अनुभूती– स्वतःच्या क्षमतेची!

मित्रांनो आपल्यातील अनेक व्यक्तींना स्वतःच्या व्यक्तिमत्वात असलेल्या कला कौशल्य आणि कमतरता याची सांगडच घालता येत नाही!- आपल्यात असलेल्या कौशल्या ऐवजी ते आपल्यात असलेल्या कमतरते बद्दलच सतत विचार करीत असतात.

त्यामुळे मित्रांनो होतं काय की त्यांच्यात आपोआपच एक न्यूनगंड निर्माण होतो! वास्तविक त्यांनी आपल्यातील कलेच्या क्षमतेचा शोध घेत घेत त्या कलेच्या विकासा वरच जास्त भर दिला पाहिजे! पण मित्रांनो दुर्देवाने तसे होत नाही!

हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी आपण खालील उदाहरणे घेऊ या—मित्रांनो रोज भेटणारा आपल्याला साधा कंडक्टर एकाच वेळी किती काम करतो?– तो प्रत्येकाला हवं असलेलं तिकीट देतो त्या प्रवासात मी दिलेले पैसे मोजून घेतो त्याच वेळी तिकीट घेणारा व तिकीट न घेणारा त्यांच्यावर नजर ठेवून असतो एवढेच नव्हे तर आपल्या गाडीतील प्रवाशांना त्यांच्या उतरण्याच्या बस स्टॉप ची घोषणा करतो आणि शेवटी बस डेपोला पूर्ण हिशोब देतो .

याचा अर्थ असा की तो अष्टपैलू नसेल पण अष्टावधानी निश्चितच असतो.अशाच प्रकारचं दुसरे उदाहरण घेऊया!–किराणा दुकानदार एकाच वेळी अनेक फोन घेतो त्यातून त्याला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देतो त्यांना योग्य तो भाव सांगतो त्याच वेळी आपल्या गल्ल्यात पैसे ठेवतो समोरच्या गिर्‍हाईकाला हवा असलेला किराणामाल मोजून देतो  आणि आपल्या पत्नीने आणलेला चहा सुद्धा प्राशन करतो.

म्हणजे मित्रांनो एक साधा दुकानदार सुद्धा आपल्याला अष्टावधानी व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडवतो!–हा अनुभव प्रत्येक व्यवसायात आपल्याला जर– आपण डोळसपणे त्याकडे बघितलं तर!– दिसून येतो!- म्हणूनच मित्रांनो कुठलाही व्यवसाय करताना स्वतःला कधीच कमी लेखू नये हाच खऱ्या अर्थाने आपल्या स्वतःचा शोध घेणे आहे आणि त्यामुळेच प्रत्येकाने आपला व्यवसाय आपण स्वाभीमानाने करणार आहोत हीच मानसिकता वृद्धिंगत केली पाहिजे!
( शब्दांकन- डाॅ. शाळिग्राम भंडारी,तळेगाव दाभाडे)

error: Content is protected !!