🙏”ज्ञानेशांचा संदेश”🌻
(प्रथम आवृत्ती १९६१)

सार्थ हरिपाठ
अभंग २ रा

हरी म्हणजे आनंद असे एकनाथ महाराजांनी त्यांंच्या हरिपाठात सांगितले आहे.
सत्पद ते ब्रम्ह, चित्पद ते माया।
आनंदपद हरि म्हणती जया।।

हा आनंद म्हणजे गोविंद, नामसंकीर्तनाच्या प्रभावाने जेव्हां सत्ताज्ञानात प्रकट होतो तेव्हां संत त्याचे वर्णन “विटेवर विठ्ठलाला उभे केले” असे करतात.

तुकाराम महाराज म्हणतात, —
भावाचे मथिले, निर्गुण संचले।
ते हे उभे केले विटेवरी।।

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात —
सोनियाचा दिनू आजी अमृते पाहला।
नाम आठविता रूपी प्रकट पै झाला।।
इथे त्यांनी काय म्हटलय ?
“सोनियाचा दिनू अमृते पाहला”, पाहला म्हणजे उजाडला.
सोनियाचा दिनू आज उजाडला, म्हणजे काय झालं ?
नामस्मरण करता करता, नामघोष करता करता, एक दिवस “नाम आठविता रूपी प्रगट पै झाला” म्हणजे आनंदाचे कण जाणीवेत पसरलेले होते ते लोण्याच्या गोळ्याप्रमाणे म्हणजे नामाच्या मंथनाने स्वानंद त्या ठिकाणी प्रतीतीला आला.
नामदेव महाराज म्हणतात —
नामा म्हणे नाम गाईन निर्विकल्प।
येसी आपोआप गिवसीत ।।

तयांपासी पांडवा। मी हारपला गिवसावा।।
जेथ नामघोषु बरवा। करिती माझा।।
(ज्ञानेश्वरी)

ज्ञानाच्या विटेवर परमानंदाला-पांडुरंगाला संत नामासंकीर्तनाच्या द्वारे उभे करतात. जीवनात हा परमानंद साकार झाला की, नामधारकाला धन्यता प्राप्त होते व हे अवीट प्रेमसुख जन्मोजन्मी भोगावयास मिळावे, यासाठी संत देवाजवळ मोक्ष न मागता गर्भवास इच्छितात. *तुका म्हणे आम्हां जन्म गोड यासाठी।।* किंवा

मज दास करी त्यांचा। संत दासांच्या दासांचा।।
मग होत कल्पवरी। सुखे गर्भवास हरि।।
किंवा
नामा म्हणे केशवा अहो जी तुम्ही दातारा।
जन्मोजन्मी द्यावी तुमची हीच चरणसेवा।।

याप्रमाणे संत प्रेम सुखाला लालचावलेले असतात.
एका जनार्दनी प्रेम अति गोड।
अनुभवी सुरवाड जाणताती।।
किंवा
लांचावले मन लागलीसे गोडी।
ते जीवे न सोडी ऐसे झाले।।
असा ते आपला अनुभव व्यक्त करतात .
ज्ञानेश्वर महाराज साधकाला सांगतात की , …..
अशा रितीने म्हणजे मंथनाच्या द्वारे तू अनंताला-भगवंताला प्राप्त करून घे व या व्यतिरीक्त इतर गोष्टी आणि मार्ग यांचा त्याग कर.
(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स. प्र.(sp)1020

error: Content is protected !!