मावळ तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
तळेगाव दाभाडे :
येथील एम आय टी कॉलेज येथे पंचायत समिती वडगाव, मावळ तालुका मुख्याध्यापक संघ, विज्ञान अध्यापक संघ व एम आय टी ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मावळ तालुका विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मावळचे गट विकास अधिकारी सुधीर भागवत व गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळूंज यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी कृष्णा भांगरे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश गायकवाड, मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे विश्वस्त बी एम भसे, तालुकाध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, उपाध्यक्ष उद्धव होळकर, सचिव विकास तारे, जिल्हा प्रतिनिधी बाळासाहेब उभे, एम आय टी कॉलेज चे प्राचार्य विनोद साळवे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुधीर भागवत म्हणाले, “ज्ञान आणि विज्ञान यांची सांगड घातल्यास विद्यार्थ्यांचा विकास होत असतो. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रश्न पडले पाहिजेत यासाठी समस्यांचे बराकीने निरीक्षण करणे गरजेचे आहे. प्रश्नाने प्रगल्भता वाढते यातून वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागतो. विविध विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातूनच भावी वैज्ञानिक तयार होतील अशी आशा व्यक्त केली.

विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला तसेच शिक्षक व परिचारक यांनी देखील आपले प्रकल्प प्रदर्शनात मांडले. प्रकल्प, निबंध, वकृत्व व प्रश्नमंजुषा आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यासाठी पर्यवेक्षक म्हणून रेश्मा यादव, अशोक सोनवलकर, रोहन साठे, अनंता दामगुडे, मारुती खेडेकर आदींनी काम पहिले.

विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन मावळ तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष सुरेश सुतार, समन्वयक वसंत बुरांडे, ज्योती लावरे, प्रकाश शिंदे आदींसह विज्ञान अध्यापकांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम आय टी कॉलेजचे प्राचार्य विनोद साळवे यांनी केले सूत्रसंचालन शलाका गायकवाड यांनी केलेतर आभार विस्तार अधिकारी कृष्णा भांगरे यांनी केले.

error: Content is protected !!