पिंपरी : ‘हिंदवी प्रजासत्ताक’ हा शब्दप्रयोग पहिल्यांदा करणारे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडकेंसारख्या हजारो क्रांतिकारकांचे बलिदान कायम स्मरणात ठेवा!’ असा संदेश लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्सच्या अध्यक्ष नंदिता देशपांडे यांनी दिला.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचलित खिंवसरा पाटील शिक्षण संकुलामध्ये प्रजासत्ताक दिनाचा अमृतमहोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत असताना नंदिता देशपांडे बोलत होत्या. यावेळी प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अजय लंके, दीपा लंके, रोटरी क्लब ऑफ थेरगावचे अध्यक्ष दत्तात्रय कसाळे, महेश खामकर, लायन्स क्लब ऑफ पुणे फीनिक्सचे विनय देशपांडे, विनायक केळकर, जनसेवा सहकारी बँकेचे संचालक राजन वडके, आत्मजा फाउंडेशनच्या पदाधिकारी प्रियादर्शिनी गुरव, ऋचा वर्धे, डॉ. रंजना नवले, माजी नगरसेविका माया बारणे, क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे शाला समिती अध्यक्ष नितीन बारणे, व्यवस्थापक अतुल आडे, मुख्याध्यापक नटराज जगताप, अश्विनी बाविस्कर, आशा हुले आदी मान्यवर तसेच पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी आणि सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
बांधकाम व्यावसायिक अजय लंके यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थित सर्व मान्यवरांनी भारतमाता पूजन केले. राष्ट्रगीत, ध्वजगीत, राज्यगीत, चापेकर स्तवन आणि संविधान उद्देशिका वाचन प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या आरंभी घेण्यात आले. यावेळी नंदिता देशपांडे यांनी शाळेसाठी ₹ ११०००/- ची देणगी दिली. तसेच डॉ. रंजना नवले यांनी अभ्यासू व गरजू विद्यार्थ्यांसाठी ₹ ५१०००/- ची आर्थिक मदत दिली असून सहशिक्षिका शुभदा कानडे यांनी त्यांचे सासरे कै. बाळकृष्ण कानडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ₹ ५०००/- ची देणगी शाळेला दिली. तसेच अजय लंके यांनी शाळेसाठी एक लाख रुपयांचे उत्तम दर्जाचे ३० बेंच विद्यार्थ्यांना भेट दिले असून लवकरच २०० बेंच देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
दत्तात्रय कसाळे यांच्या आर्थिक साहाय्यातून शाळेमध्ये उभारलेल्या व्यासपीठाचे पूजन त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मनोगत व्यक्त करताना दत्तात्रय कसाळे यांनी, ‘मेंदूचा पासवर्ड आत्मविश्वास आहे हे लक्षात ठेवा आणि डिजिटल व्यवस्थेचा चांगला वापर करा!’ असा कानमंत्र विद्यार्थी व पालकांना दिला. तसेच १५ ऑगस्ट २०२४ पासून राजन वडके यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘स्मरणगाथा क्रांतिकारकांची’ या उपक्रमाची लेखी परीक्षा घेऊन प्रत्येक वर्गातून प्रथम तीन क्रमांकांना आत्मजा फाउंडेशनच्या पदाधिकारी प्रियादर्शिनी गुरव व सहशिक्षिका सुनीता घोडे यांनी बक्षीस देऊन अरमान शेख, समर्थ सागरे,भूमिका खंडागळे, अंकिता धिवार, राजलक्ष्मी भोईर, केतन सांगडे, सुप्रिया ठोसर, वैष्णवी क्षीरसागर, दिव्या चिलखे, गजानन जाधव, समर्थ क्षीरसागर, देवयानी ससाणे या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी ‘स्मरणगाथा क्रांतिकारकांची’ या पुस्तकाचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. राजन वडके यांनी महिला क्रांतिकारकांना वंदन करत आपल्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी, समाजासाठी करावा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय लंके यांनी सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. लोकमान्य टिळक माध्यमिक विभागातील अर्णवी अस्वले, श्रेयस बाकले या विद्यार्थ्यांना निबंध स्पर्धेत तर प्रसाद राठोड, रुद्र कदम, पूजा डुकरे, विद्या विटकरी या विद्यार्थ्यांना भौगोलिक सामान्यज्ञान स्पर्धेतील बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. तसेच बालविभागात पालकांसाठी आयोजित केलेल्या पाककृती स्पर्धेतील पूजा सोलंकी, मानवी खामगळ, पूजाकुमारी, छाया छिद्रे अशा विजयी पालक स्पर्धकांनादेखील गौरविण्यात आले.
सहशिक्षिका प्रज्ञा फुलपगार यांनी गायलेल्या जयोस्तुते या गीताने सर्वांना मंत्रमुग्ध केले. विविध देशभक्तिपर, समूहगीते, जयतु अहिल्या अभिवादन गीत, देशभक्तिपर नृत्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे बालवाडी ते इयत्ता नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भारतमातेस अभिवादन केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालक सदस्य आसराम कसबे लिखित ‘शिवगोंधळ’ गीत व नृत्यातून प्राथमिक विभागाने सादर केला. माध्यमिक विद्यार्थ्यांनी सादर केलेले मानवी मनोरे लक्षवेधी ठरले. श्रीयांश लकडे, अक्षरा रणपिसे, सम्यक रुमाले, अनुज शिंदे, ऋतुजा विटकर, ऋतुजा अस्वले, रुद्र कदम या विद्यार्थ्यांनी मराठी, संस्कृत, हिंदी, इंग्रजी अशा विविध भाषांमधून प्रजासत्ताक दिनाची माहिती सांगितली.
प्रभातफेरीतील तालबद्ध घोषपथक, विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे वेषभूषेतील विद्यार्थी प्रभातफेरीचे आकर्षण ठरले. ‘सुवर्ण भारत वारसा व विकास’ या संकल्पनेवर आधारित अमृतमहोत्सव प्रजासत्ताक दिनाचे मार्मिक फलकलेखन, आकर्षक कार्यक्रमपत्रिका, मनमोहक रांगोळी, अशा सर्वच पूर्वतयारीची उपस्थित मान्यवरांनी कौतुकाने दखल घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिता जोशी यांनी केले; तर सूत्रसंचालन सीमा आखाडे व केतन सांगडे यांनी केले आणि आभार मंजुषा गोडसे यांनी मानले. संपूर्ण वंदेमातरम् गायनाने प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा समारोप करण्यात आला.
- माघ शुद्ध दशमीच्या डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्या कीर्तनाला स्थगिती
- ‘मनाचे श्लोक’ पाठांतर स्पर्धेस मोठा प्रतिसादात संपन्न
- वस्तीगृहातील मुलींसमवेत लेकीचा वाढदिवस : बाबन्ना कुटुबांचे बर्थडे सेलेब्रिशेन
- मावळ राष्ट्रवादीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार व आमदार शेळकेंच्या अभिनंदनाचा ठराव
- राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धेत ‘बलम सामी’ प्रथम