“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग १७ वा”

*➡️ जो स्वत: हरिपाठ करून त्या हरिपाठाची कीर्ती इतरांना सांगतो, त्याचा देह पवित्र होय.
*➡️ स्वत: नामस्मरण करणे व त्या नामाचा महिमा जगाला सांगणे हे फार मोठे तप होय. या महातपाच्या सामर्थ्याने नामधारक चिरंजीव होतो व देहाचा त्याग केल्यावर चिरकाल वैकुंठात वास करतो.
*➡️ नामधारकाचे माता, पिता, बंधू, सगोत्री व इतर कित्येक लोक त्याच्या पुण्याईने चतुर्भूज म्हणजे हरीरूप होतात.
*➡️ ज्ञानेश्वर महाराज सांगतात, की गूढ पण गम्य असे ज्ञान जे प्राप्त झाले असतां जीवाचे रूपांतर देवात होते, ते ज्ञान मला माझ्या सद्गुरु कृपेने-निवृत्तिनाथांच्या प्रसादाने प्राप्त झाले.

🌻 थोडक्यात स्पष्टीकरण: *हरिपाठकीर्ति मुखे जरी गाय।* *पवित्रचि होय देह त्याचा।।*

संतांच्या वचनांचा आधार घेऊन हरिपाठाची हरिनामाची कीर्ति म्हणजे महती इतरांना नुसती सांगणे व हरिनामाचा “स्वतः अभ्यास करून” त्याचा प्रत्यक्ष “अनुभव घेऊन” मग त्या नामाची महती जगाला सांगणे या दोन गोष्टी भिन्न आहेत.

पहिल्या प्रकारात नुसती पोपटपंची असते व दुसऱ्या प्रकारात नामाने जगाचे कल्याण व्हावे ही तळमळ असते. या अभंगाच्या पहिल्या चरणात ज्ञानेश्वर महाराजांनी हेच सांगावयाचे आहे.

“हरिपाठ मुखे जरी गाय” व ”हरिपाठकीर्ति मुखे जरी गाय”
या दोन्ही गोष्टी पाहिजेत, जो स्वतः नुसते नामस्मरण करतो पण नामाची महती इतरांना सांगत नाही तो पवित्रच श्रेष्ठच, परंतु नामाचा अनुभव घेऊन त्याची महती इतरांना सांगणारा परमश्रेष्ठ होय. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की, असे करणारा तो देह पवित्र होय, याचा अर्थ तो देह धारण करणारा जीव धन्य होय.

कारण “नरदेहाचा चांगला उपयोग करणारा, त्याचे सार्थक करणारा तोच होय”, अग्नीची प्राप्ती झाली असतां जर कोणी तो दुसऱ्याच्या घरावर ठेवू लागला तर त्याने त्या अग्नीचा दुरूपयोग केला असेच म्हणावे लागेल. याच्या उलट त्या अग्नीवर अन्न शिजवून ते स्वत: जेवून इतरांसही खावयास घालतो, त्याने अग्नीचा योग्य उपयोग केला असे म्हणावे लागेल.

त्याचप्रमाणे अमोल असा नरदेह प्राप्त झाला असता त्याचा उपयोग विषयोपभोगासाठी करून स्वत:चे व इतरांचेही दु:ख जो निर्माण करतो तो जीव अपवित्र-अभागी होय.
✅याच्या उलट जो जीव या नरदेहाचा उपयोग नामसंकीर्तनासाठी करतो व नामाची कीर्ती, महती जगाला सांगून इतरांना नामस्मरण करण्यास प्रवृत्त करतो तो स्वतःचे व इतरांचे सुख निर्माण करतो व म्हणून तो जीव पवित्र, धन्य होय.

तुकाराम महाराज हेच सांगतात-
रामनामाचे पोवाडे।
अखंड ज्याची वाचा पढे।।
धन्य तो एक संसारी।
रामनाम जो उच्चारी।।
(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स. प्र. (sp)1057

error: Content is protected !!