“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग १५ वा”

तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज पुन्हां अद्वैतबोधाचे वर्णन करतात.
सर्वांघटी राम देहादेही एक।
सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी।।

ज्याप्रमाणे हजारो किरणांना प्रकाशित करणारा किंबहुना हजारो किरणांच्या रूपाने प्रकाशित होणारा एक सूर्यच, त्याप्रमाणे निरनिराळ्या देहांतून जीवरूपाने एक परमात्माच विलसत असतो.

✅परमात्मा एकच; परंतु देहाच्या अपेक्षेत त्याच परमात्म्याला “आत्मा” हे नांव मिळाले. हाच आत्मा आपले परमात्मस्वरूप न विसरता देहातून नांदू लागला की त्याला “शिव” हे नांव मिळते व तोच आत्मा “स्वरूपाच्या विसरात” देहाशी तादात्म्य स्वीकारून “देहच मी” या कल्पनेने नांदू लागला की, त्यालाच “जीव” हे नाव प्राप्त होते. …. अशा रीतीने सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यास असे आढळून येते की, ”मी” देह नसून देहातून नांदतो-खेळतो-क्रीडतो व हा ”मी” तत्त्वत: व वस्तुत: आत्म्याचे रूप असून आत्मा हे त्या ”मी” चे स्वरूप होय.

म्हणून ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीत सांगतात-
असो रूपक हे तो ईश्वरू।
सकल भूतांचा अहंकारू।।
पांघरोनी निरंतरू। उल्हसत असे।।
परंतु हा अनुभव नामाने मिळणाऱ्या दिव्यज्ञानाने प्राप्त होतो. हे येथे लक्षात ठेवले पाहिजे.

ज्ञान चार प्रकारचे आहे.
(१) उपजत ज्ञान, (२) मिळविलेले ज्ञान,
१ (३) स्फूर्ती ज्ञान, ४) प्रतिभा ज्ञान.

यापैकी पहिला प्रकार उपजत ज्ञान, याला इंग्लिशमध्ये “Knowledge by instinct” असे म्हणतात. हे ज्ञान सर्वांच्या ठिकाणी असते. उदाहरणार्थ, वयात आल्यावर लग्न करावे असे जे वाटते, ते या उपजत ज्ञानामुळेच होय. दुसऱ्याशी भांडण करणे, दुसऱ्याचा द्वेष करणे, स्वत:चे संरक्षण व्हावे असे वाटणे, हे सुद्धा या ज्ञानामुळेच होय. हे ज्ञान उपजतच असते. ते मिळविण्यासाठी शाळा काढाव्या लागत नाहीत.

दुसरा प्रकार मिळविलेले ज्ञान. याला “Knowledge by acquisition” असे म्हणतात. हे ज्ञान पुस्तकांतून किंवा व्यवहारातून मिळविले जाते. निरनिराळ्या विद्या, कला किंवा शास्त्रे म्हणजे “मिळविलेले ज्ञानच होय.

तिसरा प्रकार स्फूर्तीज्ञान. याला “Knowledge by inspiration” असे म्हणतात. अलौकिक शोध, उत्कृष्ट काव्ये वगैरे, ही या ज्ञानाची फळे होत.

चौथा प्रकार प्रतिभा ज्ञान, याला “Knowledge by intuition” असे म्हणतात. हे ज्ञान मानवी प्रयत्नाने मिळत नाही, तर केवळ ईश्वरकृपेने, सद्गुरूकृपेने प्राप्त होते. ज्यावेळी ईश्वराचा, सद्गुरूचा प्रसाद होतो त्याच वेळेला हे प्रतिभा ज्ञान, दिव्य ज्ञान साधकाला मिळते.
ददामि बुद्धियोगं तं येन मां उपयान्ति ते।।
किंवा
दिव्यं ददामि ते चक्षुः।।

ही गीतेतील वचने या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखी आहेत. हे प्रतिभा ज्ञान प्राप्त झाले असता बुद्धीत दिव्य प्रकाश पडतो व या दिव्य प्रकाशात जिवाला सर्व काही वेगळे आणि आगळेच दिसू लागते.

ज्याला पूर्वी जग असे म्हणत होता ते आतां जग नसून जगदीश आहे, असे त्याला प्रतिभा ज्ञानाने प्रत्यक्ष दिसू लागते. पूर्वी त्याला “मी” देहाएवढा आहे असे वाटत होते, तर आतां त्याल ”मी” आकाशापेक्षाही मोठा आहे असे अनुभवाला येते.

पूर्वी दु:खाने भरलेले आहे असे वाटत होते, आता “अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे” असे प्रतीतीला येते. असले दिव्य अनुभव या प्रतिभा ज्ञानाने प्राप्त होतात व हे ज्ञान देवाच्या, सद्गुरुंच्या कृपाप्रसादाने मिळते. हा प्रसाद मिळवायचा कसा? या प्रश्नाला संत उत्तर देतात नामाने. तुकाराम महाराज सांगतात- *न कळे ते कळों येईल उगलें।* *नामें या विठ्ठले एकाचिया।।* *न दिसे तें दिसों येईल उगलें।* *नामें या विठ्ठले एकाचिया।।* *न बोलों ते बोलों येईल उगलें।* *नामें या विठ्ठले एकाचिया।।* *न भेटे ते भेटों येईल आपण।* *करितां चिंतन विठोबाचे।।* *अलभ्य तो लाभ होईल अपार।* *नाम निरंतर म्हणतां वाचे।।* *तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावें।* *तरतील नांवे विठोबाच्या।।*

(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स. प्र. (sp)1052

error: Content is protected !!