हिवाळ्यातील त्या सणासुदीच्या दिवसाने हिम्मतराव मध्ये एक आनंदाची पर्वणीच आली होती.धर्मरायाजी बीज,आणि माघ पौर्णिमा या दोन सणांनी त्याच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले होते. बीजेत धर्मरायाला केलेला नवस फेडला होता.
   
आणि  माघ पौर्णिमेच्या  यात्रे  मध्ये भैरव नाथाला सगळ्या भावकीने  मिळून केलेला नवस त्याला आठवत होता. आपल्या कुटुंबातील सदस्यांना,गुरा ढोरांना सुख शांती मिळावी म्हणून  एक बकराचा बळी दिला होता. त्या स्वरूपात देवाला तो  नवस पोहचला ही होता.

तसे हिम्मतरावांच्या  कुटुंबात म्हातारी आई,वडील,एक बायको,आणि दोन मुले  होती.सुख शांतीने  या परिवारामध्ये एक छानशी जागा मिळवली होती.फाल्गुन पौर्णिमेला वाईट विचाराची होळी करून शिमगा जोरात साजरा केला होता.अशा एकापाठोपाठ येणाऱ्या  सणांनी  खरे तर त्याला समृध्द बनवले होते.

माणसाच्या आयुष्यात सण याच्यासाठीच असतात की दिवस भर काबाड कष्ट करून दमलेल्या जीवाला कुठेतरी आनंदाचे क्षण साजरे करता यावेत म्हणून पूर्वजांनी आखून दिलेल्या रूढी या महत्व पूर्ण ठरत होत्या. मराठी वर्षाची दिनदर्शिका या फाल्गुन महिन्याच्या अमावस्येला समाप्त होणार होती. अगोदर साडे तीन महिन्यांपूर्वी हिम्मतरावांनी  आपल्या घरातील आपल्या बायकोचे मगंळसूत्र मारवाड्या कडे गहाण ठेवले होते.

त्या पैशातून त्यांनी हिवाळी बटाटा लावला होता.स्वतःच्या मालकीची त्याची छोटीशी विहीर होती.तिला पाणी खूप होते सकाळी उपसलेली विहीर संध्याकाळी भरत होती. ऐन वैशाखात विहिरीतून सदा कदा बाहेर पाणी पडत होते.मोटेने पाणी त्या बटाट्याला देऊन त्याने सोन्यासारखे बटाटे पिकवले होते.त्याची बायको खूप कष्टाळू होती.तिच्या जिवावर शेतीची कामे हिम्मत राव करत होता.तीन महिने या दोघा उभयंतानी खूप मेहनत घेतली होती.त्याची खुरपणी,त्याला वेळेवर खत,पाणी दिले होते.

पंधरा दिवसापूर्वी हे बटाटे शेतातून काढले होते.अपेक्षेपेक्षा जास्त पीक शिवारात दिसू लागले होते. शेतसरी कडे पाहून दोन्ही नवरा बायको आनंदी होत होती.हिम्मत रावांनी एक दिवस ते बटाटे पुण्या तील गुल टेकडी मार्केट मध्ये विकावयास नेले होते.बटाटे पाहून दलाल सुध्दा चकित झाला होता.त्याला भाव सुध्दा चांगल्या पैकी मिळाला होता.गहाण ठेवलेला दागिना सोडून त्याच्या कडे बराच पैसा शिल्लक राहणार होता.

मनातून हिम्मतराव त्या तात्यांना धन्यवाद देत होता.गेल्या वर्षी तात्यांनी  जो पाडवा वाचून दाखवला होता त्या मध्ये त्याने हिवाळी बटाट्याला चांगला गुरू सांगितला होता. त्या प्रमाणेच त्यांनी हे पीक घेतले होते. घरामध्ये सुखाचे दिवस आले होते. पाडव्या साठी त्याने आपल्या घरातील सगळ्यांना नवीन कपडे घेतली होती.आणि तो त्या नवं वर्षाचे स्वागत करण्यासाठी तयार झाला होता. चैत्र महिना म्हणजे मराठी वर्षाचा आरंभ  त्यातूनच वसंत ऋतू म्हणजे काय वर्णावा त्याचा महिमा ?त्याच्या आगमनाने निसर्गात खूप बदल जाणवू लागले होते.

