“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग १९ वा”

अभंगाचा भावार्थ :
*➡️ नारायण नामाचा जप हेच एक सर्व साधनांचे सार आहे. या सिद्धांताला वेद, श्रुती व शास्त्र यांतील वचन प्रमाण आहे.
*➡️ हरिविण म्हणजे हरिनामाविण केलेली जप, तप, कर्म व धर्म आदी सर्व साधने म्हणजे व्यर्थ श्रम होय व अंती त्यांचा कांहींच उपयोग होत नाही.
*➡️ याच्या उलट जे हरिपाठी गेले, हरिनामस्मरणाचा मार्ग ज्यांनी चोखाळला, ते कमलकलिकेत शांत झालेल्या भ्रमराप्रमाणे निवांत झाले.
*➡️ ज्ञानेश्वर महाराज सांगतात की, हरिनाम मंत्र हे सामर्थ्यशाली शस्त्र नामधारकाच्या हाती असल्याने प्रत्यक्ष यम सुद्धा त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहूं शकत नाही.

🌻थोडक्यात स्पष्टीकरण : *वेदशास्त्रपुराण श्रुतीचे वचन।* *एक नारायण सार जप।।*

हरिपाठांतून ज्ञानेश्वर महाराजांनी हरिनामस्मरणाचा उपदेश सर्वांना त्यांच्या कल्याणार्थ केला आहे. त्यांनी सांगितलेल्या नामजपाच्या सिद्धांताला वेद-शास्त्राचा आधार असेल कां असा प्रश्न जर कोणाला पडला, तर त्यांच्या निरसनार्थ ज्ञानेश्वर महाराज पहिल्या चरणात सांगतात की, …..

नामजप हे सर्व साधनांचे सार आहे, या सिद्धांताला वेद, शास्त्र, पुराण व श्रुती यांत पूर्ण आधार आहे. वेदशास्त्रसंमत असाच हा सिद्धांत आहे.

*✅ सामान्य जनांचा उद्धार करण्यासाठी संतांनी खोल विचार करून उत्कृष्ट असा मार्ग शोधून काढला.
संतांनी लावलेला नामाचा शोध हा अक्षरश: अपूर्व आहे. *”नाम” हा संतांनी लावलेला फार मोठा विलक्षण शोध आहे. या नामाने मानव जातीची उन्नती साधणे शक्य असून मानवजातीला शांतीसुखाचे वरदान देण्यास ते समर्थ असते.*

त्याचप्रमाणे नामाचा अधिकार सर्वांना असून ते गरीब, श्रीमंत सर्वांना उपलब्ध आहे. *ऐके रे जना। तुझ्या स्वहिताच्या खुणा।।* *पंढरीचा राणा। मना माजी स्मरावा।।* *मग कैचें रे बंधन। वाचे गाता नारायण।।* *भवसिंधू तो जाण। येचि तीरी सरेल।।* *सकल शास्त्राचे सार। हें वेदांचे गव्हर।।* *पाहतां विचार। हाचि करिती पुराणे।।*

किंवा
वेदांचा संवाद श्रुतींचा अनुवाद।
नामाचा मकरंद पुराण वदे।।

नामजप हेच सर्व साधनांचे सार आहे. याचा अर्थ नामजप न करता अन्य कितीही साधने केली तरी ती व्यर्थ होत. याच्या उलट इतर काहीही न करता नुसता नामजप केला तरी तो साधकांचे आत्यंतिक कल्याण करतो. याचे कारण इतर साधनांना उपाधी व बंधने आहेत; तर नाम हे उपाधी-रहित व बंधनातीत आहे.

जी साधने स्वत:च उपाधी व बंधनांनी युक्त आहेत ती साधकाला उपाधीरहित व बंधमुक्त कशी करणार? नाम हे साधन मात्र उपाधीरहित व बंधनातीत असल्यामुळे नामधारकाला उपाधीरहित करून बंधनाच्या पलीकडे नेते.
म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या चरणात सांगतात-
जप तप कर्म हरिविण धर्म।
वाउगाची श्रम व्यर्थ जाय।।
(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स. प्र. (sp)1061
.

error: Content is protected !!