“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग १९ वा”
नामजपाव्यतिरिक्त अनेक प्रकारचे मंत्रजप असतात. हे मंत्र विधिविधानपूर्वक जपले तरच फळले तर फळतात. पण जर का त्यांत थोडीशी चूक झाली तर हित होण्याऐवजी अनहित मात्र होते. *अबद्ध मंत्र जपतां जापक चळे।* *अबद्ध नाम म्हणतां जडमूड उद्धरले।।*
ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या चरणात सांगतात-
जप तप कर्म हरिविण धर्म।
वाउगाची श्रम व्यर्थ जाय।।
असे संत बजावून सांगतात.
खुद्द ज्ञानेश्वर महाराजांनी अन्य ठिकाणी सांगितले आहे-
अशौचिया जपो नये। आणिकांते ऐको नये।
ऐसीया मंत्रातें जग बिहे। याचे फळणे थोडे।
परि शोभणे बहू। तैसा नव्हे हा मंत्रराज।रे रे।।
मंत्रजप व नामजप यांत फार फरक आहे. मंत्रजपात जी अनेक बंधने आहेत ती नामजपात नाहीत. नामाचा जप कोणीही, केव्हाही, कोठेही, कसाही केला तरी तो फळतो. याच्या उलट मंत्रजप विधिविधानपूर्वक करावा लागतो आणि त्याशिवाय त्याला इतर बरीच बंधने असतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज नामाला “मंत्रराज” म्हणतात.
तात्पर्य, नाम-जपाव्यतिरिक्त केलेले इतर मंत्रांचे जप व्यर्थ होत. त्याचप्रमाणे
नाममार्ग सोडून देहदंडनाचा, तपाचा मार्ग अनुसरल्यास संतापाशिवाय दुसरे काहीच पदरात पडत नाही. फारच झाले तर क्षुद्र सिद्धी प्राप्त होतात. पण त्याही साधकाला अंती नागवतात.
तीच गोष्ट कर्माची, विधिनिषेधपूर्वक केलेल्या कर्माने केवळ फजिती मात्र होते. निषेध टाळण्याचा प्रयत्न केला तर विधी होत नाही व विधी साधण्याच्या प्रयत्नांत निषेध टाळता येत नाही. म्हणून हरिप्रेमाविण केलेले कर्म व्यर्थ होय.
धर्मासंबंधीही असेच आहे.धर्माचे वर्म न समजता केलेला धर्म हा धर्म नसून अधर्म होय. नाम हे धर्माचे वर्म आहे. *निजधर्म चोखडा। नाम उच्चारूं घडघडा।।*
नामाच्या उच्चारात चोख धर्म आहे असे ज्ञानेश्वर महाराजांनी अन्य ठिकाणी सांगितले आहे. प्रेमपूर्वक भगवंताचे स्मरण, नामस्मरण, हाच खरा स्वधर्म होय. जगात दिसणारे निरनिराळे धर्म हे या स्वधर्माची रूपे होत.
✅ खरा धर्म म्हणजे “स्वधर्म” होय, असे समर्थ रामदास स्वामींनी सांगितले आहे.
सकल धर्मामाजी धर्म।
स्वरूपीं राहणें हा स्वधर्म।।
👏 स्वरूपाची धारणा ज्याने होते तो “स्वधर्म”. स्वरूपाच्या नित्य स्मरणाने ही धारणा प्रत्ययास येते. म्हणून “स्वरूप स्मरण” हा स्वधर्म आहे. स्वरूप स्मरणाची क्रिया नामाने घडते म्हणून ”भगवन्नाम” हाच खरा स्वधर्म आहे.
धर्माधर्मातील भेद, तंटे-बखेडे व त्याकरितां होणाऱ्या लढाया व युद्ध हे सर्व प्रकार स्वधर्माच्या विस्मरणामुळेच होतात.
वास्तविक, धर्म म्हणजे स्वधर्माचे प्रकटीकरण होय.” आकाशाकडे पाहून “Oh Father in Heaven” (हे आकाशातील बापा) अशी चर्चमध्ये देवाला प्रेमाने हांक मारणारा ख्रिश्चन, कान धरून गुडघ्यावर नमाज पडणारा मशिदीतील मुसलमान व देवळात जाऊन मोठ्याने घंटा वाजवून देवाची प्रार्थना करणारा हिंदू, हे एकाच परमेश्वराचे स्मरण आपापल्या पद्धतीप्रमाणे करीत असतात.
म्हणून ईश्वरस्मरण हा स्वधर्म आहे व या स्वधर्मात सर्व धर्म एकरूप आहेत. हे वर्म लक्षात घेतल्यास धर्माधर्मांतील विरोध पार मावळून जातील, तात्पर्य, नाम हे धर्माचे वर्म आहे व म्हणून नामावाचून धर्म व्यर्थ होय.
(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स.प्र. (sp)1062
- लोणावळ्यातील दाऊदी बोहरा समाजाने सर्व केला मिलाद-उन-नबी (SA) साजरा
- वातावरणातील बदलानुसार भात पिकावरील कीड रोग व्यवस्थापन करा
- जपान आस्थापन सदस्यांची चैतन्य इंटरनॅशनल स्कूलला सदिच्छा भेट
- कार्ल्यात रंगला लेकी मागण्याचा पारंपरिक खेळ
- कार्ला परिसरात गौरी व गणरायाला भावपूर्ण निरोप गणपती बप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या जयघोष