“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग १९ वा”
तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात —
हरिपाठी गेले ते निवांतचि ठेले।
भ्रमर गुंतले सुमनकळिके।।
कमलकंदातील मकरंद सेवन करण्यासाठी भ्रमर त्यात प्रवेश करतो व तेथे तो इतका रमतो-रंगतो की, कमळाच्या पाकळ्या केव्हां मिटल्या गेल्या हे त्याला कळतही नाही. तो भ्रमर कमळात प्रवेश करून कमळाशी एकरूप होतो, शांत होतो.
त्याचप्रमाणे
➡️ नामाच्याद्वारे नामधारक प्रभुचरणकमळात प्रवेश करतो व देवाचे प्रेमसुख भोगण्यात इतका रंगून व रमून जातो की, त्याचे जीवपण संपून देवपणात कधी रूपांतर होते हे त्याला कळतही नाही. प्रभुचरणी प्रेमसुख सेवन करतां करतां साधक हरिरूप होतो, निवांत होतो, शांत होतो.
शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र।
यमे कुळगोत्र वर्जियेले।।
सुदर्शन चक्र हे भगवंताच्या हातातील श्रेष्ठ शस्त्र आहे. त्याचप्रमाणे …..
🙏 भगवन्नाम हे नामधारकाच्या हातातील सामर्थ्यशाली शस्त्र आहे. नामाचे चक्र एकदा का गतिमान होऊन आपल्या जीवनात वेगाने फिरू लागले की अमंगल, अपवित्र व अहितकारक अशा जीवनात पाप आणि ताप निर्माण करणाऱ्या कुठल्याही गोष्टींना नाम जवळ येऊ देत नाही. व म्हणून ….
➡️ यम त्याच्याकडे वाकड्या नजरेने तर पाहूच शकत नाही पण त्याचे कुळ-गोत्र हे सुद्धां तो वर्ज्य करतो.
याचा भावार्थ असा की,
✅ नामाने जे प्रतिभा ज्ञान साधकाला मिळते, प्राप्त होते, त्या ज्ञानाच्या प्रकाशात त्याला आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार होतो व त्याचबरोबर स्वत:च्या अमरत्वाचाही बोध होतो.
➡️ या बोधामुळे त्याला यमाची भीती बाळगण्याचे कारणच उरत नाही. *झाला प्रेतरूप शरिराचा भाव।* *लक्षियेला ठाव स्मशानिचा।।* *रडती रात्रंदिवस कामक्रोध माया।* *म्हणती हाय हाय यमधर्म।।*
कारण यमाची सत्ता देहावर चालते व नामधारक देहाच्या पलीकडे स्वरूपी वास करतो.
परेहुनि परते घर। तेथे राहू निरंतर।।
असे नामदेव महाराज सांगतात.
➡️ जी गोष्ट नामधारकाची तीच गोष्ट त्याच्या कुळगोत्राची. कुळगोत्र या शब्दाने त्याचे केवळ रक्ताचे संबंधी असा अर्थ नाही. नामधारकावर जे प्रेम करतात, त्याचा आदर करतात व त्याच्याविषयी आपलेपणा बाळगतात ते त्याचे खरे “नातलग, कुळगोत्र” किंवा “संबंधी” होत.
💠 नामधारकाच्या संगतीने व त्याच्या उपदेशाने या सर्व संबंधीजनांना नामाची गोडी लागते व अंती त्यांना सुद्धा नामाच्या प्रसादाने स्वरूपाचा साक्षात्कार होऊन स्वतःच्या अमरत्वाचा बोध होतो.
👏 देहाच्या पलीकडे स्वरूपी स्थिर झालेले हे सर्व संबंधीजन नामधारकाप्रमाणेच यमाच्या तावडीतून आपोआप निसटतात. नामाचे हे माहात्म्य ओळखूनच ज्ञानेश्वर महाराज सर्वाना उपदेश करतात- *हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।* *पुण्याची गणना कोण करी।।* *--- सद्गुरू श्री वामनराव पै* *✍️ स. प्र. (sp)1063*
- कामशेतच्या आश्रमशाळेत पिकणार फळभाज्या
- ॲड.बापूसाहेब भोंडे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न : डॉ.अशोक खाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली जीवनगाथा
- प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनात स्पर्धा परिक्षेची तयारी आवश्यक – संतोष खांडगे
- संत तुकाराम महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र बोटा येथे आज जाणार
- चिंचवडच्या ज्येष्ठ नागरिकांनी घालविला वृद्धाश्रमात दिवस