मावळ सत्य लाईव्ह बुलेटीन विशेष: उत्तम आरोग्यासाठी योग्य वेळी पुरेशी झोप अत्यावश्यक आहे. योग्य वेळी योग्य प्रमाणात घेतलेली झोप सुख, बल, वीर्य, ज्ञान वाढवते तर अयोग्य प्रमाणात व अपुरी झोप ही दु:ख, रोग, कृशता, बलक्षय व शुक्रक्षय, अज्ञानाला कारणीभूत ठरते.त्यामुळे योग्य वेळी झोपलेच पाहिजे असे मत महावीर हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ. विकेश मुथा यांनी व्यक्त केले.
झोपचे महत्व विशद करताना मुथा म्हणाले,”आहार निद्रा ब्रह्मचर्य; युक्त्या प्रयोजिर्ते : शरीर धार्यते!’ अशाप्रकारे आयुर्वेदात झोपेचे महत्त्व विशद केले आहे. आहार, निद्रा व युक्तीपूर्वक ब्रह्मचर्य, या तीन गोष्टी शरीराचे स्वास्थ टिकवून ठेवण्यासाठी मदत करतात. सर्वसाधारणपणे निरोगी व्यक्तींसाठी सहा ते आठ तासांची झोप ही दररोज अत्यावश्यक आहे.
ती झोप शांत व गाढ असायला हवी. अनावश्यक रात्रीचे जागरण शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. रात्रीच्या जागरणामुळे वात दोष, रूक्ष गुण वाढण्यास मदत होते. त्यातूनच पुढे जाऊन वाती संदर्भातील व्याधी आपल्यामागे लागतात. रात्री जागरण झाल्यास जेवढा वेळ जागरण झाले त्याच्या अर्धवेळ व न जेवता झोप घ्यावी.
केवळ उन्हामध्येच दुपारची झोप घ्यावी, अन्यथा इतरवेळी दुपारी घेतलेली झोप शरीराची स्निग्धता, कफ व पित्त वाढवते. व्याधी पीडित, वृद्ध, बालकांना दुपारी थोडीशी झोप घ्यायला काही हरकत नाही. प्रिय व्यक्तींचा सहवास, त्यांची मनमोकळे बोलणे व मनाला आवडणाऱ्या गोष्टींमधून गाढ झोप लागते, असेही आयुर्वेदिक तज्ज्ञ सांगतात.
ज्यांना लवकर झोप येत नाही किंवा झोप मधूनच खंडित होत असल्यास ‘वात’ वाढतो. त्यातून आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. त्यामुळे त्या व्यक्तींनी रात्री झोपण्यापूर्वी म्हशीचे थंड दूध प्यावे. कोमट तेलाने अंगाला व डोक्याला मालिश करावी. कानात देखील थोडसं तेल सोडावे. तत्पूर्वी, तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यायला हवा.
झोपताना आवर्जून लक्षात ठेवा चतु:सूत्री…
झोपताना मोबाईलचा (सोशल मीडिया) वापर टाळावा
रात्रीच्या जेवणानंतर (किमान अर्धा तास) लगेचच झोपू नये
जेवणानंतर डाव्या कुशीवर झोपावे, पचनास मदत होते
उन्हाळ्यात दुपारची झोप ठीक, पण इतरवेळी दुपारी झोपल्यास कफ, पित्त वाढू शकते.
महिला असो वा पुरुष, लहान मुले असो, त्यांच्या आजारपणातील प्रमुख कारणांमध्ये अपुरी झोप हे एक कारण असते. त्यामुळे आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे मानसिक ताण, अयोग्य व अवेळीचा आहार आणि अपुरी झोप टाळल्यास निश्चितपणे प्रत्येकजण सुदृढ होऊ शकतो. झोपताना मोबाईलच वापर न केल्यास शांत व गाढ झोप लागू शकते.
- तळेगाव चाकण रस्त्यावर अवेळी धावणा-या कंटेनरला लगाम कधी?
- बहिणाबाईंच्या पुण्यतिथीनिमित्त चुलीवर भाकरी करताना ऐतिहासिक कविसंमेलनशब्दधन काव्यमंचाचा उपक्रम
- नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकीमध्ये’स्पेस ऑन व्हील्स’ हा अनोखा उपक्रम
- पिंपरी – चिंचवड कार्यकर्त्यांची खाण – दादा वेदक
- संस्कार प्रतिष्ठानच्या यशात मानाचा तुरा