नाम माझा मित्र
उत्तम मित्र मिळणे हे फार मोठे भाग्य होय.खरा मित्र तोच की सुखाच्या व दुःखाच्या दोन्ही प्रसंगी आपणाला साथ करतो.नाहीतर सुखा समयी जवळ असणारे मित्र दुःखाच्या प्रसंगी मात्र आपले तोंड लपवितात असाच सामान्य अनुभव असतो.

म्हणूनच इंग्रजीत एक उत्कृष्ट म्हण आहे की. ” Friend in need is a friend indeed.” नामस्मरण करणाऱ्या साधकाला भगवन्नाम हा एक उत्कृष्ट मित्र असा अनुभव येतो.पृथ्वीच्या पाठीवर कोठेही अगदी निर्जन अशा प्रदेशात जरी असला तरी नामधारकाला एकलेपणा जाणवत नाही.कारण नाम हा मित्र आपणाला सर्व काळी व सर्व स्थळी सतत साथ करीत असतो.

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती |
धरूनी हाती चालविसी ।।

नामस्मरण करताना आपण एकटे आहोत असे जरासुद्धा वाटत नाही परीक्षित राजाला दंश करणरा भला मोठा तक्षक सर्प सूक्ष्म रूप धारण करून लहानशा बोरात बसून होता, त्याप्रमाणे सर्वव्यापक परमात्मा अत्यंत सूक्ष् स्वरूपात नामात वास करून राहतो.

चौदा भुवने जया पोटी | तो राहे भक्ताचिय कंठी।।

नामाचा सहवास जसाजसा वाढू लागतो तसातसा नामात प्रभुचा वास आहे याची नामधारकाला अधिकाधिक प्रचीती येऊ लागते. त्याचप्रमाणे नामस्मरण जसे जसे अधिक होऊ लागते तसे तसे नामाचे सानिध्य गोड वाटू लागते. नामाशी चाललेला हा ‘एकांत’ मोडूच नये असे साधकाला तीव्रतेने वाटते.

लोकांचा सहवास टाळण्याकडे वृत्ती होऊन नामाचा सहवास वाढवण्याकडे प्रवृत्ती बळावू लागते.जन्मभर नाम साथ देते इतकेच नन्हे तर मृत्यूच्या बांक्या समयी सुद्धा ते नामधारकाचा त्याग करीत नाही,किंबहुना नामाचे खरे महत्व आणि माहात्म्य त्याच वेळेस अनुभवास येते.

याचसाठी केला होता अट्टाहास ।
शेवटचा दिवस गोड व्हावा.

ज्याचे सर्व आयुष्य गोड असते त्याचा शेवटचा दिवस सुद्धा गोडच होतो;परंतु ज्याचे आयुष्य रडण्यात, दुखण्यात,काळजीत किंवा चिंतेत गेले त्यांचा शेवटचा दिवस गोड होणेच शक्य नाही.अखंड नामस्मरण करणारा नामधारक हा सुख-दुःखाच्या पलीकडे जाऊन स्वरूपी स्थिर झालेला असतो. आनंदस्वरूप अशा नामाच्या सहवासात तो आनंदाची दीपावली नित्य साजरी करीत असतो,

विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी ।।

देहावर जरी मृत्यूची सावली पडली तरी सुद्धा हा शांत असतो.याचे कारण नामरूपाने राम जवळ असतो व साधकाला मृत्यूचा जरासुद्धा उपसर्ग होणार नाही याची पूर्ण काळजी घेतो.इतकेच नव्हे तर मृत्यूनंतर सुद्धा नाम साधकाला सोडीत नाही.

एका जनार्दनी सर्व नाशिवंत ।
एकची शाश्वत हरिनाम ।।

पुढच्या जन्मात नाम साधकाला साथ देऊन अंती ते त्याला महावैकुंठापर्यंत घेऊन जाते,

नष्ट गणिका राम म्हणे |  तिसी वैकुंठीचें पेणें ।।

सद्गुरू श्री वामनराव पै

error: Content is protected !!