“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग २६ वा”
शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी।
धरोनि श्रीहरी जपे’ सदा।।

या चरणात ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात ते पाहूं.

वाचा किंवा वाणी एकंदर चार प्रकारच्या आहेत. त्या म्हणजे वैखरी, मध्यमा, पश्यंती व परा.

मोठ्याने जिव्हा हलवून केलेला जप हा “वैखरी” वाणीचा जप. जिव्हा किंचित् हलवून कंठातल्या कंठात केलेला जप हा “मध्यमा” वाणीचा जप. जिव्हा किंवा कंठात कसलीही हालचाल न करतां मनातल्या मनात केलेला जप हा *”पश्यंती” वाणीचा जप व *या तीन वाणींच्या पलीकडे होणारा स्फुरद्रूप जप हा “परा” वाणीचा जप होय.*

या पहिल्या तीन वाणी, ”जीववाणी” असून शेवटची परा वाणी ही ”देववाणी” होय. याचा अर्थ असा की, पहिल्या तीन प्रकारच्या वाणीत जीव जप करू शकतो, परंतु परा वाणीत जीवाला जप करणे केवळ अशक्य आहे. सर्वसाधारणपणे नामस्मरणाचा अखंड अभ्यास करणारा नामधारक आलटून पालटून पहिल्या तीन वाणीत जप करीतच असतो. अशा अखंड नामस्मरणाच्या अभ्यासाने प्रभुची कृपा होऊन शेवटची परा वाणी अकस्मात उघडली जाते.

ही परा वाणी उघडली जाणे हे परमभाग्य होय. पूर्वपुण्य थोर असेल तर अल्प प्रयत्नाने अल्प काळात ही वाणी अकस्मात उघडली जाते. “थोर पूर्वपुण्य” असा जो उल्लेख केला आहे त्याचा भावार्थ असा की, पूर्वायुष्यात साधकाचा नामस्मरणाचा अभ्यास झालेला असला पाहिजे; परंतु तसे पूर्वपुण्य गाठी नसेल तर मात्र साधकाला विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे.
तात्पर्य, परा वाणी उघडण्यासाठी पहिल्या तीन वाणीत नामस्मरणाची तपस्या होणे आवश्यक आहे.

परा वाणी उघडल्यावर नाम साधकाच्या नसानसांतून, रोमारोमातून घुमू लागते. अणू फोडल्यावर ज्याप्रमाणे विद्युत शक्ती निर्माण होते त्याप्रमाणे नामाच्या परा वाणीतील उच्चाराने सर्व शरीरात जे दिव्य स्पंदन होते, दिव्य लहरी (Divine Vibrations) निर्माण होतात त्या दिव्य स्पंदनांनी शरीरातील सर्व अणू, रेणू व रसरेणूचे भेदन होऊन साधकाच्या शरीराचे विद्युतीकरण (Electrification) होते.

ही वाणी उघडली की, …. साधकाला अद्भुत अनुभव प्राप्त होतो; तो असा की, नामजप प्रत्यक्ष न करतां, नाम घ्यावयाचे नाही असा (कौतुकाने) हट्ट धरून सुद्धां, नामजप करण्याचा प्रयत्न न करतां, अंतरात नामजप आपोआप चालल्याचा अनुभव येतो व तो कानाला स्पष्टपणे ऐकू येतो.

या ठिकाणी मोठी मौज होते. इतके दिवस म्हणजे परा वाणी उघडेपर्यंत, “मी” नामजप करीत होतो व जप ”देव” ऐकत होता. परंतु आता म्हणजे परावाणी उघडल्यावर ”देव” जप करतो व ”मी” तो आरामात बसून ऐकतो.

उत्तर हिंदुस्थानातील निष्ठावंत नामधारक जो कबीर त्याने नेमका हाच अनुभव एके ठिकाणी वर्णन केला आहे. तो म्हणतो-
राम हमारा जप करे। हम बैठे आराम।।

कबीरांचे हे उद्गार व ज्ञानेश्वर महाराजांचे,
ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी।
धरोनी श्रीहरी जपे सदा।।
हे वचन जर एकमेकांशी ताडून पाहिले तर या दोन श्रेष्ठ संतांचा अंतरीचा अनुभव कसा एक होता हे आढळून येईल. परावाणी उघडल्यावर नाम नसानसांतून, रोमरोमांतून सर्व देहात घुमू लागते, सकल शरीरात दुमदुमू लागते व जीवाची पूर्वी असणारी ही देह नगरी आतां विठुरायाची पंढरी होते.

सर्व देह नामरूप होणे यासारखे भाग्य, नामस्मरणाच्या थोड्या अभ्यासाने मिळत नाही. त्यासाठी अट्टाहासाने अखंड नामस्मरण करीत रहावे लागते. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सर्वांना जिव्हाळ्याने उपदेश करतात-
हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।
पुण्याची गणना कोण करी।। *--- सद्गुरू श्री वामनराव पै* *✍️ स. प्र. (sp)1087*

error: Content is protected !!