सोमाटणे:
ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांबद्दल समाजात कायमच आदराचे स्थान राहिले आहे.शिक्षकांना हा आदर त्यांच्या कामातून आणि कृतीतून मिळतो. मावळ तालुक्यातील आढले खुर्द येथील असेच कृतिशील व उपक्रमशील शिक्षक म्हणून  गहिनीनाथ उत्तरेश्वर गायकवाड यांचे नाव घेतले जाते.

पदवीधर असलेल्या या शिक्षकांनी सोबतच्या सहकारी शिक्षकांच्या मदतीने शाळेत नवनवे प्रयोग राबविण्याचा संकल्प केला आहे. टाकाऊ पासून टिकाऊ म्हणा किंवा जुन्यातून नवनिर्मितीची संकल्पना या गुरुजनांनी प्रत्यक्षात उतरवली आहे.त्यांच्या या उपक्रमाचे इतरांनी केले तर विद्यार्थांना सहजतेने शिक्षणाचे धडे गिरवता येतील.

कोरोना काळामध्ये झालेली विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी भरून काढण्याकरिता,हसत खेळत शिक्षण रुजवण्याकरिता त्यांनी विविध उपक्रम राबविले. स्वखर्चाने विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही बनवण्याकरिता त्यांनी प्रोजेक्टर , साऊंड सिस्टिम खरेदी केले. प्रोजेक्टरच्या माध्यमातून विविध विषयांचे सखोल ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. त्यातून विद्यार्थ्यांना शिकण्याची गोडी निर्माण झाली.

शाळेतील बंद अवस्थेतील संगणक वर्गणी द्वारे चालू करून  दररोज चार ते पाच या वेळेत विद्यार्थ्यांचे तीन गट स्थापन करून संगणक तास सुरू केला. यामुळे संगणकाचे ज्ञान विद्यार्थ्यांना झाले. इंटरनेटच्या प्रभावामुळे विद्यार्थ्यांचे वाचनाकडे दुर्लक्ष होते हे ध्यानात घेऊन विद्यार्थ्यांकरिता ७०  विविध पुस्तकांचे फिरते ग्रंथालय तयार केले.

या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांना वाचनानंतरचा अभिप्राय नोंदवण्याची सवय झाली.आधुनिक युगामध्ये  इंग्रजी भाषेचे सखोल ज्ञान विद्यार्थ्यांना होण्याकरिता भिंतीवरील इंग्रजी पेटी तयार केली. विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची भीती दूर होऊन इंग्रजी स्पेलिंग तयार करणे;वाक्य तयार करणे ; लहान लहान वाक्याचा बोलण्यात वापर करणे हसत खेळत या उपक्रमाद्वारे शक्य झाले.

अशा विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी तर लागतेच, शिवाय त्यांची चौकस बुद्धी वाढते. तसेच जुन्या नवनिर्मितीचा धडाही आपसूक गिरवता येतो.

error: Content is protected !!