काखेत कळसा- गावाला वळसा!
परवा एक मुंबईची बातमी मी वाचली!  एका ठिकाणी एक भिकारी रस्त्याच्या कडेला बसून वीस- पंचवीस वर्षे भीक मागत होता आणि तो एके दिवशी अचानक मरण पावला! त्याने मी एक सम्राट कधीतरी होईल अशी इच्छा एका चिठ्ठीत लिहून ठेवलेली होती.

तो भिकारी मेल्यानंतर  मुंबई महानगरपालिकेचे अनेक कामगार त्या जागेवर आलेत! त्याची जागा साफ करताना एका चिठ्ठी बरोबरच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण जवळजवळ एक वर्षभराचा महापालिकेचा त्या भागाचा खर्च भागेल एवढ्या फिक्स डिपॉझिट च्या पावत्या- सोन्या-चांदीची काही नाणी आणि दागिने- काही नोटा  असा प्रचंड खजिना त्यांना सापडला.

याचा उपयोग वास्तविक तो खरोखर सम्राट म्हणून करू शकला असता! हे सर्व बघितल्यानंतर त्या जागा साफ करणाऱ्या कामगारांना प्रश्न  पडला की माणसं अशी का वागतात? म्हणून त्याच वेळी एक जैन साधू जात असताना हाच प्रश्न त्यांनी त्या महाराजांना विचारला! त्यांनी फार सुरेख उत्तर दिलं! ते म्हटले या प्रश्नाच उत्तर सरळ आहे कि– तो जो भिकारी होता तो परिस्थितीनं नाही तर –प्रवृत्तीने भिकारी झालेला होता.

पुढे साधुमहाराज असे म्हणाले की आता त्याच्या विषयी चर्चा करणं सोडा–  त्या ऐवजी आपापल्या घरी धावत जा आणि तिथली जमीन खोदा बघा तिथे काही मिळतं आहे का? पुढे जाऊन साधूंनी त्याचं स्पष्टीकरण फारच सुरेख असं केलं की –आपण दुसऱ्याच्या जमिनीकडे बघत असतो! त्यांच्याकडून काहीतरी सारखं मागत असतो.

तसं पाहिलं तर आपण जिथे राहतो तिथेच खूप वेगळ्या प्रकारचं असं धन उपलब्ध असतं की जे पैशात मोजता येत नाही! नाण्यात मोजता येत नाही! दागिन्यात मोजता येत नाही! मित्रांनो ते म्हणजे– एकमेकांविषयी वाटणार प्रेम!-श्रद्धा आत्मीयता! पण आपलं दुर्दैव अस आहे की- तुझ आहे तुजपाशी परी तू जागा विसरलसी!

त्यामुळे पत्नी पतीला प्रेम मागते! मित्र मित्रा जवळ प्रेमाची याचना करतो! वास्तविक ज्यांच्याजवळ काहीच नसतं त्यांच्याकडेच आपण मागण्याची  इच्छा व्यक्त करतो! वास्तविक आपल्यापासून आपण ती सुरुवात करू शकतो! पण त्याची जाणीव नसल्यामुळे तेच देण्याची कृती आपल्याकडून होऊ शकत नाही.

म्हणजेच काखेत कळसा गावाला वळसा! मित्रांनो साधूने सांगितलेली ज्यावेळी ती कृती  आपल्याकडून घडेल तो निश्चितच आपल्या दृष्टीने सुदिन असेल! तो सुदिन लवकर यावा हाच आपला आजच्या चिंतनाचा  विषय आहे तो निश्चितच आपल्या पर्यंत पोहोचला असेल म्हणून मी इथेच थांबतो धन्यवाद
(शब्दांकन-ला.डॉ.शाळीग्राम भंडारी, तळेगाव दाभाडे)

error: Content is protected !!