सर्वस्पर्शी नेता
अजितदादा हे केवळ नावाने दादा नाहीत, त्यांनी त्यांच्या कार्यातून दादापण दाखवून दिले आहे.जनतेला त्यांच्या बद्दल प्रचंड विश्वास आहे.दादा, सत्तेत असो किंवा सत्तेत नसो, दादांकडील गर्दी कधी कमी झाली नाही.त्यातच दादा हे सर्वस्पर्शी नेते आहेत. त्यांना समाजाने नेते म्हणून स्वीकारले आहे.जिल्ह्यात किंवा राज्यात लोकांची कामे धडाडीने करू शकणारे नेते म्हणजे अजितदादाच,ही त्यांची प्रतिमा जनमानसात उठून दिसतेय.
आम्हा सर्वाना अगदी अंतकरणा पासून वाटते, महाराष्ट्राला अजित दादांसारखे मुख्यमंत्री लाभले पाहिजेत. त्यांच्याकडे ती क्षमता आहे.म्हणूनच राज्यभरातील दादांचे शिलेदार ‘दादांचा भावी मुख्यमंत्री ‘असे बॅनर राज्यभर झळकवित आहे.दादांचे दादापण दिवसागणिक वाढत जाऊन महाराष्ट्राचे सर्वभिमुख नेतृत्व उभे राहील असा विश्वास उभ्या महाराष्ट्राला आहे.
तळेगावात आमच्या खांडगे कुटुंबाची पाचवी पिढी. आमचे कुटूंब मुळातच काँग्रेस विचारसरणीचे. माझे आजोबा कै.लक्ष्मण तुकाराम तथा मामासाहेब खांडगे यांना यशवंतराव चव्हाण साहेब, शरदचंद्र पवार साहेब यांचा सहवास लाभला आहे. केवळ मावळ तालुक्यातच नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसशी निष्ठावान घर असा खांडगे कुटुंबाचा नावलौकिक आहे.
माझ्या महाविद्यालयीन शिक्षणानंतर पुण्यातील डॉ. सतीश देसाई यांच्या त्रिदल संस्थेच्या माध्यामातून मी तळेगावात सामाजिक कार्य सुरू केले. समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला संस्थेमार्फत मावळ भूषण पुरस्काराने गौरविण्यात येऊ लागले. या संस्थेच्या माध्यामातून एक कार्यकर्ता म्हणून समाजाला माझी ओळख झाली. आमचे कुटुंबीय काँग्रेस विचारसरणीचे असल्याने नगरपालिका, विधानसभा अशा निवडणुकीत माझा सक्रिय सहभाग असायचा.
आमची पिढी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन काम करीत होती. आम्हाला अजितदादांचे विशेष आकर्षण राहिले. दादा १९९१ मध्ये पहिल्यांदा खासदार झाले. तेव्हापासून आमचा त्यांच्याशी संबंध आला.राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सर्वात प्रथम जी प्रमुख मंडळी होती. त्यात आमचा खांडगे परिवार आघाडीवर होता. आमच्यासाठी पवार कुटुंबीय अर्थात शरदचंद्र पवार, दादा जे करतील तिच पूर्वदिशा. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी बरोबर राहिलो. त्याच दरम्यान तळेगावात मी आमचे आजोबांच्या नावाने मामासाहेब खांडगे आर्केड हे व्यापारी संकुल उभारण्याचे काम हाती घेतले होते.
या इमारतीचे भूमिपूजन अजितदादांनी करावे, अशी माझी इच्छा होती. माझे निमंत्रण त्यांनी स्वीकारले. दादा आणि सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते या संकुलाचे भूमिपूजन झाले. या माझ्या पहिल्याच कार्यक्रमात दादांचा आणि माझा जवळचा संबंध आला.सामाजिक व राजकीय कार्यकर्ता म्हणून काम करताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा तालुकाध्यक्ष होण्याची माझी इच्छा होती. त्यानमित्त माजी मंत्री मदन बाफना, ज्येष्ठ नेते कृष्णराव भेगडे यांच्याकडे मी माझी इच्छा बोलून दाखविली. तालुक्याच्या या दोन्ही नेत्यांनी माझ्या नावाची शिफारस केली होती.
त्यानंतर मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी मी दादांना भेटलो आणि त्यांनी मला ती संधी दिली. त्यानंतर अजित दादांचे नाव उंचावण्यासाठी आणि पक्षाची ताकद तालुक्यात वाढविण्यासाठी मी अनेक स्पर्धा, कार्यक्रम आणि उपक्रम राबवले. जवळपास सात वर्षे मी राष्ट्रवादी युवकचा तालुकाध्यक्ष होतो.
