मन
प्रत्येक मनुष्याला ईश्वराने किंवा निसर्गाने एकंदर चौदा इंद्रिये बहाल केली ‘आहेत.नाक-कान-डोळे आदी पांच ज्ञानेंद्रिये,हात-पाय-वाचा आदि पांच कर्मेंद्रिये व मन चित्त बुध्दी व अहंकार ही चार अंतरेंद्रिये होत.या सर्व इंद्रियांत ‘मन’ हे अंतरेंद्रिय अतीव महत्त्वाचे आहे. सर्व इंद्रियांत मन ‘मी’ आहे असे स्वतःभगवान गीतेत सांगतात.
“इंद्रियाणां मनश्चास्मि” (१० : २२ : भ.गी.) उपनिषदांनी सुद्धा मनाचे महत्त्व फारच सुंदर रीतीने वर्णन केले आहे.
मनोजातं जगत् सर्वं मन एव जगत्पती:
मन एव परब्रम्ह मन एव रमापती:
तुकाराम महाराज सुध्दा या मनाचे महत्त्व फारच बहारीने करतात.
मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धिचे कारण ||
मोक्ष अथवा भव बंधन सुख समाधान इच्छा ते।।
मने प्रतिमा स्थापिली मने मना पूजा केली ।।
मने इच्छा पुरविली । मन माऊली सकळांची ।।
मन गुरू आणि शिष्य । करी आपुलेचि दास्य ।।
प्रसन्न आपआपणास । गती अथवा अधोगती ।।
साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात ।।
नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे ।।
असे हे मन मोठे विलक्षण आहे. म्हटले तर मन आहे शंकर नाहीतर तेच आहे भयंकर म्हटले तर मन आहे हनुमान नाहीतर तेच आहे चंचल मर्कट,मन हे देव आहे तसे ते दैत्यही आहे.मन हे परममित्र आहे तसे ते मोठे शत्रूही आहे.मोक्ष प्राप्त करून देणारे मनच व भवबंधनात जखडून टाकणारे मनच.असे हे अति विलक्षण व विक्षिप्त मन प्रत्येक मानवाच्या वाट्याला आलेले आहे.
अशा जबरदस्त व बलवान मनाला वश करून घेतल्याशिवाय मानवाला तरणोपाय नाही.मन हे लहान मुलासारखे आहे,मुलाचे लाड केले तर ते लाडावून हाताबाहेर जाते,त्याला मार देत राहिलात तर ते कोडगे बनते.मुलाची उपेक्षा केली तर कुठल्या क्षणी ते काय प्रसंग आपल्यावर ओढवून आणील हे सांगता येणे कठीण आहे.आपल्या मनाचे अगदी तसेच आहे.मनाला मोकळे सोडले तर ते आपल्या डोक्यावर बसते.
जर मनाला मारण्याचा प्रयत्न केला तर ते उरावर बसते.मनाची उपेक्षा केली तर ते दबा धरून बसते व संधी सापडताच आपला घात करते. अशा विचित्र परिस्थितीत मनाचा प्रश्न कसा सोडवावा हाच मानवाच्या पुढे भला मोठा यक्ष प्रश्न आहे.म्हणूनच भल्या भल्या लोकांनी सुद्धा या मनापुढे हात टेकले आहेत तर इतर सामान्य लोकांची काय कथा? समर्थ रामदास स्वामी सांगतात,
अचपळ मन माझे नावरे आवरिता |
तुजविण शीण होतो धावरे धाव आतां ।।
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात,
बहु चंचल चपळ | जाता येता नलगे वेळ |
तुका म्हणे येणे बहु नाडीले शहाणे ।।
अर्जुनासारखा वीर कृष्णापुढे अक्षरशःरडगाणेच गातो,
चंचलं हि मनःकृष्ण प्रमाथि बलवद् दृढम् ।
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ।। (६ : ३४ : भ.गी.)*
मग प्रश्न निर्माण होतो तो असा की,या मनाचा प्रश्न सोडवायचा कसा.वास्तविक,हा प्रश्न सोडविण्यासाठीच निरनिराळी माणसे निरनिराळे प्रयत्न करून राहिली आहेत.मग त्यांना त्याची जाणीव असो किंवा नसो.प्रत्यक्षात मात्र बहुतेकांना याची जाणीव नसते.जे लोक नास्तिक असतात त्यांच्यापैकी बहुतेक जण हा प्रश्न त्यांच्या मार्गाने सोडविण्याचा प्रयत्न करतात.
