शिक्षकदिन विशेष:
५ सप्टेंबर ला शिक्षक दिन साजरा केला जातो. हा दिवस शिक्षकांना त्यांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी समर्पित आहे.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.डाॅ.राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी झाला.डॉ. राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती असण्यासोबतच एक महान विद्वान, तत्त्वज्ञ आणि भारतरत्न प्राप्त करणारे होते.

१९६२ मध्ये, जेव्हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा त्यांच्या विद्यार्थ्यांनी ५ सप्टेंबर हा विशेष दिवस म्हणून साजरा करण्याची परवानगी मागितली. तेव्हा राधाकृष्णन म्हणाले, ‘माझा वाढदिवस वेगळा साजरा करण्याऐवजी हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर मला अभिमान वाटेल.’

म्हणूनच त्यांच्या इच्छेनुसार १९६२ मध्ये पहिल्यांदा शिक्षक दिन साजरा करण्यात आला.डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या आयुष्यातील ४० वर्षे शिक्षक म्हणून देशासाठी वाहून घेतली. शिक्षकांचा आदर करण्यावर त्यांनी नेहमीच भर दिला. समाजाला योग्य दिशा देण्यात खरा शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतो, अशी त्यांची धारणा होती.

खरा गुरू आपल्या शिष्याला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करायला शिकवतो आणि त्यांचे जीवन सुधारण्यात मोलाचे योगदान देतो, त्यामुळे शिक्षकांकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. शिक्षकांनी केलेल्या या सर्व योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची हा दिवस उत्तम संधी आहे.

error: Content is protected !!