प्रामुख्याने दादांच्याच नावाने मी स्पर्धा, कार्यक्रम घेतले. त्यात ‘अजित श्री’ सारखी जिल्हा पातळीपासून देश पातळीपर्यंत घेतलेली स्पर्धा नेहमीच गाजली. अजित दादांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात मोठा कार्यक्रम घेणारा मी पहिलाच कार्यकर्ता होतो. अजितदादांनी माझा एकही कार्यक्रम कधी टाळला नाही. छोट्या-मोठ्या सर्व कार्यक्रमाला तसचे खासगी कार्यक्रमालाही मी बोलावल्यावर ते वेळातवेळ काढून आले. इतका जिव्हाळा त्यांनी जपला. दादांच्या वाढदिवसानिमित्त मी आमच्या शाळेतील मुलांच्या इन्शुरन्स उतरविण्याचा उपक्रम राबवला. त्याचे दादांनी खूप कौतुक केले. असा उपक्रम राज्यात राबविला गेला पाहिजे, असे ते म्हणाले. विद्या प्रतिष्ठानचे ग्रामीण भागासाठीचे संगणक प्रशिक्षण केंद्रही त्यांनी मला तळेगावात चालवायला दिले. दादांनी माझ्यावर एक कार्यकर्ता म्हणून कायम प्रेम केले. मी ही फारशी अपेक्षा न करता पक्ष संघटनेचे काम करत राहिलो. दादांचा ,माझ्यावर विश्वास दिवसागणिक वाढत गेला.
समाजहिताचे काम करत असताना चार लोक दुुखावले गेले तरी चालतील, पण समाजाचे भले होणार असल्यास तो निर्णय राबवायचा, हे त्यांच्याकडून शिकायला मिळाले. याच वृत्तीने मी समाजात काम करत राहिलो.
तळेगाव नगरपरिषदेच्या राजकारणात पहिल्यांदा सहभागी झाल्यानंतर ज्येष्ठांच्या आदेशानुसार आघाडीसाठी काही गोष्टी केल्या. त्यावेळी स्वीकृत नगरसेवक करू असा शब्द दिला. मात्र, तो हेतूपुरस्सर डावलला गेला. तरीही या संदर्भात मी दादांकडे गाऱ्हाणे नेले नाही. मात्र, याची दखल देखील दादांनी घेतली. ‘संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी गणेशला कारखान्यावर संचालक म्हणून घ्या,’ असे दादांनी आवर्जून सांगितले.
परंतु, मी ऊस उत्पादक गटात बसत नसल्याने त्यांनी कारखान्यावर माझी पत्नी सौ. अनुपमा हीला संधी देऊन एक प्रकारे मला न्याय दिला. ही माझ्या दृष्टीने आयुष्यभर लक्षात राहण्यासारखी गोष्ट आहे. ते कार्यकर्त्यांच्या जीवनावर बारीक लक्ष ठेवतात.
दादा हे सर्वस्पर्शी नेते आहेत. त्यांना राजकीय क्षेत्राबरोबर निरनिराळ्या क्षेत्रातील अफाट जाण आहे. त्यांनी अनुभवाच्या बळावर सर्व कमावले आहे. शिक्षण, क्रीडा, कामगार, उद्योग, सामाजिक, सांस्कृतिक, संगीत, कला अशा सर्व क्षेत्रांकडे ते चौकस दृष्टीने पाहतात. आमच्या पिढीत तरी इतका जनतेमध्ये मिसळणारा दादांच्या योग्यतेचा दुसरा नेता आम्हाला दिसत नाही.टीकाटिपण्णीला ते घाबरत नाहीत. मनोधैर्य खचू देत नाहीत. उलट लोक जेवढे दादांच्या अंंगावर गेले, त्याच्या दुप्पट वेगाने दादा पुढे गेले. ही मोठी ताकद दादांकडे आहे.राजकारणात त्यांचा वचक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात साहेब बॉस आहेतच पण नव्या पिढीतील राजकारण दादांभोवतीच फिरते. हे त्यांचे वेगळेपण आहे.
हे त्यांनी स्वतः कमावलेले नेतृत्व आहे.मावळ परिसरात दादा आले की, अनेकवेळा आमच्या घरी येतात. घरातील सर्व जण त्यांना नावानिशी माहिती आहेत. आम्हाला दादा बाहेरचे कधी वाटलेच नाहीत. आमचे खांडगे कुटुंबीय पवार कुटुंबीयांशी एकरूप झालेले आहे. त्यामुळे दादा किंवा साहेब घरी येणे हे आमच्यासाठी दिवाळीपेक्षा कमी नसते. त्यामुळे त्यांचा वाढदिवस ही सुद्धा आम्हा खांडगे कुटुंबीयांसाठी एक पर्वणी असते. अजितदादादांना आरोग्यवर्धक दीर्घायुष्य लाभो. तसेच त्यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याचे आम्हाला पाहायला मिळो, हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वराकडे प्रार्थना करतो.
गणेश वसंतराव खांडगे
अध्यक्ष,मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस.