देव पहावया गेलो | तेथे देवचि होऊनी ठेलो ।।
साधना केल्याशिवाय उपास्य देवतेचा प्रसाद होत नाही,हे उघडच आहे.परमार्थात साधनेचे अनेक प्रकार आहेत.या सर्व प्रकारांत नामस्मरण हे साधन सर्वात श्रेष्ठ आहे.इतर सर्व मार्ग आपापल्या परी जरी खरे असले तरी त्या सर्वांत काही ना काही तरी उणेपणा असतो. शिवाय यापैकी बरेच मार्ग ‘असे असतात की,सामान्य प्रापंचिक माणसांनी त्या मार्गांनी जाण्याचा नुसता विचारसुद्धा करू नये.
१) योगयाग विधी येणें नोहे सिद्धि |
वायांची उपाधि दंभ धर्म ।।
२) तैसें नव्हें नाम सर्व मार्गावरिष्ठ । तेथे कांहीं कष्ट न लागती ।।
3) योग मार्ग धरू नका । कष्ट उरतील जे कां ।।
४) ज्ञानदेवा जिणें नामें विण व्यर्थ रामकृष्णी पंथ कमियेला ।।
ईश्वर प्राप्तीच्या साधनेचे जे अनेक मार्ग आहेत ते एकतर फार खर्चिक असतात किंवा फार कष्टप्रद असतात व शेवटपर्यंत या मार्गात टिकणे फार कठीण.नामस्मरणाचा मार्ग मात्र तसा नाही व त्यात कसलाही धोका नाही त्याचप्रमाणे नामस्मरणाला विशिष्ट अधिकारी लागतो असेही नाही.
सकळांसी एथे आहे अधिकार ।
कलियुगी उद्धार हरी नामें ।।
कोणीही,केव्हाही,कोठेही,कसेही व कुठल्याही स्थितीत नामस्मरण करावे व आपला उद्धार करून घ्यावा असे हे गोड साधन आहे.
१) नामा म्हणे फार सोपें हें साधन ।
वाचें नाम घेणें इतुकेंची ।।
२) असाल तेथें नामाचें चिंतन ।
याहून आणिक साधन नाहीं ।।
नाम हे एकच साधन असे आहे की,त्याला कुठल्याही उपाधीची उपकरणाची किंवा उपचाराची जरूरी नाही.भगवन्नाम हे स्वयंभू साधन आहे इतकेच नव्हे तर नाम हे साधन आहे व साध्यही नामच आहे.
बीज आणि फळ हरिचे नाम ।।
*साधन अवस्थेत बीजरूपाने असणारे नाम सिद्ध अवस्थेत फलरूपाने राम असते.नामस्मरणाच्या परिपक्व अवस्थेत नाम हे राम आहे असे प्रतीतील येते.नामस्मरणाच्या प्रक्रियेत नामच स्वतः ला गती देते व साधकाला भक्तीपर्यंत पोहोचविते.चालता चालता चालणारा स्वतःलाच गती देऊन वेगाने चाल लागतो व सत्वर मुक्कामाला जाऊन पोहोचतो.त्याचप्रमाणे नामस्मरण करत करता नामात आपोआप वेग येऊन त्या नामातूनच राम प्रकट होतो.
रामकृष्णहरी मुकुंद मुरारी | मंत्र हा उच्चारी वेळोवेळां ।।
येऊनी अंतरी राहील गोपाळ |
सायासाचें फळ बैसलीया ।।
‘ध्यानपूर्वक नामस्मरण झाले पाहिजे तरच ते फलदायी होते, नाही तर व्यर्थ होय’ अशा तऱ्हेचा एक समज अनेक लोकांत दिसून येतो; परंतु हा ‘समज केवळ गैरसमज असून वस्तुस्थितीला धरून नाही.आधी ध्यान व मग नाम हा क्रम मुळातच चूक आहे. आधी नाम (नाम म्हणजे स्मरण) व मग ध्यान हाच क्रम अचूक आहे. राजाच्या पाठीमागून जशी प्रजा त्याप्रमाणे नामाच्या पाठीमागून ध्यान,सुख,शांती ही प्रजा आपोआप येते.संत एकनाथ महाराज सांगतात-
नाम पाठें ज्ञान नाम पाठें ध्यान |
नाम पाठे मन स्थिर होय ।।
जगांत हे सारे नाम पाठ भक्ति ।
आणिक विश्रांति नाहीं नाहीं ।।
स्मरणाचा किंवा मनाचा काही अंश जिव्हेत आल्याशिवाय ती जिव्हा लामाचा उच्चार करण्याचे कामच मुळी करणार नाही.साधनेत अट्टाहासाने जिव्हा साधक नामाचा उच्चार पुनः पुनः करू लागतो, तेव्हा प्रभुचे स्मरण त्याच्या ठिकाणी अधिकाधिक होऊ लागते.अशा अभ्यासाने मनाचा अधिकाधिक भाग नामात आपोआप येऊ लागतो.अशा नित्य अभ्यासाने मन-बुद्धीच्या सर्व शक्ती नामात केंद्रित होऊ लागतात.मन-बुद्धीच्या शक्तीचे केंद्रीकरण हेच वास्तविक ध्यानाचे स्वरूप आहे.
असे हे ध्यान नामधारकाच्या ठिकाणी अखंड नामाचा नुसता उच्चार करता करता होऊ लागते.सूर्यकिरणांचे केंद्रीकरण भिंगाच्या ठिकाणी केल्यास तेथे अग्नी प्रगट होतो त्याप्रमाणे नामाच्या सतत उच्चाराने मन-बुद्धीच्या शक्तीचे केंद्रीकरण होऊन साधकाच्या अंतःकरणात ज्ञानाचा प्रकाश पडतो.या प्रकाशात साधकाला आपल्या मूळ स्वरूपाचा प्रत्यक्ष बोध होतो.
देव पहावया गेलो | तेथे देवचि होऊनी ठेलो ।।
तुका म्हणे धन्य झालो । आजि विठ्ठला भेटलो ।।
वाल्या कोळी,नष्ट गणिका वगैरे सर्व साधक नामाच्या नुसत्या अखंड उच्चाराने प्रभुची कृपा संपादन करू शकले आणि म्हणूनच भगवत्राम पंथराज आहे.
एक गावे आम्ही विठोबाचे नाम। आणिकाचे काम नाहीं आतां ।।
सद्गुरू श्री वामनराव पै