“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग २७ वा”

अभंगाचा भावार्थ :
*➡️ अर्धघडी सुद्धां रिकामे न राहता सर्वकाळ नामस्मरण करीत रहाणे, हाच सर्वसुखाची गोडी चाखण्याचा मार्ग आहे, असा साही शास्त्रांचा निवडून काढलेला सारभूत विचार किंवा सिद्धांत आहे.
*➡️ हरिप्राप्तीविण जन्म-मरणाच्या येरझारा व्यर्थ असून, मांडलेला संसाराचा व्याप व त्यासाठी केलेला सर्व व्यवहार म्हणजे जिवाची-स्वत:ची व्यर्थ फसवणूक होय.
*➡️ नाममंत्राच्या जपाने जीवाची असंख्य पूर्वपापें लयाला जातात. म्हणून तू रामकृष्ण नामजपाच्या संकल्पाला धरून रहा.
*➡️ विषयांच्या मोहात तुझी वृत्ती अडकलेली आहे, तिला कसलीही माया न दाखवता तेथून बाहेर काढ. हे करीत असता तुझी इंद्रिये बिथरतील, त्यांच्या पाशात अडकविण्याचा ती प्रयत्न करतील, परंतु तू मात्र त्यांच्या आहारी जाऊ नकोस.*
➡️ यासाठी तीर्थव्रतांचा तुला उपयोग होईल. म्हणून तुझा त्यावर भाव असू दे. करुणा, शांती, दया हे गुण अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण त्यामुळेच तुझ्या घरी हरि पाहुणा म्हणून येईल, म्हणजे तुझ्या अंत:करणात प्रभु प्रगट होईल.
➡️ ककज्ञानेश्वर महाराज सांगतात, हरिपाठ हा साधकाला संजीवन समाधी देणारा आहे, हे ज्ञान मला निवृत्तिनाथांच्या कृपेने प्राप्त झाले व ते मला सर्वस्वी प्रमाण आहे.

🌻थोडक्यात स्पष्टीकरण :
हा शेवटचा अभंग अत्यंत महत्त्वाचा आहे व ज्ञानेश्वर महाराजांनी त्यात आपला जीव ओतला आहे.

सर्वांचे कल्याण व्हावे, सर्व सुखी व्हावे, ही ज्ञानेश्वर महाराजांची अंतरीची तळमळ आहे.
ज्ञानेश्वरी सारखा अपूर्व ग्रंथ लिहिला व त्याचा मोबदला विश्वात्मक देवाजवळ काय मागितला?
सर्वसुखी सर्वभूतीं संपूर्ण होईजे।
एवढेच त्यांनी प्रभुजवळ आर्ततेने मागितले.

हरिपाठाच्या या शेवटच्या अभंगात सुद्धां ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला मोठ्या कळकळीने उपदेश केला आहे व त्याच्या कल्याणाचा मार्ग स्पष्ट शब्दांत सांगितला आहे. या जगात माणसाचे दोन वर्ग आहेत, एक आस्तिक व दुसरा नास्तिक. आस्तिक म्हणतो मला गोविंद पाहिजे, तर नास्तिक म्हणतो मला आनंद पाहिजे. आस्तिक म्हणतो मला देवाचे मुख कधी पहावयास मिळेल, तर नास्तिक म्हणतो मला न संपणारे सुख कधी मिळेल.

वास्तविक, आस्तिकाला जे पाहिजे तेच नास्तिकाला हवे; परंतु दोघांची भाषा वेगळी इतकेच काय ते! एकाने Mango पाहिजे म्हणणे व दुसऱ्याने आंबा पाहिजे म्हणणे, यांत भाषा काय ती वेगळी असून जी वस्तू पाहिजे ती एकच आहे.

त्याचप्रमाणे आस्तिक असो की नास्तिक असो, दोघांना एकच वस्तू पाहिजे व ती म्हणजे सुख. नास्तिक सुख बाहेरून मिळविण्याचा प्रयत्न करतो तर आस्तिक तेच ”आंतून” मिळवितो.

पहिल्या दोन चरणांत ज्ञानेश्वर महाराज साही शास्त्रांचा आधार घेऊन हेच सांगतात-
सर्वसुख गोडी साही शास्त्रे निवडी।
रिकामा अर्धघडी राहू नको।।
(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स. प्र. (sp)1088

error: Content is protected !!