भागवत ज्ञानयज्ञाचा चिंचवड येथे प्रारंभ
पिंपरी :
“ज्याप्रमाणे सरस्वती नदी सुप्तावस्थेत आहे; त्याप्रमाणे ज्येष्ठांनी प्रपंचात अलिप्तपणे वावरावे!” असे विचार ज्येष्ठ निरूपणकार माधवराव जोशी यांनी यशोपूरम् गृहरचना संस्था सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी – चिंचवड लिंक रोड), चिंचवड येथे व्यक्त केले.

श्रावणमासानिमित्त आनंद ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड या संस्थेने रविवार, दिनांक ०३ सप्टेंबर ते शनिवार, दिनांक ०९ सप्टेंबर २०२३ या साप्ताहिक कालावधीत श्रीमद् भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन केले आहे. त्यामध्ये तुलसीदास आख्यान कथन करताना माधवराव जोशी बोलत होते.

याप्रसंगी आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर, उपाध्यक्ष अशोक नागणे, कार्याध्यक्ष प्रिया जोशी, सचिव रवींद्र कुलकर्णी, कोषाध्यक्ष रवींद्र झेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

माधवराव जोशी पुढे म्हणाले की, “ज्येष्ठांनी प्रपंचात विरक्त भावनेने राहावे. विचारल्याशिवाय कोणालाही सल्ला देऊ नये. ‘श्रीराम जयराम जय जय राम’ या मंत्राचा नित्यनेमाने जप केल्याने मन शांत होते. तसेच शरीरांतर्गत यौगिक क्रिया घडून षट्चक्रे कार्यान्वित होतात. नामस्मरणाने जीविताचा उद्धार झाल्याचे अनेक दाखले भागवत पुराणात आहेत!

” आनंद ज्येष्ठ नागरिक संघ कार्यकारिणी सदस्य नृसिंह पाडुळकर, श्याम ब्रह्मे, विजय राजपाठक, शशिकांत पानट, ज्ञानेश्वर कुसळ, सुनंदा माटे, कविता कोल्हापुरे, मधुरा गाडगीळ, अश्विनी कोटस्थाने, प्रदीप वळसंगकर यांनी संयोजनात परिश्रम घेतले.

error: Content is protected !!