पिंपरी: ‘युवकांनी शिवरायांना आदर्श मानायला हवे!’ असे प्रतिपादन राज्यस्तरीय युवा समाजभूषण पुरस्कारप्राप्त व्याख्याते सिद्धनाथ घायवट जोशी यांनी वाकड येथे केले. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जयंतीनिमित्त लोकसहभागातून आयोजित करण्यात आलेल्या विशेष व्याख्यानात सिद्धनाथ घायवट जोशी बोलत होते.

आपल्या ओघवत्या वक्तृत्वशैलीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंगांचे वर्णन करीत घायवट जोशी पुढे म्हणाले की, ‘आजची प्रगल्भ युवा पिढी ही शिवाजी महाराजांची तथा तत्कालीन मावळ्यांची व्यक्तिरेखा आपल्या स्वतःमध्ये रुजवू पाहत आहे आणि ही गोष्ट खरोखर आनंदमयी आहे; परंतु शिवाजी महाराजांसारखे किंवा मावळ्यांसारखे दिसण्यासाठी दाढी, बाळी, चंद्रकोर या सर्व गोष्टींचे अनुकरण करण्याऐवजी शिवरायांचे आचारविचार मनामध्ये बिंबवणे हे अत्यंत गरजेचे आहे.

शिवरायांसारखे बाह्यरूप अंगीकारण्यापेक्षाही त्यांच्या निष्कलंक चारित्र्याचे अनुसरण आजच्या काळात अतिशय गरजेचे आहे. शिवरायांनी सर्व जातीधर्माच्या, पंथांच्या लोकांना एकत्र आणून स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी कधीही जातीपातीवरून, वर्णावरून किंवा अजून कुठल्याही प्रकारचा भेदभाव केलेला नाही. त्याचबरोबर महाराजांनी परस्त्रियांना आई, बहिणींप्रमाणे वागवले, समस्त मावळ्यांना आपलेपणाने वागवले. या सर्व गोष्टी कुठेतरी आपण आपल्या स्वतःमध्ये बिंबवणे आणि तशी वर्तणूक कायमस्वरूपी ठेवणे, हे सामाजिक एकोप्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे; त्यातूनच आपला आजचा आणि उद्याचा समाज, राज्य आणि राष्ट्र घडायला सुरुवात होईल आणि आपले राष्ट्र हे सर्वांगाने प्रगतिपथावर जाईल!’

गौरव देशमुख यांनी सादर केलेल्या शिववंदनेने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. संदीप पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अतुल गायकवाड, अक्षय कुलकर्णी, श्रीकांत भोसले, सौरभ देशपांडे, मयूर पाटील, स्वप्निल भालेराव, अभिजित पाटील, राहुल गायकवाड, दिलीप कांबळे, कुणाल पाटील, संदेश मोरे आदींनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमास वाकड, रहाटणी, थेरगाव आणि काळेवाडी परिसरातील आबालवृद्ध उपस्थित होते.

error: Content is protected !!