झाडांनी आपली जीर्ण झालेली पालवी तिचा त्याग केला होता. ज्या पालवी ने त्या झाडांना फुले फळे ,दिली होती, वर्ष भर आपल्या अंगा खांद्यावर खेळवले होते ती पालवी गळत  चालली होती .प्रत्येक वेली आणि झाडे यांना नुकतीच कोवळी पालवी फुटली होती.ऐन रखरखत्या उन्हाळ्यात कुठून यांना पाणी मिळण्याची शक्यता नव्हती,परंतु झाडांनी, वेलीनी, असे रूप धारण केले होते की नव्या नवरीने नटावे आणि बाहुल्या वर चढून आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगवावीत  असाच काहीसा निसर्ग नटला होता.

ओढे नाले आटले होते. मध्येच कुठे तरी साठवणीचे पाणी दिसत होते ते गुरांसाठी वापरात आणले जात होते. चैत्राचे उन मी म्हणत होते.तो दिवस चैत्र शुध्द प्रतीपदेचा होता.हिम्मत राव त्या दिवशी भल्या पहाटे उठले होते.गुरांच्या धारा काढून लहानग्या मुलाला गुरांमागे पाठवले होते.स्नान उरकून त्यांनी आपल्या माळ्यावर ठेवलेले लांब बाबुंच लाकूड काढले होते.त्याला  ते गावाला पाणी पुरवठा करत असलेल्या विहिरी कडे म्हणजेच पाणवठ्यावर  घेऊन गेले होते.त्या बाबुंला स्वच्छ पाण्याने धुतला होता.

वर्षेभर धूळ खात असलेला बाबुं परंतु त्याचा तो सोन्याचा दिवस  त्याच्यासाठी ठरत  होता.त्याच्या बरोबर गावातील बऱ्याच ग्रामस्थांनी असा पवित्रा अवलंबला होता. घरी त्यांच्या सगळ्या कुटुंबात कडू निंबाच्या पाना चे सेवन केले होते.बाबुं ला घरी आणून त्याची यथा योग्य पूजा केली होती.तांब्याचा गडू स्वच्छ धुतला होता,त्या वर आष्टी गंधाने स्वस्तिक काढला होता.बाबुंला नवीन  करकरीत काठा पदराची साडी, कडू निंबाचा पाला,आंब्याची डहाळी, गाठी साखरेची माळ घातली होती.

तत्पूर्वी तो माळ रानात चाप्याची फुले आणण्यासाठी गेला असता ते चाप्याचे झाड त्याला असे दिसले की सगळ्या फांद्या सुखून गेल्या होत्या ,खोडाची अवस्था जिर्णमय झाली होती.परंतु एक फांदी अशी होती की हिरव्यागार पानांनी  तिला घेरले होते व प्रचंड फुलांचे गुच्छे लागले होते.त्या झाडाकडे पाहून हिम्मत राव विचार करू लागला होता.सगळ्या फांद्यानी त्याची साथ सोडलेलि होती.परंतु बहरने त्याने सोडले नव्हते मानवी जीवनाला एक प्रेरणादायक संदेश ते झाड देत होते.

त्याची फुले त्याने आणली होती व त्याची माळ बनवून  आकर्षक फुलांची माळ अडकवली होती.त्या वर तो तांब्या पालथा घातला होता.ती बाबुंरुपी गुढी उभारून त्या गुढीच्या खाली लाकडी पिढे त्यावर रांगोळी काढली होती.
       या गुढी ची पौराणिक कथा अशी आहे की याला पराक्रमाचे प्रतीक म्हणून समजले जाते. प्रभू रामचंद्र चवदा वर्षे  वनवास पूर्ण करतात.आणि लंका अधिपती रावणा बरोबर तीन महिने युद्द करून बिभीषणाला लंकेचा राजा घोषित करतात सीतेला त्याच्या तावडीतून सोडवून अयोध्येला प्रयाण करतात.
      
ते ज्या वेळी नंदीग्राम येथे येतात तेंव्हा भरत त्यांचं आदरातिथ्य करतात व अयोध्या मध्ये आज्ञा सोडतात की प्रभू रामचंद्र येतात त्यांच्या स्वागतासाठी गुढी उभारून आप आपल्या दाराला तोरण लावा. तेव्हां पासून हा  हिंदू नववर्षाचा सण पारंपारिक पद्धतीने साजरा होत  आहे.गुढी उभारून हिम्मतराव सरळ गावातील मंदिरा पुढे गेला होता.तत्पूर्वी गावात दवंडी पिटली होती.सालाबाद प्रमाणे याही वर्षी गावातील तात्या पंचांग वाचण्याचे काम करणार आहे.

