तळेगाव दाभाडे:
लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांचा वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण हा विचार घेऊन मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यरत आहे,समाजातील रांजल्या गंजल्या साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मदतीचा हात कायमच पुढे राहील असा विश्वास मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिला.
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नागरिक सेलच्या वतीने तळेगाव स्टेशन येथील वानप्रस्थाश्रमात ज्येष्ठ नागरिकांना ऊबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले यावेळी खांडगे बोलत होते.
साप्ताहिक अंबरचे संपादक व वानप्रस्थाश्रमचे विश्वस्त सुरेश साखवळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्य कर्तृत्वाचा आलेख मांडला. पवार हे सर्वागीण व्यासंग असलेले लोकनेते असून स्व.यशवंतराव चव्हाण यांचे राजकीय,सामाजिक क्षेत्राशी समरस असलेले देश पातळीवरील एकमेव नेते असल्याचे सांगितले.
लोकनेते शरद पवार हे राजकारणातील एकमेव नेते असे नेते आहेत,ज्यांचे राजकारण,समाजकारण,अर्थकारण,नाट्य,संगीत,साहित्य,कला ,क्रिडा क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील व्यासंग फार मोठा आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या विचारावर अधिष्ठान ठेवून ते सामाजिक जीवनात वावरत आहे असे सांगून साखवळकर म्हणाले,” देशांतील ज्येष्ठांना ही सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे,त्यांच्या समृद्ध अनुभवाचा लाभ आजच्या पिढीला मिळावा यासाठी पवार सातत्याने आग्रही आहेत. ज्येष्ठांना सतत कामात गुंतवून ठेवून त्यांना सन्मानपूर्वक वागणुकीचा पायंडा पवार यांनी कृतीतून दाखवून दिले आहे.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी ज्येष्ठ नागरिक सेलच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून तरुणांनाही लाजवेल असे ज्येष्ठ नागरिक सेलचे काम असल्याचे सांगितले. तसेच वानप्रस्थाश्रमास मदतीचे आश्वासन दिले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक सेलचे किसन वहिले, सुरेश कुडे,बाळकृष्ण ढोरे, विजय चव्हाण यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक सेलचे नितीन भांबळ यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ नागरिक सेलचे  अध्यक्ष विष्णू शिंदे यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष अरूण गराडे यांनी आभार मानले.

You missed

error: Content is protected !!