पिंपरी : समाजाच्या सात्त्विकतेसाठी शुद्ध आचारविचारांची गरज असते!’ असे विचार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी  प्रीतम प्रकाश महाविद्यालय, इंद्रायणीनगर, भोसरी येथे व्यक्त केले. पाली – मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान, पिंपरी आयोजित वार्षिक शब्दोत्सव उपक्रमांतर्गत जीवनगौरव व अन्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते.
टाटा मोटर्सचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी अध्यक्ष कृषिभूषण सुदाम भोरे, प्राचार्य सदाशिव कांबळे, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, मानपत्र,  मानवस्त्र, पुष्पगुच्छ आणि ‘समग्र बाबा भारती’ हा ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार पीतांबर लोहार (लोकशिक्षक बाबा भारती पारदर्शक पत्रकारिता पुरस्कार), संविधान अभ्यासक आर. जी. गायकवाड (लोकशिक्षक बाबा भारती धम्मभूषण पुरस्कार), निवेदक प्रा. दिगंबर ढोकले (लोकशिक्षक बाबा भारती शब्दप्रतिभा पुरस्कार), कवयित्री सीमा गांधी आणि प्रतिमा काळे (लोकशिक्षक बाबा भारती काव्यप्रतिभा पुरस्कार) प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, ‘चांगुलपणाची बेरीज म्हणजे भारतीय संस्कृती आहे; तर स्वातंत्र्योत्तर संविधान संस्कृतीच्या सक्षमीकरणासाठी जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन कार्य केले पाहिजे. लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान असे सामाजिक अभिसरणाचे काम करते आहे, ही अभिनंदनीय बाब आहे. बौद्ध विचारांचा भारत आणि भारताबाहेर प्रचार अन् प्रसार करताना बाबा भारती यांनी बहुसांस्कृतिक भूमिका स्वीकारली होती!’ मनोहर पारळकर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.
मुख्य संयोजक पुरुषोत्तम सदाफुले यांनी पुरस्कारार्थींशी सुसंवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. पीतांबर लोहार यांनी बोलीभाषेतील ‘माय’ आणि ‘राम प्रहरात’ या कवितांचे सादरीकरण केले. लता पगारिया यांनी प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया यांच्या सहजीवनाची वाटचाल काव्यमय शैलीतून कथन केली. सत्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. पगारिया यांनी, ‘लोकशिक्षक बाबा भारती यांच्या नावाचा पुरस्कार हे मोठे भाग्य आहे.
जीवनगौरव हा अधिक सेवाप्रवृत्त करणारा सन्मान आहे!’ अशी भावना व्यक्त केली. वृक्षपूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. प्राचार्य सदाशिव कांबळे यांनी स्वागत केले. महेंद्र भारती यांनी प्रास्ताविकातून महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या व्यक्तींना प्रतिष्ठानच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले आहे, अशी माहिती दिली.
प्रभाकर वाघोले, रवींद्र भारती, जयश्री श्रीखंडे, बाजीराव सातपुते, निमिष भारती, प्रदीप गांधलीकर तसेच प्रीतम प्रकाश महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारीवर्ग यांनी संयोजनात सहकार्य केले. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. अरुण गराडे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!