क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने शौर्य जागरण यात्रेचे स्वागत
पिंपरी:
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने चिंचवडगाव येथे सायंकाळी पाच वाजता विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत आयोजित शौर्य जागरण यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, विश्व हिंदू परिषद प्रांत सहमंत्री ॲड. सतिश गोरडे, भाजपा जिल्हा अध्यक्ष शंकर जगताप, आमदार उमा खापरे, विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री धनंजय गावडे,
अशोक यलमार, विजय देशपांडे, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक ॲड. मोरेश्वर शेडगे, डॉ. शकुंतला बन्सल, नितीन बारणे, राहुल बनगोंडे, आरती शिवणीकर, क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती संचालित शाळांमधील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासह विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती.
छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे ३५०वे वर्ष आणि विश्व हिंदू परिषद स्थापनेचे हीरक महोत्सवी वर्ष अशा दोन्ही घटनांचे औचित्य साधून संपूर्ण भारतातून आयोजित करण्यात आलेल्या या शौर्य जागरण यात्रेचे  इंद्रायणीनगर – संत तुकारामनगर – आकुर्डी या मार्गाने सायंकाळी पाच वाजता चिंचवडगावात आगमन झाले. छत्रपती श्री शिवाजीमहाराज यांचा सिंहासनारूढ असलेला भव्य पुतळा रथावर पुष्पमालांनी सजवलेला होता. ढोलताशा आणि मंगल वाद्ये यांचा गजर आणि उपस्थितांनी ‘छत्रपती शिवाजीमहाराज’ , ‘छत्रपती संभाजीमहाराज’ , ‘राजमाता जिजाऊ माँसाहेब’ यांचा जयघोष करीत रथावर पुष्पवृष्टी केली.
याप्रसंगी गिरीश प्रभुणे यांनी, “क्रांतिवीर चापेकर बंधूंनी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या चरित्रापासून प्रेरणा घेऊन हौताम्य पत्करले. या शौर्य जागरण यात्रेची प्रेरणा आपल्या घराघरांत पोहोचली पाहिजे. भावी पिढीला सक्षम, देशाभिमानी आणि स्वाभिमानी करण्यासाठी ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा आणि शिवचरित्र यांची पारायणे झाली पाहिजेत!” असे विचार मांडले. त्यानंतर समर्थ रामदासस्वामी रचित “शिवरायांचे आठवावे रूप…” या कवनाचे सामुदायिक गायन क्रांतिवीर चापेकर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी केले.

error: Content is protected !!