आंबी पुलाचे काम रखडले
आठवड्यात काम न झाल्यास जलसमाधी घेणार
तळेगाव दाभाडे:
  आंबी येथील पुलाचे काम पूर्ण झाले नाही, तर येत्या सोमवारी (दि. १२) जलसमाधी घेणार आहे, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांनी दिला आहे.
मराठे यांनी  पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकारी राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, वराळे आंबी व तळेगाव एमआयडीसीच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा जुना पूल आहे. हा पूल अवजड वाहनांमुळे ढासळला आहे. त्यानंतर, नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले.
नवीन पुलाचे काम गेली ४ ते ५ वर्षांपासून चालू आहे. जवळजवळ ८० टक्के काम पहिल्या टप्प्यातील पूर्ण झाले, तर उर्वरित काम तीन वर्षापासून थांबलेले आहे. त्यामुळे ८ ते ९ गावांचा मुख्य रस्ता असणारा हा पूल बंद आहे. त्यामुळे येथील एमआयडीसी कामगारांना व शेतकरी, तसेच सर्व कंपन्यांची वाहतूक ९ ते १० किलोमीटर अंतराचा वळसा घालून होत आहे.
या पुलाच्या कामाबाबत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना वारंवार माहिती दिली आहे. मात्र, त्याकडे कायम दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
त्यामुळे सात दिवसांत योग्य ती कार्यवाही करून पुलाचे काम सुरू करून, पूल नागरिकांसाठी खुला करण्याची मागणी परिसरातून जोर धरू लागली आहे.

error: Content is protected !!