मुंबई:
रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद यांचे निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला, गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. स्वामी स्मरणानंद २०१७ मध्ये रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष बनले होते.
आर.के. मिशनच्यावतीने अधिकृतपणे स्वामीजींच्या निधनाचे वृत्त देण्यात आले आहे. महाराजांना रात्री ८.१४ वाजता महासमाधी घेतल्याचं मठाकडून सांगण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह देशातील अनेक दिग्गज नेत्यांनी स्वामींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
२९ जानेवारी रोजी युरिनमध्ये इन्फेक्शन झाल्याच्या कारणास्तव त्यांना रामकृष्ण मिशन सेवा प्रतिष्ठाणमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर, त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने ३ मार्च रोजी व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. आज अखेर स्वामींनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या निधनाने त्यांचे अनुयानी आणि भाविकांनीही दु:ख व्यक्त केलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करुन स्वामीजींच्या निधनावर शोक व्यक्त केला. रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मशिनचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंदजी महाराज यांनी आपलं जीवन अध्यात्म आणि सेवा कार्यासाठी समर्पित केले. महाराजांनी असंख्य मनांवर व बुद्धीवादींवर आपला प्रभाव निर्माण केला आहे.
त्यांची करुणा आणि बुद्धीमता पुढील पिढ्यांसाठी कायम प्रेरणा असेल, असे म्हणत मोदींनी स्वामीजींच्या निधनानंतर श्रद्धांजली अर्पण केली.
दरम्यान, स्वामीजींसोबत गेल्या अनेक वर्षांपासून माझे ऋणानुबंध होते. २०२० सालची माझी बेलुर मठातील यात्रा मला आज आठवते, जेव्हा मी त्यांच्यासोबत संवाद साधला होता. काही दिवसांपूर्वी कोलकाता येथे जाऊनही मी त्यांच्या प्रकृतीविषयी जाणून घेतले होते. बेलुर मठातील असंख्य अनुयाची व भाविकांसोबत माझ्या सहवेदना आहेत, असेही मोदींनी म्हटले आहे.