“खाना पिना मजा करना, उद्याचे कोणी पाहिले आहे, देव धर्म सब झूट” या वृत्तीने चैन करून मन शांत करण्याचा ही मंडळी प्रयत्न करतात.परंतु प्रत्यक्षात मात्र चैन करणाऱ्या या लोकांच्या वाट्याला दैन्यच येते.मनःशांती मिळण्याऐवजी मनःस्वास्थ्य दिवसेंदिवस अधिकच बिघडू लागते व सरते शेवटी “बुडत्याचा पाय खोलांत” अशी त्यांची दयनीय अवस्था होते.याच्या उलट जे लोक आस्तिक असतात तेही आपआपल्या मार्गाने जाऊन मनाला जिंकण्याचा प्रयत्न करतात.
निरनिराळे पंथ,योग,संप्रदाय हे सर्व याचसाठी आहेत.उपास-तापास, व्रत-वैकल्ये,तीर्थयात्रा,पूजा-अर्चा, ग्रंथ-पोथ्यांची पारायणे,जप-तप वगैरे सर्व गोष्टी मनाला जिंकण्यासाठीच असतात.परंतु प्रत्यक्षात मात्र हे सर्व करणाऱ्या लोकांच्या पदरात केवळ कष्ट पडतात व साध्य राहते दूर. ज्याप्रमाणे बायकोला स्वाधीन ठेवण्याऐवजी तिच्या आधीन होणारा जसा बायलोबा, त्याचप्रमाणे मनाला जिंकण्यासाठी निघालेली वरील सर्व मंडळी शेवटी मनाच्याच आधीन होऊन रहातात..
अहंकार रूपाने हे मन दिवसेंदिवस अधिकच आडवे तिडवे फुगू लागते. ज्याला सोडण्यासाठी सर्व खटपट व धडपड करायची त्या अहंकारालाच चिकटून रहावयाचे व ज्याला घट्ट धरून ठेवावयाचे तो परमात्मा मात्र कधीच हातावर तुरी देऊन निघून गेलेला असावयाचा अशी परिस्थिती निर्माण होते.अशा बिकट परिस्थितीत मनाला वश करून घेण्यासाठी काय करावयाचे हा प्रश्न निर्माण होतो.याला उत्तर असे की,मनाला जे पाहिजे ते मनाला दिले की मन वश होते.यावर वाचक म्हणतील की सध्या आम्ही तेच करीत आहोत.पण मन कांही वश होत नाही,उलट ते जास्तच भडकत चालले आहे.
सध्या आम्ही काय करतो? मनाला जे पाहिजे तेच देतो.मनाला पाहिजे सिनेमा,तात्काळ मनाची मागणी मान्य.मनाला पाहिजे दारू,तात्काळ गुत्त्यात प्रयाण.मनाने मागण्याचाच अवकाश की आपण आकाश-पाताळ एक करून त्याची मागणी पूर्ण करतो.’Beg,buy, borrow or steal’ पण मनाचे मनोरथ पूर्ण झालेच पाहिजेत, अशी आपली धारणा असते.मग एवढे करूनही मन वश होत नाही हा प्रश्न उरतोच.हा प्रश्न सोडविण्यासाठी त्याकडे जरा सूक्ष्म दृष्टीने पहाणे आवश्यक आहे..
