अनुभवातून साहित्यनिर्मिती: विनीता ऐनापुरे
चला जाऊ ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी:  शब्दधनचा उपक्रम
पिंपरी:
“अनुभवातून साहित्यनिर्मिती होते! त्यामुळे छोट्या गोष्टींतून मोठे अनुभव घ्यायला शिकले पाहिजे!” असे विचार ज्येष्ठ कथालेखिका विनीता ऐनापुरे यांनी किर्लोस्कर कॉलनी, यमुनानगर  येथे व्यक्त केले.

शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी…’ या उपक्रमांतर्गत कथालेखिका विनीता ऐनापुरे यांना गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ आणि ग्रंथ असे सन्मानाचे स्वरूप होते. अपंग विद्यालय, यमुनानगर या संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष विश्वनाथ वाघमोडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तर महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक – अध्यक्ष सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती.

“साहित्यिक होणे सोपे काम नाही. त्यासाठी विचारसाधना करावी लागते!” असे मत राजन लाखे यांनी मांडले; तर “शहरातील उंच इमारतींनी समृद्धी येत नाही; तर साहित्यिकांच्या विचारांनी शहराची सांस्कृतिक उंची वाढते!” असे पुरुषोत्तम सदाफुले यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना विनीता ऐनापुरे पुढे म्हणाल्या की, “वडील संस्कृतपंडित आणि मुख्याध्यापक होते; तसेच आई सुशिक्षित होती. त्यांच्या संस्कारांतून वाचनाचे बाळकडू मिळाले.

कथालेखनाला उशिरा सुरुवात झाली तरी कुटुंबीयांच्या प्रोत्साहनामुळे त्यानंतर सातत्याने लेखन होत राहिले. ‘नराधम’ या कादंबरीवर आधारित ‘कुसुम मनोहर लेले’ या व्यावसायिक नाटकाचे पाचशेहून अधिक प्रयोग झाले. त्यामुळे सर्वदूर नावलौकिक प्राप्त झाला. विविध नियतकालिके, दूरदर्शन, आकाशवाणी आणि रंगभूमी या माध्यमातून माझे साहित्य असंख्य रसिकांपर्यंत पोहोचले. नवोदित साहित्यिकांना प्रेरणा देण्याचे काम प्रस्थापितांनी केले पाहिजे!” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. विश्वनाथ वाघमोडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “मी केले असे न म्हणता माणसाने सतत कार्यरत राहावे. त्यातून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. साहित्यिकांनी नवविचार, नवप्रेरणा घेऊन काम करावे!” अशी अपेक्षा व्यक्त केली.

सुभाष चव्हाण यांनी स्वागतगीत सादर केले आणि प्रास्ताविक केले. अशोकमहाराज गोरे, बाळकृष्ण अमृतकर, आय. के. शेख, कैलास भैरट, श्रीकांत जोशी यांनी शाब्दिक तसेच शोभा जोशी, अशोक कोठारी यांनी कवितांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.  शरद काणेकर, मनीषा उगले, मुरलीधर दळवी, अद्वैत ऐनापुरे आणि सुप्रिया ऐनापुरे यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी एकोंडे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!