“प्रत्यक्षात नारायणस्वरूप इतके विलक्षण आहे की त्याचे नीट आकलन झाल्याशिवाय प्रभुला आकलता येणे अगदी अशक्य आहे”.
  “ज्ञानेशांचा संदेश”
  (प्रथम आवृत्ती १९६१)
                     
सार्थ हरिपाठ
    अभंग २ रा

चहु वेदी जाण षटशास्त्री कारण।
अठराहि पुराणे हरिसी गाती।
मंथुनी नवनीता तैसे घे अनंता।
वाया व्यर्थ कथा सांडी मार्गु।।
एक हरि आत्मा जीव शिव समा।
वाया तूं दुर्गमा न घालि मन।।
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ।
भरला घनदाट हरि दिसे।।

अभंगाचा भावार्थ : …..
ज्या हरीचे निर्गुण स्वरूप जाणण्याचा चारी वेद प्रयत्न करतात, जो हरी षटशास्त्रांच्या निर्मीतीचे कारण आहे व ज्या हरीचे अठरा पुराणे गुणगान करतात, त्या हरीला, ज्याप्रमाणे दह्याचे मंथन करून लोणी काढतात त्याप्रमाणे प्राप्त करून घे व बाकीच्या व्यर्थ गोष्टी व मार्ग यांचा त्याग कर.

एक हरीच आत्मा आहे व जीवशिव रूपाने तोच आहे हे जरी तत्वतः खरे असले तरी या दुर्गम, अवघड विषयात तू विनाकारण मन घालू नको.
ज्ञानदेव म्हणतात,
हरिपाठाने मला सर्वत्र हरीच घनदाट भरलेला दिसत असल्यामुळे हा भूलोक मला प्रत्यक्ष वैकुंठच झाला आहे .

थोडक्यात स्पष्टीकरण :
                चहूं वेदी जाण षट्शास्त्री कारण।
                   अठराही पुराणे हरिसी गाती ।।
वेद हरीचे साकार सगुण रूप आत्मसात करून त्याचे निर्गुण स्वरूप जाणण्याचा प्रयत्न करतात, पण त्या ठिकाणी “नेति नेति” म्हणत मागे सरतात व मौन धारण करतात. कारण ……
हरिचे निर्गुण स्वरूप अगम्य आहे. विश्वाच्या उत्पत्तीचे कारण शोधण्याचा षट्शास्त्रे प्रयत्न करतात . वस्तुतः व तत्वतः श्रीहरीच विश्वाच्या उत्पत्तीचे कारण आहे. व म्हणूनच षट्शास्त्रांच्या निर्मितीला कारणही तोच आहे. *अठराही पुराणांतून हरीचेच गुणवर्णन आहे .

असा जो हरि त्याला प्राप्त करुन घेण्याचा मार्ग म्हणजे, …..
               मंथुनी नवनीता तैसे घे अनंता ।
                वाया व्यर्थ कथा सांडी मार्गु ।।
लोण्याचे कण जरी दह्यात विखुरलेले असतात तरी दह्याच्या प्राप्तीने लोण्याची प्राप्ती होत नाही , लोण्यासाठी दह्याचे मंथन करावे लागते. कारण मंथनाने दह्यात विखुरलेले लोण्याचे कण एकत्र आणले जातात व नंतर त्यांचाच एक लोण्याचा गोळा तयार होतो .

त्याचप्रमाणे, ज्ञानरूप जीवाचे आनंद हे स्वरूप आहे.*ज्ञानात आनंद विखुरलेला आहे . म्हणून जीवाला तो अव्यक्त आहे व त्याचा भोग न मिळाल्यामुळे जीव अतृप्त असतो.
ज्ञानरूप जीवाने या आनंद स्वरूपात स्वतःला समाधिच्या द्वारे विरवून घेणे हा मुक्तिसुखाचा मार्ग . तर “नामसंकीर्तनाच्या” द्वारे आनंद स्वरूपाला ज्ञानरूपात व्यक्त करणे हा भक्तिसुखाचा प्रकार.

संतांना “नामसंकीर्तन” अत्यंत प्रिय आहे. याचे कारण हेच होय . नामसंकीर्तनाने सत्ताज्ञानात “पसरलेला” आनंद हळू हळू, रांगत-रांगत, लपत-छपत, ज्ञानातच प्रकट होतो … मूर्त होतो … साकार होतो.
नामदेवांनी या स्थितीचे गोड वर्णन त्यांंच्या एका अभंगात केले आहे,

        म्हणती गौळणी हरिची पाऊले धरा।
        रांगत रांगत येतो हरि हा राजमंदिरा।।
         लपत छपत येतो हरि हा राजभूवनी।
         नंदासी टाकुनि आपण तो बैसे सिंहासनी।।
हरी म्हणजे आनंद असे एकनाथ महाराजांनी त्यांंच्या हरिपाठात सांगितले आहे .

हरी हा राजमंदिरात रांगत रांगत येतो. आता बघा ताकामध्ये लोण्याचे कण पसरलेले आहेत, म्हणून दिसत नाहीत. आपण ज्यावेळी मंथन करतो तेव्हा ताकामध्ये असणारे लोण्याचे कण हळुहळू एकत्र यायला लागतात,*मग त्यांचा गोळा होतो. तीच प्रोसेस ह्या ठिकाणी आहे.
      
आपण ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल, श्रीराम जयराम जय जय राम, ॐ नम: शिवाय असे जे देवाचं नांव घेतो, ते “सतत” घेतलं पाहिजे,*ही त्याच्यामधली खरी गंमत आहे असे नाम सतत घेतल्यानंतर आपल्या जाणीवेत मंथनाला सुरूवात होते, त्याला वेग येतो.

जाणीवेमध्ये असणारा “स्वानंद” हा सर्व ठिकाणी पसरलेला आहे. हा स्वानंद जाणीवेत पसरलेला आहे म्हणून तो आपल्याला प्रचीतीला येत नाही, अनुभवाला येत नाही. म्हणून …… नामाच्या रवीने आपण एकदा मंथनाला सुरूवात केली की, मंथन करता करता जाणीवेमध्ये जो स्वानंद आहे, त्याचे पसरलेले कण हळूहळू एकत्र यायला लागतात.

        “रांगत रांगत येतो हरि हा राजमंदिरा”
लोण्याचे कण कसे येतात?
लपत छपत येतात, एकदम येत नाहीत. लोणी झाल्यानंतर कळतं. तसं आपल्या ठिकाणी स्वानंदाचे कण जाणीवेमध्ये पसरलेले आहेत. हरि लपत छपत वेतो म्हणजे हा आनंद म्हणजे गोविंद, म्हणजे हरि,
           
        “सत्पद ते ब्रह्म, चित्पदक ते माया,
             आनंट पद हरि म्हणती जया
तर हा हरि म्हणजे आनंद लपत छपत येतो.

नाम घेतलं आणि प्रगट झाला असं होत नाही.
आनंदाचे कण हळुहळू एकत्र यायला लागतात आणि
ते एकत्र आल्यानंतर मग आपल्याला त्या स्वानंदाचा अनुभव येतो. ही प्रोसेम फार महत्त्वाची आहे. म्हणून, ..

“लपत छपत येतो हरि हा राजभूवनी” म्हणजे आपल्या अंत:करणामध्ये तो लपत छपत येतो.
(क्रमशः)
                 — सद्गुरू श्री वामनराव पै
                       स. प्र.(sp)1018*

error: Content is protected !!