“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग १५ वा”

अभंगाचा भावार्थ:
➡️ हरिनाम हे एकच साधन असे आहे की, त्याच्या सामर्थ्याने जिवाच्या ठिकाणी असणारे द्वैतनाम म्हणजे “द्वैतभाव” दूर होतो. भगवन्नाम ही एक “अद्वैत कुसरी” आहे, अद्वैत स्थिती प्राप्त करून देणारी कला आहे, हे अनुभवाने जाणणारा या जगात विरळाच!
➡️ नामाने समबुध्दी म्हणजे “योगबुद्धी” प्राप्त करून घेतली असतां हरी सर्वत्र सारखा भरून राहिलेला आहे असे प्रतीतीला येते. याच्या उलट शमदमांचा आश्रय घेणाऱ्या साधकाला जगरूपाने असणारा हरी वैऱ्यासारखा भासू लागतो.
➡️ सूर्यापासून निघणारी हजारों किरणे दिसावयाला भिन्न भिन्न दिसतात; परंतु प्रत्यक्षात एक सूर्यच त्या सर्व किरणांचा प्रकाशक असतो. त्याप्रमाणे निरनिराळ्या देहांतून वेगळाले जीव जरी विलसताना दिसले तरी या सर्व देहांतून एक रामच प्रकट होत असतो, असा अनुभव साधकाला नामाने प्राप्त होतो.
➡️ ज्ञानेश्वर महाराज सांगतात की, अखंड नामस्मरणाचा नेम म्हणजे प्रेम माझ्या चित्तात चित्रित झाले आहे, ही मागल्या जन्मी मुक्त झाल्याची खूण आहे. *🌻थोडक्यात स्पष्टीकरण :* *एक नाम हरि द्वैत नाम दुरी।* *अद्वैत कुसरी विरळा जाणे।।*

हरिप्राप्तीची अनेक साधने आहेत, पण हरिनाम हे एकच साधन असे आहे की, ते अत्यंत सुलभ असून सुद्धा फार प्रभावी आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज नामाला “अद्वैत कुसरी” म्हणतात.
याचा अर्थ असा की,
नाम हे जिवाचा द्वैतभाव दूर सारून त्याला अद्वैत स्थिती प्राप्त करून देणारी विलक्षण, उत्कृष्ट अशी “कला” आहे.

परंतु हे अनुभवाने जाणणारा या जगात विरळाच! कारण अशी प्रतीती प्राप्त होण्यासाठी नामाच्या ठिकाणी जी चिकाटी लागते ती सर्वसाधारणत: कोणाजवळ आढळून येत नाही.

याच्या उलट जे कोणी श्रद्धेने व निष्ठेने अखंड नामस्मरणाचा अभ्यास करून आपली बुध्दी देवाशी सम करतात, तिचा देवाशी योग घडवून आणतात, त्यांना हरी सर्वत्र भरलेला आहे असा अनुभव प्राप्त होतो. *समबुद्धि घेतां समान श्रीहरी।* *शमदमा वैरी हरी झाला।।*

हा अनुभव प्राप्त करून घेण्यासाठी नामधारकाला इतर मार्गाने जाणाऱ्या साधकांप्रमाणे, शम म्हणजे मनाचे नियमन व दम म्हणजे इंद्रियांचे दमन करावे लागत नाही. याचे कारण असे की, ज्या मनाचे नियमन करायचे ते मनच हरिनामात रंगून गेल्यावर त्या मनाचे नियमन करण्याचा प्रश्नच उरत नाही, त्याचप्रमाणे सर्व इंद्रिये हरिप्रेमात सुस्नात झाल्यावर त्यांचेही निराळे दमन करावे लागत नाही.

म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-
तरी कीर्तनाचेनि नटनाचे।
नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे।।
जे नांवचि नाही पापाचे। ऐसे केले।।

यमू म्हणे काय यमावे।
दमू म्हणे कवणाते दमावे।।
तीर्थे म्हणती काय खावे।
दोष ओखदासी नाही।।

त्याचप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात-
नाम घेता कंठ शीतळ शरीर।
इंद्रियां व्यापार नाठवीती।।
गोड गोमटे हें अमृतासी वाड।
केला कइवाड माझ्या चित्ते।।

याच्या उलट शम-दमांचा अभ्यास करणाऱ्या साधकांची अवस्था मोठी केविलवाणी असते. मनाचे नियमन व इंद्रियांचे दमन करण्यात या साधकांना मानसिक व शारीरिक क्लेश होतात व ते शीघ्रकोपी बनतात. जगाकडे पहाण्याची त्यांची दृष्टी अधिकच विकृत होते.

जगरूपाने हरीच नटलेला आहे असे दिसण्याऐवजी, जग (जगरूपाने असणारा हरि) म्हणजे वैरी असेच त्यांना भासू लागते व सरतेशेवटी पूर्ण अधोगती होऊन त्यांची हरीकडे पाठ होते.
(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स. प्र. (sp)1051

error: Content is protected !!