* व्यासांची ब्रह्मसुत्रे, पातंजलीची योगसूत्रे, नारदांची भक्तीसूत्रे त्याप्रमाणे “ज्ञानेश्वर महाराजांची नामसूत्रे होत”.*
*”ज्ञानेशांचा संदेश”*
(प्रथम आवृत्ती १९६१)
*सार्थ हरिपाठ*
अभंग १ ला
वेदशास्त्र सर्वांना नामस्मरण करण्याचा उपदेश करतात.
*वेद अनंत बोलिला। अर्थ इतुकाची साधिला।।*
*विठोबासी शरण जावे। निजनिष्ठे नाम गावे।।*
*साही शास्त्रांचा विचार। अंती इतुलाचि निर्धार।।*
*अठरा पुराणी सिद्धांत। तुका म्हणे हाचि हेत।।*
त्यांच्या उपदेशाप्रमाणे एखादा मनुष्य संसारात राहून अखंड नामस्मरण करू लागला म्हणजे ….*वेदमंत्राचे द्रष्टे व शास्त्रांचे प्रणेते जे ऋषिमुनी त्यांना अत्यंत समाधान होते व ते नामधारकाला हात उभारून आशीर्वाद देतात, त्यांच्याच आशीर्वादाने नामधारकावर भगवंताची कृपा होऊन त्याला प्रतिभा ज्ञान प्राप्त होते, त्याच्या बुध्दीत प्रकाश पडतो व वेदशास्त्रांत सांगितलेला बोध प्रकट होतो.*
म्हणूनच संत सांगतात ——
*नामे होय ब्रह्मज्ञान। भुक्ती मुक्ती नामे जाण।।*
किंवा
*विठ्ठल विठ्ठल हा नामाचा छंद।*
*मन ते उद्’बोध जडे पायी।।*
किंवा
*शास्त्रांचे जे सार वेदांची जो मूर्ति।*
*तो आम्हां सांगाती प्राणसखा।।*
*म्हणवूनी नाही आणिकांचा पांग।*
*सर्व झाले सांग नामे एका।।*
वेदांचे पठण करणारा वैदिक होईल व शास्त्रांचा अभ्यास करणारा शास्त्री होईल, परंतु तो वैष्णव होणार नाही हे निश्चित. *वेदशास्त्रांत सांगितलेला बोध ज्याच्या अंतःकरणात प्रकट होईल व जीवनात व्यक्त होईल तोच “वैष्णव”.*
तुकाराम महाराजांनी केवळ अखंड हरिनामाचा छंद घेतला —
*हरि तुझे नाम गाईन अखंड।*
*यावीण पाखंड नेणे दुजे।।*
किंवा
*एक गावे आम्ही विठोबाचे नाम।*
*आणिकांचे काम नाही आतां।।*
आणि त्यांना वेदशास्त्रांत सांगितलेल्या अंतिम सिद्धांताचा साक्षात्कार झाला आणि म्हणूनच ते आव्हानपूर्वक बोलतात, —
*वेदांचा अर्थ आम्हांसी पुसावा।*
*येरांनी वहावा भार माथा।।*
नामस्मरणाचे चौथे फळ म्हणजे, …
*”द्वारकेचा राणा पांडवा घरी”*
भगवंताचे पांडवांवर फार प्रेम होते, इतके की, त्याने त्यांंची सर्व प्रकारे सेवा केली. परंतु *पांच पांडवांत भगवंताचा लाडका मात्र अर्जुनच होता व त्याच्याच प्रेमासाठी तो पांडवा घरी राबला.*
*किंबहुना पांडव हा शब्द ज्ञानेश्वर महाराज विशेष करून अर्जुनालाच उद्देशून वापरतात.*
*परि तयापाशी पांडवा। मी हारपला गिवसावा।*
*जेथ नामघोषु बरवा। करिती माझा।।*
प्रस्तुत अभंगातही ज्ञानेश्वर महाराज *”पांडव”* हा शब्द अर्जुनाच्याच अपेक्षेत वापरतात. त्याचे मुख्य कारण असे की,…
*अर्जुन हा एक श्रेष्ठ नामधारक होता . त्याच्या रोमारोमांतून-केसाकेसांतून “कृष्ण कृष्ण, जय कृष्ण कृष्ण” असा नामध्वनी उमटत असे,* ही गोष्ट महाभारतात प्रसिद्धच आहे .
तात्पर्य , *भगवंताचे अर्जुनावर प्रेम होते, याचे मुख्य कारण तो कट्टा “नामधारक” होता हेच होय.*
*त्याचप्रमाणे नामाचा छंद घेणाऱ्या इतर नामधारकांच्या घरी सुध्दां भगवंत स्वतः वास करुन त्यांचा सर्व प्रकारे “योगक्षेम” वाहतो.*
*भक्त समागमे सर्वभावे हरि।*
*सर्व काम करी न सांगता।।*
*अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते ।*
*तेषां नित्याभियुक्तांना योगक्षेमं वहाम्यहम्।।*
वर सांगितलेली नामाची गोड फळे नामाच्या केवळ उच्चाराने प्राप्त होतात .
म्हणून ज्ञानेश्वर महाराज जगाला संदेश देतात —
*हरि मुखे म्हणा। हरि मुखे म्हणा।*
*पुण्याची गणना कोण करी।।*
*— सद्गुरू श्री वामनराव पै*
*✍️ स.प्र(sp)1017*