“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग २४ वा”

तुकाराम महाराजांनी नित्य नामस्मरणाचा अट्टाहासाने अभ्यास केला व हा अभ्यास चालू असता प्रभुची प्रार्थना केली की-
ऐसे भाग्य कई लाहतां होईन।
अवघे देखे जन ब्रह्मरूप।।
मग तया सुखा अंत नाही पार।
आनंदे सागर हेलावती।।
किंवा
नरनारी बाळे अवघा नारायण।
ऐसे माझे मन करी देवा।।

जग ब्रह्मरूप आहे, नरनारी बाळे नारायण रूप आहेत, हे तुकाराम महाराजांना माहीत होते, समजत होते, कळत होते, पण त्याचा त्यांना साक्षात्कार, प्रत्यक्ष अनुभव आला नव्हता. तो अनुभव यावा, तसा साक्षात्कार घडावा म्हणूनच तुकाराम महाराज देवाची सारखी प्रार्थना करीत होते व ही प्रार्थना फळावी म्हणून अखंड नामस्मरणाचा “अट्टाहासाने” अभ्यास करीत होते. कळकळीने केलेल्या प्रार्थनेला व अभ्यासाला भगवत्कृपेने यश आले व तुकाराम महाराज साक्षात्काराच्या स्वानुभवाच्या भूमिकेवरून सांगू लागले.
जेथे देखे तेथे तुझीच पाऊले।
त्रिभुवन संचले विठ्ठला गा।।
त्यांना सर्वत्र भगवंत भरून राहिलेला आहे असे प्रत्यक्ष दिसू लागले.

तात्पर्य, “सर्वांघटी राम” या शुद्ध भावाच्या अनुसंधानात उपासना घडली पाहिजे तरच “सर्वांघटी राम” या भावाचा प्रत्यक्ष अनुभव येईल.
जगी विठ्ठल रुक्मिणी।
हेचि अखंड स्मरा ध्यानी।।
असा उपदेश जनाबाईने एके ठिकाणी केला आहे.

पुढे ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
न सोडी हा भावो टाकी रे संदेहो।
रामकृष्णी टाहो नित्य फोडी।।

ईश्वर सर्वत्र आहे, सर्व भूतमात्रांत तो वास करतो, या गोष्टीवर सर्वसाधारण माणसाचा विश्वास बसणे कठीणच! कारण स्थूल ज्ञानेंद्रियांच्या द्वारे जेवढे प्रचीतीला येते तेवढेच खरे, असे म्हणणाऱ्या स्थूल दृष्टीच्या लोकांना सूक्ष्म चैतन्यरूप जगाचे दर्शन व्हावे कसे?

स्थूल दृष्टीच्या माणसाला पाणी जसे दिसते त्याच्यापेक्षा सूक्ष्मदर्शक यंत्राच्या (Microscope) सहाय्याने जो पाणी पाहतो त्याला ते अगदी वेगळे दिसते. साध्या डोळ्यांना पाण्यात एकही जंतू दिसत नाही. याच्या उलट सूक्ष्म-अतिसूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने तेच पाणी पाहिले तर तेथे जंतूवाचून दुसरे कांहीच दिसत नाही. तात्पर्य, …. स्थूल दृष्टीच्या माणसाला जो पदार्थ पाणी म्हणून दिसतो तोच पदार्थ सूक्ष्म दृष्टीच्या माणसाला जंतू म्हणून प्रतीत होतो.

म्हणजे या पदार्थाचे तात्त्विकतेने वर्णन करायचे झाले तर असे सांगता येईल की, हा पदार्थ दिसायला पाणी पण असायला जंतू होय. … संत नेमके तेच सांगतात.
स्थूल दृष्टीच्या माणसाला जग जसे दिसते तसे ते संतांच्या सूक्ष्म म्हणजे दिव्य दृष्टीला दिसत नाही. सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने स्थूल दृष्टीच्या माणसाला जशी सूक्ष्म दृष्टी मिळते त्याप्रमाणे उपासनेच्याद्वारे साधकाला दिव्य दृष्टी प्राप्त होते.

✅ या दिव्य दृष्टीला जग हे जग न दिसता “जगदीश” दिसते. दिसायला विश्व पण असायला विश्वंभर दिसायला जन पण असायला “जनार्दन”, दिसायला भूत पण असायला “भगवंत” असा त्याचा “अमृतानुभव” असतो.

म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की,
“सर्वांघटी राम” ही दृष्टी तुला आज प्राप्त झालेली नसली तरी ते एक त्रिकालाबाधित अंतिम सत्य आहे. याविषयी तू मनात संदेह न ठेवतां त्या सत्याच्या, त्या शुद्ध भावाच्या अनुस्मरणात तू आपली उपासना चालू ठेव म्हणजे “अभ्यासाने व प्रार्थनेने भगवत्कृपा होऊन त्याच सत्याचा तुला साक्षात्कार होईल”.
(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स. प्र. (sp)1078

error: Content is protected !!