वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत आणि विनासायास पोहोचता यावे, यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने ‘मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशन’च्या वतीने मोफत वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. हा उपक्रम सन २०१६-१७ पासून सुरू असून यंदा नवव्या वर्षात पदार्पण करत आहे. यंदाच्या परीक्षेसाठी २,५०० हून अधिक विद्यार्थ्यांना या सेवेचा लाभ मिळणार आहे.
मावळ तालुक्यातील आंदर मावळ, पवन मावळ आणि नाणे मावळ या भागातील तळेगाव दाभाडे, लोणावळा, पवनानगर, कामशेत, वडगाव, कान्हे, कार्ला, शिवणे, उर्से, थोरण, डोणे, जांबवली, कांब्रे, चिखलसे, निगडे, आंबळे, खांडी आदी ४६ गावांमधील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रावर जाण्या-येण्यासाठी मोफत प्रवास व्यवस्था करण्यात आली आहे. 
पाच परीक्षा केंद्रांवर ४,५८२ विद्यार्थी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला मावळ तालुक्यातील पाच परीक्षा केंद्रांवर एकूण ४,५८२ विद्यार्थी बसणार आहेत. या विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहतूक सेवा उपयुक्त ठरणार आहे.
*इंद्रायणी कॉलेज, तळेगाव दाभाडे* – २,०९५ विद्यार्थी 
– *डी. पी. मेहता कनिष्ठ महाविद्यालय, लोणावळा* – १,४५० विद्यार्थी 
– *पवना ज्युनिअर कॉलेज, पवनानगर* – ३७० विद्यार्थी 
– *पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय, कामशेत* – ४८५ विद्यार्थी 
– *शिवाजी विद्यालय, देहूरोड* – ३३८ विद्यार्थी 

मावळ तालुक्यातील अनेक विद्यार्थी दुर्गम भागांतून येतात. परीक्षेच्या काळात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) बससेवा मर्यादित असल्याने तसेच अवैध प्रवासी वाहतुकीच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रांवर पोहोचणे कठीण होते. ही गरज लक्षात घेऊन आमदार सुनील शेळके यांनी पुढाकार घेतला आणि ‘घर ते परीक्षा केंद्र’ मोफत प्रवास सेवा सुरू केली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता येईल आणि परीक्षा संपल्यानंतर घरी परतणे सोयीचे होईल. गेल्या नऊ वर्षांपासून चालू असलेल्या या सेवेमुळे पालक आणि विद्यार्थी समाधान व्यक्त करत आहेत. 
या उपक्रमामुळे तालुक्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळत आहे. मागील वर्षीप्रमाणे यंदाही या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.  विद्यार्थ्यांसाठी ही मोफत सेवा उपयुक्त ठरणार असून, या उपक्रमामुळे परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मानसिक शांती मिळेल आणि परीक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल.अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधावा,मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशन
संपर्क: +91 96659 29009
आमदार सुनिल शेळके म्हणाले, “विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी शिक्षणासोबतच त्यांना आवश्यक सुविधा मिळणे गरजेचे आहे. ही मोफत वाहतूक सेवा विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू केली असून, भविष्यातही ती सुरू राहील.

error: Content is protected !!