“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग १५ वा”

शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा।
मागिलिया जन्मा मुक्त झालो।।

माझ्या चित्तात अखंड नामस्मरणाचा नेम म्हणजे प्रेम आहे, ती मागच्या जन्मीच मी मुक्त झालो याची खूण आहे. स्त्रीला डोहाळे लागणे म्हणजे ती गरोदर असल्याची खूण आहे. त्याचप्रमाणे नामाचा नेमा म्हणजे प्रेमा चित्तात जडून जाणे ही मागल्या जन्मीच मुक्त झाल्याची खूण आहे.

मुक्ती मिळणे व मिळाल्यानंतर तिचा भोग घेणे या दोन गोष्टी भिन्न आहेत. मुक्ती मिळाल्यावर जे स्वत:ला धन्य झालो असे समजतात ते अभागी होत. याच्या उलट मुक्ती मिळाल्या नंतर तिचा भोग घेतात ते भक्त भाग्यवान होत. नुसते लग्न झाल्याने सर्व काही झाले असे नाही, तर लग्न झाल्यावर स्त्रीसुख अनुभवणे हे महत्त्वाचे आहे.

म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात-
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी।
आतां दिवस चारी खेळीमेळी।।
याचि देही याची डोळां।
भोगीजे मुक्तिचा सोहळा।।
वृत्तिसहित मन पायीच ठेवावें।
अद्वैत भोगावें प्रेमसुख।। *"मुक्ती भोगणे ही भक्ती होय",*

ही भोगण्याची प्रक्रिया म्हणजे “नामसंकीर्तन”. नामाच्या संकीर्तनाने संत मुक्तीचा भोग घेतात व अखंड आनंदात राहून नित्य दिवाळी साजरी करितात. हा प्रेमानंद पुन्हा पुन्हां भोगायला मिळावा म्हणून संत गर्भवास इच्छितात.

✅भक्तिरस-प्रेमरस-ब्रह्मरस पुन: पुन: भोगण्यास मिळावा याचसाठी संत गर्भवासाची इच्छा करतात. हा रस इतका अद्भुत व गोड आहे की याचे जितके सेवन करावे तितके थोडे असेच वाटू लागते.
एरवी आपला अनुभव असा की, विषयसुखाचे सेवन करता करता त्याचा वीट येऊ लागतो. Marginal utility goes on diminishing. बासुंदीच्या दोन वाट्या खाल्ल्या की बरे वाटते; परंतु ती बासुंदी जर अधिकाधिक पोटात जाऊ लागली तर अक्षरशः एरंडेल घेतल्यासारखे तोंड करण्याची वेळ येते.

याउलट नामाचा प्रेमरस सेवन करण्याचे भाग्य ज्याला लाभते त्याची या प्रेमरसाने तृप्तीच होत नाही. या प्रेमरसाच्या सेवनाने तृप्तीला अतृप्तीचे डोहाळे लागतात. हे प्रेमसुख एकाच काय परंतु अनेक जन्मात भोगूनही संपण्यासारखे नसते.

म्हणूनच नामदेव महाराज देवाला विनंती करतात –
नामा म्हणे केशवा अहो जी तुम्ही दातारा।
जन्मोजन्मी द्यावी तुमची हीच चरण सेवा।।

याच्या उलट नामाच्या द्वारे ज्यांना मुक्तीचा सोहळा भोगता येत नाही ते जन्ममरणाच्या चक्रांतून स्वत:ची सोडवणूक करून घेतात.

म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात की,
मी मागल्या जन्मीच मुक्त झालो पण मुक्तीचा भोग नामसंकीर्तनाने घेण्यासाठीच पुन्हां जन्माला आलो.

याची खूण काय? तर,
ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा।।

  • हीच ती खूण होय!

नामाचा हा महिमा ओळखूनच ज्ञानेश्वर महाराज सर्वांना सांगतात- *हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा।* *पुण्याची गणना कोण करी।।* *--- सद्गुरू श्री वामनराव पै* *✍️ स. प्र.(sp)1053*

error: Content is protected !!