मानवी शरीर म्हणजे परमेश्वराची जिवंत मूर्ती

सर्वसामान्य लोक पाषाणाच्या किंवा धातूच्या मूर्तीला परमेश्वराची मूर्ती असे मानतात. प्रत्यक्षात ही परमेश्वराची मूर्तीच नसते.कारण त्या परमेश्वराचा या मूर्तीशी काडीचाही संबंध नसतो. कशाला तरी परमेश्वर मानायचे, त्याची पूजा-अर्चा करायची व ती मूर्ती विशिष्ट परिस्थितीत कृपा करते किंवा कोप करते,अशी समजूत करून घ्यायची,म्हणजे प्रत्यक्षात हा सर्व प्रकार कल्पनेचा खेळ असतो.
 
ही मूर्ती माणसाने निर्माण केलेली असून ती अचेतन असते व प्रत्यक्षात ती मूर्ती अक्षरशः काहीही करीत नाही. याच्या उलट ‘मानवी शरीर’ ही परमेश्वराने निर्माण केलेली जिवंत मूर्ती असून,ती मूर्ती अक्षरशः सर्व काही करू शकते. सूक्ष्म दृष्टीने निरीक्षण केल्यास ‘पद्धतशीर व्यवस्था’ या स्वरुपात प्रत्यक्ष परमेश्वर म्हणजे चैतन्यशक्ति (Cosmic Life Force) ‘मानवी शरीर’ या रुपाने साकार झालेली दिसून येते.

शरीर,पाच कर्मेंद्रिये, पाच ज्ञानेंद्रिये,पंचप्राण,चार अंतरेंद्रिये,कल्पनाशक्ती, भावनाशक्ती,इच्छाशक्ती,जागृती, स्वप्न,सुषुप्ती या अवस्था,स्मृति – विस्मृति अशा अलौकिक शक्ती, मानवी शरीराच्या ठायी वास करीत असतात.थोडक्यात,मानवी शरीराची अंतर्बाह्य रचना अत्यंत अलौकिक असलेली दिसून येते. अशी ही परमेश्वराने निर्माण केलेली मानवी शरीराची चालती बोलती जिवंत मूर्ती श्रेष्ठ आहे,असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे.

या संदर्भात परमेश्वराची आम्ही केलेली व्याख्या पुनः एकदा लक्षात घ्या. ‘निसर्गनियमांसहित,स्वयंचलित, स्वयंनियंत्रित,नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर.’ “पद्धतशीर व्यवस्था” यालाच इंग्रजीमध्ये (Systematized order) असे म्हणतात.सच्चिदानंद स्वरूप,अनंत,निर्गुण,अव्यक्त, निराकार असा सर्वशक्तिमान परमेश्वर (Cosmic Life Force) हा “पद्धतशीर व्यवस्था” या रुपाने विश्वात सर्वत्र व मानवी शरीराच्या ठायी प्रगट झालेला आहे.या पद्धतशीर व्यवस्थेत,योजना, रचना,कौशल्य,प्रमाण,अचूकता व सहजता असलेली दिसून येते.

थोडक्यात,मानवी शरीर म्हणजे परमेश्वराची जिवंत मूर्ती असून ते सर्वात मोठे आश्चर्य व सर्व चमत्कारांचा राजा आहे.हाच विषय विज्ञानाच्या दृष्टिकोनातून सांगता येईल.जीवनविद्या सांगते की, मानवी शरीर हे प्रत्यक्षात आहे विस्मयकारक जिवंत कॉम्प्युटर. माणूस,या जिवंत कॉम्प्युटरला ज्याप्रमाणे इष्ट किंवा अनिष्ट, विचार-उच्चार-आचार यांच्या द्वारा, जे इष्ट किंवा अनिष्ट फिडींग करतो,त्याप्रमाणे माणसाला सुख-शांती किंवा दैन्य- दुःख प्राप्त होत असते.त्याचप्रमाणे मानवी शरीर हा एक विस्मयकारक जिवंत टेपरेकॉर्डर आहे.

विचार-उच्चार -आचार यांच्याद्वारा माणसाकडून जी कर्मे निर्माण होतात ती सर्व त्याच्या सूक्ष्म जाणीवेच्या टेपवर अंतर्मनाकडून अत्यंत गुप्तपणे रेकॉर्ड केली जातात आणि हाच रेकॉर्ड माणसाचे भवितव्य ठरविण्यास कारणीभूत ठरतो.*

सद्गुरू श्री वामनराव पै.

error: Content is protected !!