पाठ्यपुस्तकातील कवी विद्यार्थ्यांच्या भेटीला
पिंपरी:
पाठ्यपुस्तकातील कवी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष भेटीला आले आणि विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या शिक्षण व संशोधन विभागाच्या वतीने ‘माता, माती आणि संस्कृतीच्या कविता’ या विषयावरील एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् येथे करण्यात आले.
या उपक्रमांतर्गत इयत्ता सातवी आणि नववीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील प्रशांत केंदळे (नाशिक), भरत दौंडकर (शिरूर) आणि रानकवी तुकाराम धांडे (कळसूबाई शिखर) या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवींनी आपल्या एकाहून एक सरस कवितांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, सहकार्यवाह रवींद्र नामदे, उपाध्यक्ष वैज्ञानिक अशोक नगरकर, शिक्षण व संशोधन विभागप्रमुख प्रा. दिगंबर ढोकले, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, शाहीर आसराम कसबे, डॉ. नीता मोहिते, व्याख्यानमाला समन्वयक सुहास पोफळे, हेमराज चौधरी उपस्थित होते.
“पाटी, पुस्तक, दप्तर आहे
शाळा माझी सुंदर आहे!”
या कवी प्रशांत केंदळे यांनी गाऊन सादर केलेल्या पहिल्याच कवितेने विद्यार्थ्यांची मने जिंकून घेतली.
“माय अमृताचा घडा
माय प्राजक्ताचा सडा
माय रोज शिकविते
मला जीवनाचा धडा!”
या त्यांच्या आईवरील कवितेने सर्व उपस्थितांना सद्गदित केले.
भरत दौंडकर यांची,
“बैलावानी राबणारा
बाप गायीवानी होता
हात त्याचा खरबुडा
आईवानी होता…”
ही बापाची आठवण सांगणारी कविता मुलांना प्रचंड भावली. त्याच कवितेच्या शेवटी…
“माझ्या नव्या वहीसाठी
बाप भिजला घामानं
त्याची मळालेली बंडी
मला ध्वजाच्या समान!”
या ओळींना टाळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रानकवी तुकाराम धांडे यांच्या “आई होती तेव्हा जातं गाणं गायाचं…” या कवितेच्या ओळींनी श्रोत्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. त्यांनी पाठ्यपुस्तकातील ‘वनवासी’ ही आपली कविता सादर करून विद्यार्थ्यांना पुनः प्रत्ययाचा आनंद दिला. सुमारे दोन तास या तिन्ही कवींनी आपल्या आशयघन अन् नितांतसुंदर कवितांनी विद्यार्थ्यांना खिळवून ठेवले.
त्यानंतर शिक्षिका आणि विद्यार्थिनींनी आपल्या स्वरचित कविता सादर करून मान्यवरांकडून दाद मिळवली. प्रथितयश कवींच्या कविता कशा जन्माला येतात आणि त्यांचे प्रभावी सादरीकरण कसे करावे याविषयी भरत दौंडकर यांनी निवेदनातून सुलभ पद्धतीने मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर आपल्या आवडत्या कवींसोबत छायाचित्रे काढून घेण्यासाठी तसेच त्यांची स्वाक्षरी घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.
पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् प्रधानाचार्या पूनम गुजर, मुख्याध्यापिका वर्षा जाधव, वासंती तिकोणे, पुष्पा जाधव, सतीश अवचार, दीपाली शिंदे, मारुती वाघमारे, आरती शिवणीकर आणि शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी संयोजनात परिश्रम घेतले. शाहीर आसराम कसबे लिखित क्रांतिवीर चापेकरांच्या कवनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
- स्व. पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठानचा २० एप्रिलला होणार सामुदायिक विवाह सोहळा: अध्यक्षपदी अजय धडवले, कार्याध्यक्षपदी प्रवीण कुडे तर कार्यक्रमप्रमुखपदी संजय दंडेल
- निरोगी आरोग्यासाठी योगयुक्त जीवन शैली ही काळाची गरज- माजी राज्यमंत्री बाळा भेगडे
- रविवार दिनांक १२ जानेवारीला ‘परीक्षेला सामोरे जाताना’ नि:शुल्क मार्गदर्शन शिबिर
- पिंपरी न्यायालयात नव्याने रुजू सहायक सरकारी वकिलांचे ॲडव्होकेटस् बारच्या वतीने स्वागत
- लहुवंदना पाठांतर स्पर्धेचे आयोजन