“मनाला पाहिजे ते दिले की मनाचे समाधान होते” ही गोष्ट अगदी खरी आहे.पण मुळांत अडचण अशी आहे की,मनाला काय पाहिजे तेच मनाला माहीत नाही.किरकिर व पिरपिर करणाऱ्या रडव्या मुलाला तुम्ही कांहीही दिले तरी “मला हे नको आहे” असे म्हणून ते फेकून देते.“बरं,तुला काय पाहिजे” असे जर विचारले तर ते मूल उत्तर देण्याऐवजी अधिक भोकांड पसरून रडावयास लागते.तशी या मनाची अवस्था आहे.मनाला काय पाहिजे तेच मनाला माहीत नाही. त्या अभावी कांहीतरी मिळवीत रहावयाचे,मिळाले की फेकून द्यावयाचे व परत दुसरे कांही मिळवावयाचे,ते मिळाले की तेही पुन्हां फेकून द्यावयाचे अशा चक्रात सांपडून जीवाची केविलवाणी अवस्था झाली आहे.
मनाला काय पाहिजे या प्रश्नाचे उत्तर फार सोपे आहे.मनाला पाहिजे फक्त मनाचे स्थैर्य.प्रचंड शक्तीच्या या मनाच्या घरी दुष्काळ आहे तो फक्त या स्थैर्याचा.केवळ हे स्थैर्य मिळविण्यासाठीच मन नाना प्रकारे धडपड करीत असते.कनक,कांता, कीर्ती किंवा सत्ता या सर्वांच्या प्राप्तीसाठी मन सदैव प्रयत्नशील असते.कारण त्यांच्या प्राप्तीने स्थैर्य मिळेल अशी मनाला भोळी आशा वाटत असते.याचा परिणाम असा घडतो की,मनाची हांव व धांव कधीच संपत नाही व त्याला पाहिजे असलेले स्थैर्य तेही कधीच मिळत नाही.परमार्थात तीच रड आहे.ग्रंथ पोथ्यांची पारायणे,उपास-तापास, व्रत वैकल्ये,तीर्थयात्रा,अंगारे-धुपारे वगैरे गोष्टी केल्याने मनाला स्थैर्य तर मिळत नाहीच पण ते प्रत्यक्षांत मात्र अधिकाधिक अस्थिर बनत जाते.आज मनाची अवस्था अत्यंत केविलवाणी आहे.
मोठ्या घड्याळाला असलेला लंबक ज्याप्रमाणे एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे व परत दुसऱ्या टोकाकडून पहिल्या टोकाकडे सारखा फिरत असतो.त्याप्रमाणे आपल्या मनाचा लंबक भूतकाळातून भविष्यकाळाकडे व परत भविष्यकाळातून भूतकाळाकडे असा सारखा सातत्याने भ्रमण करीत असतो.वर्तमानकाळात तो क्षणभरही स्थिर राहू शकत नाही.ज्या क्षणी मनाला स्थैर्य प्राप्त होईल त्याच क्षणी मन वर्तमानकाळात स्थिर राहू शकेल.तात्पर्य,मनाला काय हवे या प्रश्नाचा उलगडा झाला.मनाला पाहिजे स्थैर्य परंतु आतां दुसरा प्रश्न निर्माण झाला तो असा की,हे स्थैर्य मनाला कोण देऊ शकेल?याचे उत्तर असे की,मनाला स्थैर्य मिळण्यासाठी,मनाला स्थिर उभे रहाण्यासाठी वीट मिळाली पाहिजे.
सिनेमा,नाटक,तमाशा,गायन वगैरे विषय किंवा दारू,मटका,जुगार वगैरे व्यसने किंवा परमार्थातील उपास तापास,तीर्थयात्रा,यज्ञयाग, व्रत-वैकल्ये,अंगारे-धुपारे वगैरे प्रकार मनाला पाहिजे असलेली वीट देण्यास समर्थ नाहीत.याचे प्रमुख कारण असे की,हे सर्व विषय मनाला कांही काळ स्थैर्य मिळवून देतात.परंतु मुळांत हे सर्व विषयच अस्थिर असल्यामुळे मनाला अखंड स्थैर्य देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात नाही.
सद्गुरू श्री वामनराव पै.
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस