तळेगाव दाभाडे:
येथील मोफत व्यावसायिक प्रशिक्षण देणारी संस्था ग्रामीण विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था अर्थात रूडसेट संस्था यावर्षी  रौप्य महोत्सव साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने मंगळवार ता.३१ला तळेगाव दाभाडे येथील ईशा हॉटेल येथे सकाळी दहा वाजता स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा  संपन्न होणार आहे अशी माहिती संस्थेचे संचालक  प्रवीण बनकर यांनी दिली.

या कार्यक्रमास पुणे जिल्हाधिकारी  राजेश देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  आयुष प्रसाद, कॅनरा बँकेचे महाप्रबंधक  राजेश सिंग, मावळचे आमदार  सुनील शेळके, तसेच माजी राज्यमंत्री बाळ भेगडे व संस्थेचे कार्यकारी संचालक  गिरीधर कल्लपुर व संस्थेचे जिल्हा स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

ही संस्था डॉ डी. वीरेंद्र हेगडे यांच्या विचारातून तीन ते पाच वर्षाचे उच्च शिक्षण घेऊन दुसऱ्याचे पगारी हिशोब लिहिण्याची नोकरी करण्यापेक्षा स्वयंरोजगाराद्वारे स्वतःचे अर्थपूर्ण हिशोब लिहा यानुसार देशभरात २७ शाखा कार्यरत असून त्यापैकी महाराष्ट्रातील एकमेव शाखा ही तळेगाव दाभाडे येथे 1997 पासून कार्यरत असून या संस्थेमधून आत्तापर्यंत पंधरा हजार लोकांनी प्रशिक्षण पूर्ण केले व त्यापैकी 99 हजार लोकांनी आपला स्वतःचा व्यवसाय स्थापन केलेला आहे.

मावळ तालुक्यातील जवळ जवळ आठ हजार लोकांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे व त्यापैकी पाच हजार लोकांनी आपला स्वतःचा स्वयंरोजगार स्थापन करून इतरही लोकांना त्या माध्यमातून मदत केलेली आहे. या प्रशिक्षणातून मावळ तालुक्यातील युवकांनी कुक्कुटपालन, शेळीपालन दुग्ध व्यवसाय व कृषी पर्यटन हे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू केले असून त्यातून त्यांनी स्वतःची व कुटुंबाची आर्थिक प्रगती केलेली आहे.

मावळ तालुक्यातील यापैकी साडेतीन हजार महिला प्रशिक्षित झाल्या असून दोन हजाराच्या वर महिलांनी आपले स्वतःचे हक्काचे उत्पन्नाचे साधन निर्माण केले आहे. अशी माहिती संस्थेचे संचालक श्री प्रवीण बनकर यांनी दिली.ही संस्था डॉक्टर डी वीरेंद्र हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झाले असून याचे मुख्य प्रवर्तक कॅनरा बँक व स्थळ मंजुनाथेश्वर एज्युकेशन ट्रस्ट दक्षिण कर्नाटका हे आहेत.

या संस्थेमधून शेतीपूरक व बिगर शेती व्यवसाय प्रशिक्षणे 10 दिवस ते 45 दिवसाचे पूर्णवेळ रहिवासी स्वरूपाची असून, त्यामध्ये रहिवास भोजन प्रात्यक्षिक साहित्य गणवेश हे सर्व मोफत दिले जाते. ग्रामीण भागातील 18 ते 45 वर्ष वयोगटातील बेरोजगार युवक युवती हे प्रशिक्षण पूर्ण करू शकतात.हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संस्थेमार्फत देण्यात येणारे प्रमाणपत्र हे भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालय यांनी मान्यता प्राप्त केले असून आपल्या घराजवळच्या राष्ट्रीयकृत बँकांमधून त्यांना व्यवसाय करण्यासाठी बँकांच्या विविध योजनेत लाभ घेण्यासाठी पात्र ठरू शकतात.

error: Content is protected !!