे, जनता सहकारी बँकेचे लक्ष्मीकांत देशपांडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित गुरुकुलम् मधील पूनम गुजर, मारुती वाघमारे, अन्य शाळांमधील संगीता चव्हाण, स्मिता जोशी, कृतिका कोराम-काळे, योगिनी शिंदे, दीपाली शिंदे, सुधाकर हांडे या गुरुजनांना उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल तसेच विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. प्रमाणपत्र, ग्रंथ, पुष्प असे सत्काराचे स्वरूप होते.
प्रा. गणेश शिंदे पुढे म्हणाले की, “शाळा, शिक्षणाच्या पद्धती बदलल्या तरीही शिक्षकांंचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील स्थान आजही कायम आहे. एकेकाळी गावातील गुरुजींना संपूर्ण समाजाकडून अपार आदर आणि मानसन्मान मिळत होता. जेव्हा भररस्त्यात एखादा माजी विद्यार्थी वाकून शिक्षकांना नमस्कार करतो, तेव्हा तो शिक्षकाच्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान असतो!”
दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन, गुरुकुलम् मधील विद्यार्थिनींनी सादर केलेले स्वागतगीत आणि प्रज्ञा फुलपगार यांनी गायलेल्या पद्याने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. गिरीश प्रभुणे यांनी प्रास्ताविकातून, “डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान होते. नोबेल पारितोषिकासाठी अनेकदा त्यांचे नामांकन झाले होते. मेकॉलेप्रणीत चाकोरीबद्ध शिक्षण ही आपली अपरिहार्यता असली तरी नवीन भारत घडवण्यासाठी आपण कटिबद्ध राहिले पाहिजे!” अशी भूमिका मांडली.
श्रावणी भिसे आणि अर्णव जगदाळे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. लक्ष्मीकांत देशपांडे यांनी शुभेच्छा दिल्या.
शाहीर आसराम कसबे, राहुल बनगोंडे, हेमराम चौधरी, आरती शिवणीकर, अतुल आडे, हर्षदा धुमाळ यांनी संयोजनात सहकार्य केले. सुधाकर हांडे यांनी सूत्रसंचालन केले. सुहास पोफळे यांनी आभार मानले. चापेकर स्तवनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
- महायुतीचाच मुख्यमंत्री होण्यासाठी भाजप कार्यकर्ते काम करतील – सुनील शेळके
- अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी दाखल केला लाखोंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज
- संविधानाला धोक्यात आणण्याचे काम काँग्रेसने केले: खासदार बृज लालजीपिंपरीत घर घर संविधान उपक्रमाचा उत्साहात शुभारंभ
- बापूसाहेब भेगडे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
- शब्दवेल दिवाळी अंक बोलीभाषा विशेषांकाचे प्रकाशन