बहु रूढींचे दर्शन म्हणजे भारूड
पिंपरी:
“बहु रूढींचे दर्शन म्हणजे भारूड होय! लोकरंजनाच्या आणि मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यासाठी एकनाथ महाराजांनी भारुडे रचली!” असे प्रतिपादन भारूडसम्राट ह. भ. प. लक्ष्मणमहाराज राजगुरू यांनी केले.
जय भवानी तरुण मंडळ आयोजित सहा दिवसीय फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेत ‘अरे अरे माणसा तू कधी होशील रे माणूस? जगण्याचे अंतिम सत्य!’ या विषयावरील पंचम पुष्प गुंफताना लक्ष्मणमहाराज राजगुरू यांनी बहुरंगी अन् बहूढंगी भारुडांचे सादरीकरण करीत श्रोत्यांना खळखळून हसवत अंतर्मुख केले.
शाहीर प्रकाश ढवळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच देवेंद्र तायडे, संपत देशमुख, उद्योजक भगवान पठारे आणि जय भवानी तरुण मंडळाचे अध्यक्ष मारुती भापकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
ह. भ. प. लक्ष्मणमहाराज राजगुरू म्हणाले की, “परमेश्वराने दुर्लभ असा नरदेह आपल्याला दिला आहे. या देहाचे सार्थक करण्यासाठी माणसासारखे जगा अन् माणसासारखे वागा. ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ असे संत नामदेव महाराजांनी सांगितले; पण तरुण डीजेच्या तालावर नाचतात अन् वारीकडे दुर्लक्ष करतात. व्यसन ही फॅशन झाली आहे.
गुटखा, तंबाखू खाऊन तरुण नपुंसक होऊ लागले आहेत. मांसाहार, मद्यपान हे राक्षसी प्रवृत्तीचे लक्षण आहे. अल्प कष्टात ऐशोआराम करण्याची सवय वाढत चालली आहे. त्यासाठी दांभिकतेने भक्तीचे प्रदर्शन केले जाते. ज्या ईश्वराने ही सृष्टी निर्माण केली त्याला बोकड, कोंबड्याचा बळी दिल्याने तो पावणार आहे का? स्त्रीभ्रूणहत्या थांबली पाहिजे.
संस्कृतीचा ऱ्हास रोखण्यासाठी समाजाला संतविचारांची गरज आहे. मृत्यूनंतर माणूस प्रपंचातील एक फुटकी कवडीदेखील सोबत घेऊन जाऊ शकत नाही. भगवंताची भक्ती किंवा देशभक्ती करून जन्माचे सार्थक करा. अंत:करणात ईश्वराला स्थान दिले; तर षड्विकार दूर होतील. जोपर्यंत वारकरी संप्रदाय जिवंत आहे; तोपर्यंत महाराष्ट्र जिवंत आहे!”
कडकलक्ष्मी, गोंधळी, सुईण,बुरगंडा,वेडी, बहुरूपी अशा विविध भूमिका साकारत राजगुरू यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. भक्तिगीते, कबीराचे दोहे, अभंग, गवळण, भारुडे यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकाऱ्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वैभव मदने या बालव्याख्यात्याने आपल्या छोटेखानी व्याख्यानाने श्रोत्यांना प्रभावित केले. शाहीर प्रकाश ढवळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “भारतीय संस्कृतीचा प्रसार अन् प्रचार तसेच महापुरुषांचा वैचारिक वारसा भावी पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी व्याख्यानमाला हे एक प्रभावी माध्यम आहे. फुले – शाहू – आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमाला हे कार्य पंचवीस वर्षांहून अधिक काळ सातत्याने करीत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे!” असे गौरवोद्गार काढले.
जय भवानी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी संयोजनात परिश्रम घेतले. राजेंद्र घावटे यांनी सूत्रसंचालन केले. मारुती भापकर यांनी आभार मानले.
- मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटी जाहीर
- ले.डॉ.संतोष गोपाळे यांची दिल्ली येथे होणाऱ्या एनसीसी शिबिरासाठी महाराष्ट्र संघाचे मार्गदर्शक म्हणून निवड
- वडगाव मावळच्या न्यू इंग्लिश स्कूलचे चित्रकला स्पध्रेत यश
- अनुसया दत्तात्रय निंबळे यांचे निधन
- संक्रातीच्या निमित्ताने प्रशांत भागवत मित्र परिवाराच्या वतीने तिळगुळाचे वाटप