तेव्हा या सदर प्रसंगी सगळ्या वाड्या, वस्त्या, गावठाण, या मधील मंडळींनी भाग घ्यावा हो,दवंडीचा आवाज ऐकुन हिम्मतराव सह सगळी मंडळी   तिथे पोहचली होती.चैत्रातल कोवळे उन सभोवार पडले होते.बसायला घोंगड्या टाकल्या होत्या.गावातील पुढारी मंडळी प्रथम दर्शनी बसली होती. त्यांच्या मागून हिम्मतराव आणि बरेच लोक बसण्यासाठी जागा शोधत होते. एकदाची जागा पाहून अशा ठिकाणी ते बसले की तात्या चे बोलणे कानावर व्यवस्थित पडतील . गावचे तात्या  (ब्राम्हण ) म्हणजे अंगात पांढरा शुभ्र नेहरू,कपाळावर गंध, पहाडी आवाज असलेला पन्नाशी मध्ये पोहचलेला सद्ग्रहस्थ होते.

पंचांग समोर ठेऊन ठान मांडून बसले होते.वाड्या वस्त्या तील गावातील सर्व शेतकरी वर्ग जमला होता.तात्या काय सांगतात या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.त्याला कारण ही तसेच होते.ज्या काळ्या आईची वर्षभर सेवा केली जात होती तिच्या मधून या वर्षी कोणते पीक चांगले येईल हे ते तात्या पंचांग मध्ये पाहून सांगत होते.कोणत्या पिकाला चांगला गुरू आहे ते ऐकायला मिळत होते.संक्रांत कशावर येईल हे ही तात्या सांगत होते.ज्या ज्या पिकाला चांगला गुरू असेल त्याच पिकाची लागवड शेतकरी करत होता.

मग त्या पद्धतीने बियानाची तयारी करण्यास त्याला एक दीड महिन्याचा कालावधी मिळत होता. असे पंचांग वाचून झाले होते. नंतर गावच्या सप्ताह बद्दल साधक बाधक चर्चा करण्यात करण्यात आली होती. साधारण कार्यक्रमाचे स्वरूप कसे असेल , काल्याचे कीर्तन कोणते असावे,वर्गणी किती ठेवावी,अशी चर्चा चालू झाली होती.त्यावेळी पुढारी मंडळी मोजकीच होती.त्यांनी बोलावे आणि सगळ्यांनी ऐकावे असे वातावरण होते.त्यामुळे कार्यक्रम चांगले होत होते.राजकारण हे फक्त तालुक्याच्या ठिकाणीच पहा वयाला मिळत होते.

सगळ्यांनी  खेळीमेळीच्या वातावरणात हा मीटिंगचा कार्यक्रम पार पडला होता.प्रत्येकाने पान विडा घेतला होता, गावच्या सरपंचांनी खिशातून 100 रुपयाची नोट काढली होती,त्यावर एक रुपया पान सुपारी अशी दक्षिणा पंचांग वर ठेवली होती.असा हा पाडवा वाचून झाला होता आणि  सगळे जण आपआपल्या घरी पोहचले होते.गुढीला नैवेद्य म्हणून त्याच्या घरधणीन ने तांदुळाची खीर आणि चपाती बनवली होती.घरातील सगळ्या मंडळींनी खीर ,चपाती ,घेवड्याची आमटी व इंद्रायणीच्या भाताने न्याहारीत रंगत आणली  होती. गावातील प्रत्येकाच्या घराला गुढी उभी राहिली होती.

प्रत्येकाच्या गुढी ला वेगवेगळ्या रंगाची साडी लावलेली होती,त्यामुळे गावातील घरांचे रूपच पालटून गेले होते.
      काही मंडळींनी पाडव्याच्या दिवसाचा मुहूर्त पाहून काही नवीन कामे मुद्दाम हून काढली होती.कारण या दिवशी तात्या कडे मुहूर्त पहायला लागत नव्हता.संध्याकाळचे पाच वाजले होते.दिवस भराच्या तप्त भूमिकेने सूर्याने  थोडी मवाळ भूमिका म्हणजे थोडा गारवा तयार केला होता.हिम्मत रावांची दोन्ही मुले आणि आजू बाजूची लहान लहान मुले जमा झाली होती.कारण त्यावेळी गुढी सोडायची होती.गुढी सोडून झाल्या नंतर गुळाचा आणि खोबऱ्याचा गोड प्रसाद सगळ्या मुलांना दिला होता.
     
पाडव्यातील गोडवा या प्रसादाने संसार रुपी रथ चक्रात आणला होता.अशा रीतीने तो पाडवा गोड झाला होता.
(  शब्दांकन- बाळासाहेब मेदगे, औदर)

( १९८०  च्या दशकामध्ये ग्रामीण भागात साजरा होत असलेला गुढीपाडवा ,  बाळासाहेब मेदगे यांच्या लेखणीतून त्या आठवणींना उजाळा देऊ )

error: Content is protected !!