“ज्ञानेशांचा संदेश”
“सार्थ हरिपाठ”
“अभंग २१ वा”
🙏भगवंताचे ठिकाणी जे दिव्यत्व, सामर्थ्य व शक्ती आहे ते दिव्यत्व, सामर्थ्य व शक्ती भगवन्नामात आहे. म्हणून …..
नामाच्या उच्चाराने ज्या दिव्य लहरी (Divine Vibrations) वातावरणात निर्माण होतात, त्या लहरी सर्वत्र पसरतात व माणसांच्या विचारावर, उच्चारावर व आचारावर परिणाम करून त्यांच्यात आमुलाग्र परिवर्तन घडवून आणतात.
साध्या नादामध्ये काय सामर्थ्य आहे याची कल्पना वैज्ञानिकांना आतांशी येऊ लागली आहे. घंटा नादाने क्षयरोगाचे (T.B.) जंतू मारता येणे शक्य आहे, असे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे नादाचा ओघ पाण्यात सोडून त्यातील मारक जंतूंचा नाश करता येतो, असेही शोध विज्ञानाने लावले आहेत.
तात्पर्य, साध्या नादात जर इतके सामर्थ्य असते तर भगवंताच्या दिव्य नामात-नादब्रह्मात किती सामर्थ्य असेल याची कल्पनाच केलेली बरी. संगीतात विशिष्ट प्रकारचे राग आळवताना वातावरणात ज्या लहरी किंवा स्पंद निर्माण होतात, त्या नादलहरी वृक्षांवर इष्ट परिणाम घडवून आणतात हे वनस्पतिशास्त्राने सिद्ध केले आहे, संगीताच्या नादलहरी जर वृक्षांवर परिणाम करू शकतात तर भगवन्नामाच्या उच्चाराने घोषाने ज्या दिव्य लहरी निर्माण होतात त्यांचा इष्ट परिणाम माणसांवर होऊन त्यांच्या जीवनात परिवर्तन घडले नाही तरच नवल!
म्हणूनच ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर महाराज सांगतात-
ऐसें माझेनि नाम घोषें।
नाहींसी करिती विश्वाची दुःखे।।
अवघे जगचि महासुखे। दुमदुमीत भरले।।
अणुध्वम (ॲटम बॉम्ब) फुटल्यावर त्याचे परिणाम सर्व जगात होतात हे खरे; परंतु त्याचे भयंकर परिणाम नजीकच्या आसमंतातील प्रदेशात होतात व दूरच्या प्रदेशावर त्या मानाने कमी परिणाम होतो.
त्याचप्रमाणे नामोच्चार किंवा नामसंकीर्तन ज्या ठिकाणी घडते त्या जागेच्या सर्व आसमंतातील माणसांच्यावर ते अधिक परिणाम करते व थोडा फार परिणाम दूरच्या माणसांवर होतो.
या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, अणुध्वमाची (ॲटम बॉम्बची) शक्ति विध्वंसक आहे तर नामाची शक्ती विधायक आहे.
विध्वंसक कार्य चटकन दृग्गोचर होते व फारच कमी वेळांत घडते. पण विधायक कार्य आकाराला यावयास वेळ लागतो. हिरोशिमा या जपानी शहराचा ॲटम बॉम्बने क्षणात विध्वंस केला पण तेच शहर पुनः बांधावयास कित्येक वर्षे लागतील. असो!
नामाच्या सूक्ष्म व दिव्य सामर्थ्याने नामाचा उच्चार करणारे व ते ऐकणारे या दोहोंचा उद्धार होतो. म्हणून पुढच्याच चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात — *रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण।* *जडजीवां तारण हरि एक।।*
रामकृष्णनाम-भगवन्नाम हे सर्व दोषांचे हरण करणारे व जडजीवांना संसारसागर तारून नेणारे असे एकच सुलभ साधन आहे.
ज्याप्रमाणे परिसाचा लोखंडाला स्पर्श झाला की, त्याचे सोन्यात रूपांतर होते त्याप्रमाणे जीवाला दिव्य नामाचा स्पर्श झाल्याबरोबर त्याचे सर्व दोष नाहीसे होऊन त्याचे देवात रूपांतर होते.
(क्रमशः)
— सद्गुरू श्री वामनराव पै
✍️ स. प्र. (sp)1067