“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग १६ वा”

संतवचनावर विश्वास ठेवून जे कोणी नामाचा अभ्यास करतात, अखंड नामस्मरण करतात, ते नाम घेतां घेताच त्यात रंगून जातात व त्यांच्या मनाचे “उन्मन” होते.
रामकृष्ण नामी उन्मनी साधली।
तयासी लाधली सकळ सिद्धी।।

नामाने उन्मनीत स्थिर झालेल्या नामधारकापुढे सर्व सिद्धी हात जोडून उभ्या रहातात.

✅ध्यानी-मनी, जागृती-स्वप्नी भगवंत, ही तूर्यावस्था होय. ही तूर्यावस्था स्थिर झाली की तीच “उन्मनी” स्थिती होय.

जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थांच्या पलीकडली ही “उन्मनी” स्थिती प्राप्त होणे हे फार मोठे भाग्य होय.*उन्मनीच्या सुखाआंत। पांडुरंग भेटी देत।।* *पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी।* *जागृती स्वप्नी पांडुरंग।।*

अशी ही उन्मनी स्थिती ज्याचे अनंत जन्मींचे पुण्य फळा आले आहे, अशा भाग्यवंताला प्राप्त होते. असे जरी असले तरी ही स्थिती याच जन्मात “याच देही याच डोळा” प्राप्त करून घेण्याची सुरेख सोय संतांनी आपणांसाठी करुन ठेवलेली आहे. ही सोय म्हणजे “हरिनाम”.

नामाच्या नित्य उच्चाराने अगणित पुण्याची प्राप्ती याच जन्मात होऊन नामधारकाला अत्यंत श्रेष्ठ अशी “उन्मनी” स्थिती प्राप्त होते.

निळा म्हणे सर्वहि सिद्धी।
रूळती पदी हरिनामीं।।
नामी तिष्ठति ऋद्धिसिद्धी।
तुटती उपाधी हरिनामें।।

परंतु नामामृताने व प्रेमसुखाने पुष्ट व तुष्ट झालेला नामधारक त्या सिद्धीकडे ढुंकूनही पहात नाही, मग त्यांचा प्रत्यक्ष उपभोग घेण्याचे दूरच राहिले! *सर्व सुखे नामे येती लोटांगणी।* *कोण त्यासी आणी दृष्टीपुढे।।*

असे तुकाराम महाराज सांगतात, तर —
सिद्धी लावी पिसें कोण तया पुसे।
नेणे राजहंसे पाणी काय।।
हरी नामामृत सेवी सावकाश।
मोक्ष त्याचे भूस दृष्टीपुढें।।
असा आपला अनुभव नाथमहाराज व्यक्त करतात.

तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज हरिपाठाचा, हरिनामाचा महिमा वर्णन करतात, ते सांगतात- *सिद्धि बुद्धि धर्म हरिपाठी आले।* *प्रपंची निवाले साधुसंगे।।*

अखंड नामस्मरण करणाऱ्या साधकाला सिद्धी म्हणजे स्वरूपसिद्धी प्राप्त होते. *निळा म्हणे स्वरूपसिद्धि।* *नित्य समाधि हरिनामें।।*

*नामाच्या उच्चाराने जी प्रभुची सेवा होते.
*”सेवा ते आवडी उच्चारावे नाम”*
त्या सेवेने नामधारकावर भगवंताची कृपा होऊन त्याला “प्रतिभा ज्ञान” प्राप्त होते व त्या ज्ञानाने त्याच्या बुद्धीत प्रकाश पडून साधकाला “स्वरूप साक्षात्कार” होतो.

✅ साधानेच्या अभ्यासाने माणसाच्या म्हणजे साधकाच्या ठिकाणी “ऋतुंभरा प्रज्ञा” म्हणजे “प्रतिभा ज्ञान” म्हणजेच “दिव्यज्ञान” उदयाला येते व या ज्ञानालाच आत्मसाक्षात्कार होतो. अशाप्रकारे जे ज्ञान सच्चिदानंद स्वरूप प्राप्त करून घेते ते ज्ञान दिव्यस्वरूप असते.

हे ज्ञान माणसाला अभ्यास, चिंतन, पूर्वसुकृत, आणि ईश्वर कृपा किंवा सद्गुरू कृपेने प्राप्त होते. ईश्वरकृपेने देवाचा साक्षात्कार हा अपवाद तर “सद्गुरू कृपेने” देवाचा साक्षात्कार हा नियम सामजावा.

नामें प्राप्त नित्यानंद। स्वरूपावबोध हरिनामे।।
(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स. प्र. (sp)1055

error: Content is protected !!