पुणे :
पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान  मोदींच्या दौऱ्यानिमित्त पुण्यामध्ये जय्यत तयारी सुरु आहे. लोकमान्य टिळक ट्रस्टतर्फे लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त लोकमान्य टिळक पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

यावर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान मोदी यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पीएम मोदी हे पुण्यामध्ये येणार आहेत. यावेळी ते मेट्रो ट्रेनच्या विस्तारीत मार्गाला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा १ ऑगस्टचा पुणे दौरा निश्चित झाला आहे. १०.३० वाजता पुणे विमानतळावर त्यांचे आगमन होईल. त्यानंतर एका खासगी हेलिकॉप्टरने ते शिवाजीनगर येथे दाखल होतील. त्यानंतर सकाळी ११ वाजता पीएम मोदी दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार आहेत. यावेळी मोदींच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची पूजा आणि आरती करण्यात येणार आहे.

११.४५ वाजता पीएम मोदी टिळक स्मारक येथे लोकमान्य टिळक यांना अभिवादन करतील. त्यानंतर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचा वितरण सोहळा होईल. या सोहळ्यामध्ये पीएम मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काही प्रमुख नेते उपस्थित राहतील.

१२.४५ वाजता शिवाजीनगर येथे पीएम मोदी मेट्रो ट्रेनच्या विस्तारित मार्गाला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. वनाज ते रामवाडी या मार्गावरील गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक दरम्यानच्या टप्प्याचे ते उद्घाटन करणार आहेत.

पुणे महानगर पालिका, पिंपरी चिंचवड महानगर पालिका, पीएमआरडीए या अंतर्गत विकास प्रकल्पांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते होईल. शिवाय, प्रधानमंत्री अवास योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महागनर पालिकेच्या हद्दीत येणारे १२८० घरं आणि पुणे महानगर पालिकेच्या हद्दीत येणारी २६८० घरांचे लोकार्पण मोदींच्या हस्ते पार पडणार आहे.

error: Content is protected !!