२३ मेपासून मधुश्री व्याख्यानमाला
पिंपरी:
मधुश्री कला आविष्कार आणि प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने २३ मे ते २५ मे २०२३ या कालावधीत तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. कॅप्टन कदम सभागृह, स्वातंत्र्यवीर सावरकर सदन, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे दररोज सायंकाळी ठीक ६:०० वाजता व्याख्यानं होतील.

व्याख्यानमालेचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
मंगळवार, दिनांक २३ मे रोजी पुष्पा नगरकर ‘संत साहित्यातील गौळणी’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफतील. बुधवार, दिनांक २४ मे रोजी गजानन पातुरकर एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून ‘हास्यविनोदातून समाजप्रबोधन’ हा विषय मांडतील. व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प गुरुवार, दिनांक २५ मे रोजी डॉ. सुरेश बेरी ‘पर्यावरण’ या विषयावर गुंफणार आहेत. अनुक्रमे शैलजा मोरे (माजी उपमहापौर), शर्मिला बाबर (माजी नगरसेविका) आणि आर. एस. कुमार (माजी महापौर) अध्यक्षस्थान भूषविणार असून नीलेश शिंदे, अरुण थोरात आणि गीता आफळे यांची प्रमुख उपस्थिती राहील.

तेराव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या आणि विनाशुल्क असलेल्या या व्याख्यानमालेचा लाभ सर्व नागरिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन मधुश्री कला आविष्कारच्या अध्यक्ष माधुरी ओक यांनी केले आहे.

error: Content is protected !!