मोहन धनु कार:__ असाध्य ते साध्य करिता सायास कारणे अभ्यास तुका म्हणे…..

       मे महिना ,टळटळीत दुपार. कडक ऊन अंगावर घेत सुस्तावलेला ,बिनगर्दीचा  रस्ता.
    गरगर फिरणार्‍या गरगर  पंख्याने सुद्धा गरम वारे द्यायची शपथ घेतलेली ,त्यामुळे उन्हाच्या झळा जास्तीत जास्त तीव्र होत चाललेल्या आणि त्यामुळे घामाने चिंब चिंब भिजलेली माणसं.
   
       हे सगळं पाहणारा रविराज मात्र क्रोधानं तळपणारा.
      एक रुग्ण व नातेवाइकांसह माझ्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला ,धरणीमाता उन्हानं आणि रुग्ण वेदनेनं तळमळतोय.
      रुग्णाची अवस्था दयनीय, शोचनीय .
   त्याचे सर्वांग कापडाने आच्छादित चेहरा भाजल्यासारखा मी तपासणी टेबलावर त्याला घेतला.
  
      गुंडाळलेलं होतं ते कापड मी बाजूला केल आणि थक्क झालो.
     रुग्णाच्या शरीरावर इंच इंच फोड दाटीवाटीने  तरारलेलं .काही फोड फुटलेले .
     त्यातून पुवाचा अभिषेक त्याच्या सर्वांगावर वेदना पराकोटीच्या .
    
     शरीरावर अशी एकही जागा नाही की जिथे फोडांची शेती नाही.
      मानवी शरीरावरची  त्वचा गोंडस, गुलाबी ,नितळ ,स्वच्छ कशी असायला हवी, इथे  चित्र बरोबर उलट !
    त्वचेचे हिंदळे माझ्या मनाला जाणवत होते .डॉक्टरी हाताला स्पर्श करू द्यायची सोय उरलेली नाही .
   
    माझ्या अंगावर सरसरून काटा आला .जळण्या –भाजण्याच्या अनेक केसेस मी पाहिल्या होत्या पण इतकी भयानक, भेसूर, विद्रूप केस मी प्रथमच पाहत होतो.
      त्वचेवरच्या फोडांना दुर्गंधी सुटली होती .
     हा रुग्ण नाव मोहन धनुकार……
       मोहनचं  निरीक्षण करून मी माझ्या टेबलाकडे आलो.
      खुर्चीत बसल्यावर प्रथम त्याची केस हिस्टरी पाहिली केस हिस्ट्री पेपर्स , आत्तापर्यंत त्याला दिलेली ट्रीटमेंट वाचून काढली.
     
    माझ्या लक्षात आलं की, मोहन धनुकार मेम्पीगस व्हलगरीस त्वचेच्या आजारांन ग्रासलेला आहे.
       खरंतर हा आजार काबूत ठेवण्यासाठी काहीच वैद्यकीय उपाय योजना नाही कारण हा आजार ऑटो इम्युन डिसीज या प्रकारात मोडतो.
      
      या प्रकारच्या रुग्णात फक्त वेदनाशामक औषध देतात .त्यात
स्टेराइडर्स असतात पण स्टिरॉइड्स  चा मारा इतक्या भयानक पद्धतीने करण्यात आला होता की त्यामुळे स्टिरॉइड्स चा दुष्परिणाम होऊन मोहन चा चेहरा सुजला होता .
  त्वचेवर त्यावचा फाडून जखमा झालेल्या होत्या .
    त्या जखमातुन दुर्गंधीयुक्त  स्त्राव वाहत होता .
    जवळजवळ दोन वर्ष मोहन  हा आजार सोसत होता पण एवढी औषधे घेऊनही त्याचा आजार कमी न होता वाढतच होता.
   
      मोहन मनोधैर्य खचत होतं.
शारीरिक ,मानसिक यातना
भोगूगण्यापलीकडे त्याच्या हातात काहीच नव्हतं .
     त्याची पत्नी त्याच्या आजारांन मनाने पूर्ण उद्ध्वस्त झाली होती. कपाळावरील कुंकवाचं पुढे काय होणार याची चिंता तिला पोखरत होती .
     मी विचार मग्न झालो. मोहनच्या आजारांना मला आव्हान दिले होते .मी ते स्वीकारले .काही वैद्यकीय संदर्भग्रंथ पाहिले  ,त्वचारोग तज्ञ यांना पाचारण करून त्यांना मोहनची केस दाखवली .
    
