जनसंख्या वाढली पण माणूस हरवत चालला आहे: अण्णा हजारे
पिंपरी:
“समुद्रासारखी अफाट जनसंख्या वाढली आहे; पण माणूस अन् माणुसकी हरवत चालली आहे! या पार्श्वभूमीवर ‘माणूसपणाची सनद’ आणि ‘बंधुतेचं झाड’ अशा ग्रंथांची समाजाला नितांत आवश्यकता आहे!” असे विचार ज्येष्ठ समाजसुधारक आणि गांधीवादी विचारवंत पद्मभूषण अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा या संस्थेने आयोजित केलेल्या ज्येष्ठ साहित्यिक उद्धव कानडे लिखित ‘माणूसपणाची सनद’ या व्यक्तिचित्रणात्मक ललितसंग्रहाचे आणि प्राचार्य डॉ. संभाजी मलघे लिखित ‘बंधुतेचं झाड’ या समीक्षाग्रंथाचे लोकार्पण अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ उद्योजक, कृषिभूषण सुदाम भोरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, कविवर्य भरत दौंडकर, दत्तात्रय जगताप, प्रदीप गांधलीकर, धम्मभूषण महेंद्र भारती, उद्धव कानडे आणि प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अण्णा हजारे पुढे म्हणाले की, “आज आपल्याला रंगीबेरंगी जग दिसते.
रंग, रूप, भाषा, वेष वेगवेगळे असले तरी हे जग आपल्याला सुंदर भासते; पण या जगातून खरा माणूस हरवत असल्याने हे चित्र मलिन झाले आहे. अश्लीलता, बीभत्सता यामुळे आपल्या उज्ज्वल परंपरा आणि आईवडिलांचे संस्कार दुर्लक्षित झाल्यानेच माणुसकीचा ऱ्हास होतो आहे. धर्म, जात यांच्या प्राबल्यामध्ये माणूस हा खूप महत्त्वाचा आहे, हे गांधी जयंतीच्या निमित्ताने आपण लक्षात घेतले पाहिजे!”
याप्रसंगी अण्णा हजारे यांच्या आग्रहास्तव भरत दौंडकर यांनी राजकीय उपहासिका सादर केली; तर उद्धव कानडे यांनी ‘भिकारी’ आणि ‘आयुष्याला मागताना…’ या दोन कवितांचे सादरीकरण केले. सुदाम भोरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “आमच्या पिढीने महात्मा गांधी यांना पाहिले नाही; परंतु आज अण्णा हजारे यांच्या रूपाने गांधीविचारांची अनुभूती मिळत असल्याने आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो!” अशी भावना व्यक्त केली.
ग्रंथ लोकार्पण सोहळ्यानंतर पद्मावती मंदिराच्या प्रांगणातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अण्णा हजारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पुणे, पिंपरी – चिंचवडमधील साहित्यिक, राळेगणसिद्धी येथील ग्रामस्थ आणि विविध संस्थांचे अभ्यागत तसेच कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. महेंद्र भारती यांनी आभार मानले.

error: Content is protected !!