*”जे उपनिषदात आहे ते गीतेत आहे, जे गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहे आणि जे ज्ञानेश्वरीत आहे ते “ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठात आहे”.*

              *”ज्ञानेशांचा संदेश”*
                     *(प्रथम आवृत्ती १९६२)*

*हरिपाठ*
अभंग १ ला

सच्चिदानंद रूपाची तीन पदे आहेत. ती म्हणजे *”सत् , चित् व आनंद”.* सच्चिदानंद रूपाने परमात्मा सर्व विश्वात खेळून राहिला आहे. सत् म्हणजे सत्य, सातत्य आणि सत्ता. *परमात्मा ”सत्” रूपाने सर्वत्र आहे, तो नाही असे ठिकाणच नाही.*

           *तुका म्हणे विठो भरला सबाहीं ।*
                 *तयां उणें कांही चराचरीं ।।*
त्याचप्रमाणे त्याचे हे *”आहेपण”* आज आहे व उद्या नाही असे नाही; तर *ते सतत-सातत्याने सर्वकाळ आहे. शिवाय सत्तारूपाने तो पिंड व ब्रम्हांड नाचवून राहिलेला आहे.*

           *एक देही भिन्न दावियेल्या कळा ।*
                 *नाचवी पुतळा सूत्रधारी ।।*
                             किंवा
            *तुझिया सत्तेने वेदांसी बोलणे।*
            *सूर्यासी चालणे तुझ्या सत्ते।।*
            *ऐसा तू समर्थ ब्रम्हांडाचा स्वामी।*
            *वर्म हे जाणोनि शरण आलो।।*

आतां आपण *चित् म्हणजे काय* ते पाहूं, —
चित्’रूपाने परमात्मा सर्व ठिकाणी नटून राहिलेला आहे . *चित् म्हणजे ज्ञान. या ज्ञानाचा हात जगातील सर्व वस्तूंना व पदार्थांना लागलेला आहे. विश्वात दिसणारी “विविधता व त्यांचे ठायी आढळून येणारी कुशलता” हे चित्’पदाचे दर्शन आहे.*

         *अनंत रूपे अनंत वेषे देखिले म्या त्यासी।*
        *बापरखुमादेवीवरू खूण बाणली ऐसी।।*

*आपले एकत्व न मोडता अनेक होण्याची देवाची जी लीला, तीच या ज्ञानसत्तेची कला होय.* त्याचप्रमाणे नाना प्रकारच्या विद्या आणि कला हे सर्व या ज्ञानाचेच आविष्कार होत. अज्ञान, विज्ञान व प्रज्ञान ही तिन्ही या मूळ ज्ञानाचीच रूपे होत; आणि म्हणूनच तुकाराम महाराजांनी या ज्ञानसत्तेचे मोठे गोड वर्णन केले आहे, ते म्हणतात –
              *तुका म्हणे ज्ञान विठ्ठलचि पूर्ण।*
                   *सर्व अणुरेणु वागवीत।।*
                               किंवा
               *तुका म्हणे ज्ञान तोचि नारायण।*
                     *जाणती सज्ञान गुरूपुत्र।।*
                                  किंवा
                  *अणुरेणू पाती ब्रम्हांडाच्या कोटी।*
                      *ज्ञानाचिया पोटी दिसे जया।।*

*तिसरे पद म्हणजे आनंद.*
या आनंदरूपाने सुध्दां सर्व ब्रम्हांड व्यापलेले आहे. *निसर्गाचे सौंदर्य, प्राण्याप्राण्यांत व माणसामाणसांत दिसून येणारे प्रेम, वनस्पतीच्या ठिकाणी आढळून येणारी टवटवी, त्याचप्रमाणे सतेजता, सुख, शांती, समाधान, उत्साह, हास्य हे सर्व या आनंद पदाचेच दर्शन होय.*

परंतु या ठिकाणी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवली पाहिजे की, *समजुती साठी जरी आपण तीन पदांचा वेगवेगळा विचार केला तरी प्रत्यक्षात ही तीन पदे वेगळाली नाहीत. इतकेच नव्हे तर त्यांना वेगळे करता येणे शक्य नाही.*

*”सत् , चित् व आनंद” मिळून “सच्चिदानंद” हे देवाचे सगुण रूप होय.* सच्चिदानंद रूपाने तो जसा ब्रम्हांडात आहे, तसा पिंडात सुध्दां आहे. *”मी आहे व नेहमीच असणार”* असे जे जीवाला वाटते त्याचे कारण तो सद्रुप आहे म्हणून तो चिद्रुप आहे म्हणूनच त्याचे सर्व व्यवहार ज्ञानसत्तेवर चाललेले आहेत. *त्याचप्रमाणे तो आनंदरूप आहे त्यामुळेच आनंदावर त्याचे प्रेम आहे, आनंदाशिवाय दुसरे त्याला काहीच नको असते.*

*क्रमशः*

                 *— सद्गुरू श्री वामनराव पै*
                                 *✍️*

error: Content is protected !!