      त्यांच्याशी विचारविनिमय केला .
      दिवस-रात्र मी अस्वस्थ होतो.
   त्याला कोणती ट्रीटमेंट द्यावी याचाच विचार चक्रीवादळा सारखा भिरभिरत होता.
      रुग्ण बरा झाला पाहिजे
धनुकार फॅमिली वर आकाश कोसळू द्यायचे नाही .मृत्यूला रोखायचे कसे ?
     विविध प्रश्न होतेच .
    
     अखंड विचारा नंतर मी ट्रीटमेंटची एक दिशा निश्चित केली.
      प्रथम त्याच्या शरीरावरच्या  चिघळणार्ऱ्या जखमांना ठीक करायचे .
    असा उपचाराचा पहिला टप्पा मी निश्चित केला.
     माझा कंपाउंडर नितीन डुंबरे ला सूचना दिल्या .
      नितीन औषध घेऊन रोज जायचा, जखमा स्वच्छ करून औषध लावून ड्रेसिंग करायचा.
     
      जवळजवळ तीन चार महिने सलग नितीन जात होता.
      जखमांवर औषध लावून र ड्रेसिंग करीत होता .
    हळूहळू त्या जखमा चिघळणे थांबलं .
     जखमा भरून आल्यामुळे या वेदनांची तीव्रता काही अंशी कमी होऊ लागेली.
    तो केंद्रीय कर्मचारी होता.
      जखमा भरून आल्यावर त्याला हुशारी वाटली .
     शारीरिक दृष्ट्या स्थिर होता काठीचा आधार घेऊन चालायला लागला .
    
  हळूहळू कामावर रुजू झाला.
       रोज सकाळी मी सहा वाजता फिरायला बाहेर पडलो की  तो भेटायचा .
     त्याचा चेहरा पूर्वपदावर आला.
     सूज  गेली.
     वेदना मुक्त झाल्याने चेहऱ्यावर हसू उमटायला लागलं.
      तो आजारपणात तूर्त डिप्रेशनमध्ये होता .
     आता तो त्या नैराश्याच्या गर्तेतून सावरला .
      त्याला त्याच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांची जाणीव होती.
     त्यातला हा सकारात्मक बदल पाहून त्याची पत्नी व मुले सुखावली .
    
     घराच्या मागच्या दरवाजाने दुःख पळाले आणि पुढच्या दाराने सुख प्रवेशले.
      मोहनला त्याच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांची व सहकार्याची या काळात विलक्षण मदत झाली.
       शिक्षक असलेले त्याचे बंधू त्याच्या पाठी लक्ष्मणासारखे उभे होते .
    आता मोहन धनुकारची बदली अमरावतीला झाली आहे.
      मध्यंतरी त्याचे बंधू भेटले त्या वेळी म्हणाले,” मोहन आता मजेत आहे “.
     
      मोटरसायकलवरून ऑफिसात जातो .
    पत्नी मुलांबरोबर बागेत जातो.
     भाजी बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी जातो .
      हे ऐकल्यानंतर मला अतिशय आनंद झाला .
     एक गोष्ट वाचकांनी लक्षात घ्यावी की आपल्या शरीरात जेव्हा अचानक बदल होतात त्यासाठी कोणतीही ठराविक औषध माझ्या मनाप्रमाणे नसते .
     अशा आजारांवर ट्रीटमेंट देताना खूप विचार करावा लागतो.
    
     केवळ रुग्ण एखादी तक्रार करतो म्हणून लगेच त्याला
पेनकिलर, या  स्टेरॉईड देणे योग्य नाही नाही .
     काही आजार पतंगासारखे असतात .
     पतंग तयार करणे ,पतंगाचे सूत्र व्यवस्थित करणे आणि थोडाफार ट्रीटमेंटचा मांजा लावून त्याला आकाशात सोडणे .
    एकदा  तो नैसर्गिक वाऱ्याच्या झोतात आला की आपोआप उंच जातो .
     रुग्णाची अवस्था वाईट असते.
      चारी बाजूंनी तो आणि त्याचे कुटुंबीय  खचलेले असतात.
      तेव्हा रुग्णाला सांभाळताना, कुटुंबीयांना आधार द्यावा लागतो.
     
     असा एखादा मोहन सारखा पेशंट माझ्याकडे आला तर त्याला मोहनने पचवलेले दुःख नसावे अशी मी प्रार्थना करतो……
    ( शब्दांकन- ला.डाॅ.शाळिग्राम भंडारी)

error: Content is protected !!